4 एप्रिल 2024 रोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने त्याला ’न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. यामध्ये जातीय जनगणना, आरक्षणावरील 50 टक्क्यांची कमाल मर्यादा हटवणे, तरुणांना रोजगार, इंटर्नशिपची व्यवस्था, गरिबांना आर्थिक मदत आदी आश्वासने देण्यात आली आहेत. महिला, आदिवासी, दलित, ओबीसी, शेतकरी आणि तरुण व विद्यार्थी यांना न्याय देण्यावर या जाहीरनाम्याचा भर आहे. काँग्रेसच्या प्रव्नत्याने सांगितले की, भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या राजवटीत समाजातील विविध घटकांवर झालेला अन्याय संपुष्टात आणण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
या जाहीरनाम्याचा निषेध करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, या जाहीरनाम्यावर (स्वातंत्र्यपूर्व) मुस्लिम लीगच्या विघटनकारी राजकारणाचा ठसा आहे आणि त्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. हे ऐकून आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांचे ते म्हणणे आठवले ज्यात ते म्हणतात, ’’हिंदू राष्ट्राला मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट असे तीन अंतर्गत धोके आहेत’’ (संदर्भ ’बंच ऑफ थॉट्स’) यापैकी दोन गोष्टींवर भाजप वेळोवेळी विविध पातळ्यांवर चर्चा करत आहे आणि अजूनही चर्चा करत आहे. जातीयवाद हे भाजपचे प्रमुख शस्त्र आहे. 1937 च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी मुस्लिम लीगचा जाहीरनामा आणि निवडणूक कार्यक्रमात मुस्लिम अस्मितेशी संबंधित मागण्या होत्या आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी सकारात्मक पावले उचलल्याचा उल्लेख नव्हता.
भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि मुस्लिम लीगचे पूर्वज एकमेकांचे सहयोगी असल्याचे बरोबरच सांगितले. सत्य हे आहे की धार्मिक राष्ट्रवादी गट - मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि आरएसएसमध्ये अनेक साम्य आहेत. वसाहतवादी भारतात होत असलेल्या बदलांना प्रतिसाद म्हणून या तीन संघटना समाजातील घटत्या घटकांनी स्थापन केल्या होत्या. ब्रिटिश भारतात, औद्योगिकीकरण, आधुनिक शिक्षणाचा प्रसार आणि न्यायव्यवस्था आणि नवीन प्रशासकीय व्यवस्थेची स्थापना तसेच दळणवळणाच्या साधनांच्या विकासामुळे अनेक नवीन वर्ग उदयास आले - कामगार वर्ग, आधुनिक सुशिक्षित वर्ग आणि आधुनिक उद्योगपती. त्यामुळे जुन्या शासक वर्गातील जमीनदार व राजे-नवाबांना धोका वाटू लागला. आपले सामाजिक-राजकीय-आर्थिक वर्चस्व संपुष्टात येईल, असे त्यांना वाटत होते.---(उर्वरित पान 2 वर)
नारायण मेघाजी लोखंडे, कॉम्रेड सिंगारावेलू आणि इतर अनेक उदयोन्मुख लोकांनी कामगारांना एकत्र केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर अनेक पक्ष या वर्गांच्या राजकीय अभिव्यक्तीचे प्रतीक म्हणून उदयास आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही या पक्षांची मूलभूत मूल्ये होती. जमीनदार आणि राजांच्या घसरत चाललेल्या वर्गाने यूनाइटेड पेट्रियोटिक असोसिएशनची स्थापना केली, जी ब्रिटिशांशी एकनिष्ठ होती. या वर्गांचा जाती आणि लिंगभेदावर पूर्ण विश्वास होता. कालांतराने ही संघटना विखुरली आणि त्यातून 1906 मध्ये मुस्लिम लीग आणि 1915 मध्ये हिंदू महासभा उदयास आली. सावरकरांनी त्यांच्या ‘‘एसेंशियल्स ऑफ हिंदुत्व’’ या पुस्तकात प्रतिपादन केले आहे की भारतात दोन राष्ट्रे आहेत - हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र. यातून प्रेरित होऊन 1925 मध्ये स्थापन झालेल्या आरएसएसने हिंदु राष्ट्राचा अजेंडा स्वीकारला तेव्हा लंडनमध्ये शिकणाऱ्या काही मुस्लिम लीग समर्थकांनी ’पाकिस्तान’ हा शब्द तयार केला. या दोन्ही प्रवाहांच्या समर्थकांनी अनुक्रमे हिंदू राजे आणि मुस्लिम राजे-नवाबांचा काळ हा देशाच्या इतिहासाचा सुवर्ण आणि महान काळ मानला. या दोघांनी स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांना पूर्ण साथ दिली. त्यांची रणनीती अशी होती की ब्रिटिशांसोबत मिळून त्यांना त्यांच्या शत्रूंचा (हिंदू किंवा मुस्लिम) सामना करायचा होता. हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधारस्तंभ सावरकर यांनी अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या 19व्या अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले होते, आजचा भारत हे दुसरे एकसंध राष्ट्र म्हणून मानले जाऊ शकत नाही. उलट येथे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन प्रमुख राष्ट्रे आहेत. आरएसएस चे अनौपचारिक मुखपत्र ’ऑर्गनायझर’ ने लिहिले, ..हिंदू हे भारतातील एकमेव राष्ट्र आहे आणि आपली राष्ट्रीय रचना या भक्कम पायावर घातली गेली पाहिजे...हे राष्ट्र हिंदू, हिंदू परंपरा, संस्कृती, कल्पना आणि महत्वाकांक्षा यावर उभारले जाईल.
मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेने 1939 मध्ये बंगाल, सिंध आणि उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांतात संयुक्त सरकारे स्थापन केली. सिंधमध्ये मुस्लीम लीगने विधीमंडळात पाकिस्तान निर्मितीच्या समर्थनार्थ ठराव मांडला तेव्हा हिंदू महासभेचे सदस्य गप्प राहिले. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीतून प्रसारित केलेल्या आपल्या निवेदनात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा या दोघांनाही ब्रिटिश सरकारविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. ते दोघे आणि आरएसएस 1942 च्या भारत छोडो आंदोलनापासून दूर राहिले. सावरकरांनी इंग्लंडला दुसरे महायुद्ध जिंकण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. ते म्हणाले, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात हिंदू महासभेच्या शाखांनी हिंदूंना (ब्रिटिश) लष्कर, नौदल आणि हवाई दल आणि लष्करी उपकरणे तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये सामील होण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या वेळी सुभाष बोस यांची आझाद हिंद फौज ब्रिटीश सैन्याशी लढत होती, त्या वेळी सावरकर ब्रिटिश सैन्याला मदत करत होते.
हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग हे दोन्ही पक्ष इंग्रजांच्या हिताचे समर्थन करत होते हे स्पष्ट आहे. सुभाषचंद्र बोस यांचा या दोन्ही संघटनांच्या जातीय राजकारणाला कडाडून विरोध होता आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याच्या बोस यांच्या आवाहनाकडे दोघांनीही लक्ष दिले नाही. जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी, जे बंगालच्या मुस्लिम लीगच्या युती सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी व्हाइसरॉयला पत्र लिहून 1942 च्या चळवळीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आणि बंगालमध्ये चळवळ चिरडली जाईल याची खात्री करण्याचे आश्वासन दिले. 26 जुलै 1942 रोजीच्या त्यांच्या पत्रात त्यांनी लिहिले, काँग्रेसने सुरू केलेल्या कोणत्याही व्यापक आंदोलनामुळे प्रांतात जी परिस्थिती उद्भवू शकते त्याबद्दल आता मी काही सांगू इच्छितो. सध्या सत्ता असलेल्या कोणत्याही सरकारने युद्धाच्या या काळात सामान्य लोकांना भडकवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला पाहिजे, ज्यामुळे अंतर्गत गडबड होऊ शकते आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणेच आंबेडकरांनीही मुस्लिम राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद या विचारधारा एका चौकटीत ठेवल्या. 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, हे विचित्र वाटेल पण श्री सावरकर आणि श्रीमान जिना हे एक राष्ट्र विरुद्ध दोन राष्ट्रांच्या मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात न राहता एकमेकांशी मैत्रीपूर्ण होते. दोघेही सहमत आहेत - फक्त सहमत नाहीत तर आग्रही आहेत - की भारतात दोन राष्ट्रे आहेत - एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे हिंदू राष्ट्र.
दलित लोकांच्या हिताच्या चर्चा भाजप-आरएसएसला मान्य नाहीत, कारण ते त्यांच्या हिंदु राष्ट्र अजेंड्याच्या विरोधात आहेत, यात नवल नाही. पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रातील वंचित वर्गाची काय अवस्था आहे, हे आपल्या सर्वांसमोर आहे. काँग्रेसच्या आशावादी जाहीरनाम्यावर मोदींनी केलेली टीका त्यांच्या वैचारिक पूर्वजांच्या विचारसरणीशी सुसंगत आहे.
- राम पुनियानी
(मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवाद अमरीश हर्देनिया केला तर हिंदीचा मराठी अनुवाद बशीर शेख यांनी केला.)
लेखक आयआयटी मुंबई येथे शिकवतात आणि 2007चे राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत)
Post a Comment