वनस्पती संसाधनांचा वापर
नैसर्गिक संसाधनांमध्ये जैविक संसाधने विशेष करून वनस्पती आणि त्यांची उत्पादने हा जैव विज्ञान परिषदांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच 'बायोप्रोस्पेक्टिंग आणि प्लांट रिसोर्स युटिलायझेशन' म्हणजे जैव-अन्वेषन आणि वनस्पती संसाधनांचा वापर हा विषय विविध विद्यापीठांमध्ये पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.
अन्न या मुलभूत गरजेची पुर्तता वनस्पती करतात. गहू, तांदूळ, मका, हरभरा, बटाटा, रताळे, ऊस यांसारख्या अन्न पिकांचे आकारविज्ञान, शरीरशास्त्र, साठवलेल्या अन्नधान्याच्या सूक्ष्म-रासायनिक चाचण्या यामध्ये अभ्यासल्या जातात. जनावरांसाठी चारा किंवा चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वारी, बाजरी, लसूणघास, मका इ. पिकांचाही अभ्यास यात केला जातो. वनस्पती तंतू आणि धागे म्हणून वापरल्या जाणाऱ्या कापूस, ताग, बरू किंवा घाघरू, नारळाच्या जटा, सांवरी किंवा सिल्क कॉटन यांसाठी योग्य रंग पद्धती वापरून संपूर्ण तंतूंचे आकारशास्त्र आणि सूक्ष्म शरीरशास्त्र सुद्धा याच शाखेत येते. औषधी वनस्पतींमध्ये कोरफड, तुळस, कडुलिंब, अश्वगंधा, अडुळसा आणि सुगंधी वनस्पतींमध्ये गुलाब, मोगरा, पुदिना, निलगिरी यांसारख्या वनस्पती शिकवल्या जातात. मोहरी, भुईमूग, सोयाबीन, नारळ, सूर्यफूल, एरंडी या तेलबिया तसेच डिंक, राळ, टॅनिन, रंग उत्पादन करणारी झाडे, इंधन आणि लाकडी वस्तूंच्या उत्पादनासाठी लागवडीच्या झाडांचा अभ्यास येथे केला जातो.
याबाबतीत कुरआनमध्ये अध्याय ताहाच्या आयत ५३ मध्ये म्हटले आहे,
"तोच, ज्याने तुमच्यासाठी जमिनीची चादर अंथरली, आणि तिच्यात तुमच्यासाठी चालण्यास मार्ग बनविले, व वरून पर्जन्यवृष्टी केली, मग त्याद्वारे अनेक जातीच्या वनस्पती निर्माण केल्या."
या आयतीचे स्पष्टीकरण देताना भाष्यकार मौलाना मुफ्ती मुहम्मद शफी (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) यांनी आपल्या मआरिफुल कुरआन या ग्रंथात 'अज्वाजम्-मिन्-नबातिन शत्ता' म्हणजे 'विविध वनस्पतींच्या अनेक जोड्या' असा उल्लेख केला आहे. याचे तात्पर्य म्हणजे अल्लाहने इतक्या प्रकारच्या वनस्पती निर्माण केल्या आहेत की त्यांची मोजणी आणि सर्वेक्षण मानवाला शक्य नाही. मग प्रत्येक वनस्पती, जसे औषधी वनस्पतींची फूले, फळे, झाडाची साल यांमध्ये असे गुणधर्म ठेवले आहेत की वैद्यकीय शास्त्रज्ञ आणि औषध शास्त्रज्ञ आश्चर्यचकित आहेत. कित्येक वर्षांपासून यावर संशोधन चालू असतानाही हे कोणीही सांगू शकत नाही की हा अंतिम प्रबंध आहे आणि आता यापेक्षा जास्त कोणी लिहू शकणार नाही. वर नमूद केल्याप्रमाणे मौलाना पुढे लिहितात की या सर्व विविध प्रकारच्या वनस्पती माणसासाठी, त्याच्या पाळीव प्राण्यांसाठी आणि वन्य प्राण्यांसाठी अन्न किंवा औषध आहेत. त्यांच्या लाकडाचा वापर माणूस घरे बांधण्यासाठी आणि हजारो घरगुती वस्तू बनवण्यासाठी करत असतो. या सर्व वस्तू योगायोगाने निर्माण झाल्यात का? कुरआनमध्ये नैसर्गिक संसाधनांचा ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आला आहे तिथे त्या निसर्गकर्त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली गेली आहे जो एकमेव आहे. त्या अस्तित्वाला जाणणे हे माणसाचे कर्तव्य आहे.
(क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment