जर दोन माणसांमध्ये परस्पर विरोध झालेला असेल तर एक तिसरी व्यक्ती दोघांशी प्रामाणिकपणे मैत्री ठेवू शकते. पण अशा संबंधात दुटप्पीपणा नसला पाहिजे. म्हणजे दोन्हींशी मैत्री करावी आणि त्या दोघांच्या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात जेणेकरुन त्या दोघांचे संबंध आणखीन जास्त बिघडतील. ही भयंकर अनैतिक गोष्ट आहे. चहाडी करण्यपेक्षाही वाईट प्रकारची. कारण चहाडी करणारा माणूस एका माणसाविषयी दुसऱ्याला बोलतो. पण दुटप्पी माणूस आपल्या दोन्ही मित्रांच्या गोष्टी परस्परांना पोहचवितो. दुटप्पी माणूस फक्त एका माणसाची गोष्टच दुसऱ्या माणसाला सांगत नसून तो एका माणसासमोर त्याची प्रशंसा करतो आणि तिथून निघाला की त्याची टिंगलटवाळी करतो. दांभिकपणात ज्या दोन गोष्टी आढळतात त्यात हा दुटप्पीपणादेखील आहे.
एकदा हजरत अब्दुल्लाह बिन उमर यांना सांगण्यात आले की आम्ही जेव्हा अधिकारी आणि सत्ताधारी लोकांकडे जातो तेव्हा जे काही बोलतो, करतो आणि त्यांच्याकडून निघाल्यानंतर दुसरेच काही बोलत असते. अब्दुल्लाह इब्न उमर म्हणाले, की आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात याला दांभिकपणा म्हणत होतो. तसे पवित्र कुरआनात सुद्धा अशा व्यवहाराला दांभिकपणाच म्हटले गेले आहे.
“आम्ही जेव्हा श्रद्धावानांकडे जातो तेव्हा त्यांना सांगतो की आम्ही श्रद्धा धारण केली आहे, तेच जेव्हा आपल्या सैतानांकडे जातात तेव्हा म्हणतात की आम्ही तर तुमच्याच बरोबर आहोत. त्यांची तर आम्ही थट्टा करत होतो.” (पवित्र कुरआन-२)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींमध्ये अशा लोकांविषयी फार कठोर शब्दांत वर्णन केलेले आहे. असे म्हटले आहे की कयामतच्या दिवशी दुटप्पी माणसाची अवस्था सर्वांत वाईट होईल.
दुसऱ्या एका हदीसमध्ये असे सांगितले आहे की जो माणूस या जगात दुतोंडी असेल कयामतच्या दिवशी त्याच्या तोंडात दोन जिभा असतील.
दुसऱ्याच्या बाबतीत खोटे विचार बाळगण्याचा असा परिणाम होतो की अशा माणसाला दुसऱ्याच्या प्रत्येक कार्यात उणिवा आढळतात आणि कोणत्याही कार्यात त्याला सौंदर्य दिसत नाही. दुसऱ्या लोकांकडल्या वाह्यात अशा गोष्टी सांगत असतो आणि म्हणून अशा लोकांना त्याची रीत पसंत पडत नसल्याने ते त्याच्यापासून संबंध तोडून टाकतात ज्यामुळे आपसात द्वेष आणि शत्रुत्व निर्माण होते. अल्लाहने ताकीद दिली आहे की हे श्रद्धावंत लोक हो, दुसऱ्याविषयी चुकीचे विचार बाळगू नका, हा गुन्हा आहे. (पवित्र कुरआन-हुजुरात:२)
(शिबली नोमानी, सीरतुन्नबी खंड-६)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment