प्रेरणादायी सत्यकथा
दिनांक 26 मार्चला दैनिक सकाळ मध्ये एक बातमी वाचली औसा तालुक्यात शेतीच्या वाटणीवरून सावत्र भावाचा खून करण्यात आला. ही काही नवीन बाब नाही. अशा घटना रोजच घडत असतात. या निमित्त एक ऐतिहासिक सत्य घटना आठवली. शोधनच्या वाचकांसाठी खास सादर करीत आहे.
युसुफ (अ.) आणि यामिन दोघे सख्खे भाऊ होते. त्यांना दहा सावत्र भाऊ होते. युसुफ (अ.) अतिशय देखणे आणि सुंदर होते. बापाचा जीव की प्राण होते. त्यामुळे सावत्र भावंडांना त्यांचा हेवा वाटायचा. त्यातच झाले असे की युसुफने (अ.) ने एकदा स्वप्न पाहिले. सूर्य, चंद्र आणि 11 तारे त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत. त्यांनी हे स्वप्न आपल्या वडिलांना सांगितले. स्वप्न ऐकून वडील सद्गदित झाले. ते म्हणाले, “हे स्वप्न एक शुभ वार्ता आहे. परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न आहे. भविष्यात तुला फार मोठे लौकिक प्राप्त होणार आहे. हे स्वप्न तुझ्या भावंडांना सांगू नको. ते अगोदरच तुझ्यावर चिडतात. तुला नुकसान पोहोचवतील.”
ही बाब सावत्र आईला समजली. तिने आपल्या मुलांना सांगितले की, ‘युसुफने असे स्वप्न पाहिले आहे. वडील त्याच्यावर अगोदरच प्रेम करतात हे जर असंच चाललं तर तुमच्या हाती काहीच येणार नाही. सगळं काही युसुफला मिळून जाईल. तेव्हा काहीही करा आणि युसूफचा (अ.) काटा काढा.’
भावंड एकत्रित आली आणि त्यांनी युसुफची (अ.) हत्या करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी योजना आखली. बापाला म्हणाले, “आम्ही जंगलामध्ये जात आहोत. युसुफलाही (अ.) सोबत घेऊन जातो. आमच्याबरोबर थोडा खेळेल, बागडेल, रानमेवा खाईन.” बाप म्हणाला, “मी तुमच्यावर विश्वास करू शकत नाही. तुम्ही माझ्या मुलाला क्षती पोहोचवणार हे निश्चित आहे.”
सर्व म्हणाले, “बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तो आमचा भाऊ आहे. आम्हाला खूप प्रिय आहे.” शेवटी नाईलाजाने बापाने परवानगी दिली. सर्व भावंडे युसुफ (अ.) ला घेवून जंगलात गेले. जंगलामध्ये एका अंधाऱ्या विहिरीत त्यांनी युसुफला (अ.) ढकलून दिले. युसुफचे (अ.) शर्ट तेवढे काढून घेतले. एक बकरा कापला त्याचे रक्त त्या शर्टाला लावले. बापाला ते शर्ट देऊन म्हणाले, “आम्ही खेळण्या बागडण्यात मग्न झालो होतो. त्याच क्षणी लांडग्याने हल्ला केला आणि युसुफला (अ.) घेवून गेला. त्यांनी रक्ताने माखलेला शर्टही दाखवला. बाप म्हणाला, “हे कसे शक्य आहे लांडगा युसुफला (अ.) घेऊन गेला परंतु; त्याचे शर्ट सोडून दिले. मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू.” मुले म्हणाली, “आम्हाला माहीत होतं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणारच नाहीत परंतु; हे सत्य आहे.” बाप म्हणाला, “मी संयम ठेवण्यापलिकडे काय करू शकतो.” आणि रडायला लागला. बाप इतका रडला की, रडून रडून त्याची दृष्टी गेली.
अनेक वर्षे निघून गेली. दुष्काळ पडला. इजिप्तचा राजा लोकांना धान्य दान करीत असल्याचे यांना समजले. ही सर्व भावंडे धान्य मिळवण्यासाठी ‘कनआन’ हून निघाली. इजिप्तला पोहोचली. दरबारात हजर झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दरबार युसुफचाच (अ.) होता. त्यांनी आपल्या भावंडांना ओळखले परंतु; त्यांच्यावर जाहीर होऊ दिले नाही. त्यांना धान्य दिले आणि सांगितले की, तुम्हाला धान्य देत आहे परंतु पुढच्या खेपेला तुमच्या बापाचं आणि भावाचं धान्य तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं धान्य स्वतः येऊन घेऊन जावे. भावंडे म्हणाली आमचा बाप खूप म्हातारा झाला आहे. आजारी आहे, त्याला डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. लहान भाऊ त्यांची सेवा करतो आहे. तेंव्हा त्यांचं धान्यही तुम्ही आमच्याकडेच द्या. युसुफ (अ.) म्हणाले, एवढ्या बार मी देत आहे परंतु; काही जरी झाले तर पुढच्या वेळेस तुम्ही त्यांना सोबत घेऊन यावे.
पुढच्या वेळेस भावंडे यामिनला (युसुफचा सख्खा भाऊ) घेऊन तिथे हजर झाली. युसफने (अ.) बापाची चौकशी करताना माझा बाप कसा आहे, असे विचारले असता सर्व भावंडे चकित झाली की, हा बादशहा आमच्या बापाला आपला बाप कसा म्हणत आहे. पुढे युसुफ (अ.) म्हणाले, “तुम्ही युसुफ (अ.) सोबत काय केले होते. त्याला अंधाऱ्या विहिरीमध्ये ढकलून दिले होते ना? पुढे त्याचे काय झाले.” हे ऐकून भावंडे घाबरली क्षमा मागू लागली. युसफ (अ.) म्हणाले, भावंडांनो मी तुमचा भाऊ युसुफ (अ.) आहे. मी आजही तुमच्यावर तेवढेच प्रेम करतो. तुमच्याकडून कोणताच बदला घेणार नाही. मी तुम्हाला क्षमा केली आहे. युसुफने (अ.) त्यांना क्षमा केले.
एक भाऊ ते होते, ज्यांनी आपल्या भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे एक भाऊ असाही होता की, ज्याने आपल्या भावंडांना केवळ क्षमाच केले नाही तर त्यांना संकट काळी मदतही केली. खरे आहे, भाऊ असेही असतात आणि भाऊ तसेही.
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment