धर्माच्या नावावर लोकांना मुर्ख बनवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जेंव्हा एखादी चळवळ उभी राहते तेव्हा ती अनेक लोकांच्या हितसंबंधांशी संघर्ष करते. याशिवाय समाजात प्रचलित असलेल्या खोट्या समजुतींनाही धक्का बसण्यास सुरुवात होते. सुरुवातीला काही मोजके पण नीतिमान लोक लगेच चळवळीची विचारधारा स्वीकारतात. पुढे येऊन पूर्णपणे सहकार्य करतात. दुसरीकडे अधिकतर लोकांच्या नकारात्मक भावनांमुळे चळवळीला विरोध सुरू होतो. ज्यामध्ये अहंकार, पक्षपात व स्वार्थ इत्यादी भावना काम करताना दिसतात. अज्ञान हेही विरोधाचे एक मुख्य कारण असते. वेगळा विचार स्विकारणे आणि तो इतरांसमोर व्यक्त करणे याकरिता धैर्य लागते. सुरुवातीच्या काळात लोक चळवळीच्या विचारधारेकडे दुर्लक्ष करतात. काही खिल्ली उडवणारेही असतात. प्रस्थापित व्यवस्थेशी अनेकांचे हितसंबंध जुडलेले असतात. त्यामुळे त्यांना न्याय आणि निष्पक्षतेवर आधारित विचारधारा स्वीकारण्यास जरा वेळ लागतो. असे स्वार्थी लोक सर्वप्रथम चळवळीच्या मार्गदर्शकाला लक्ष्य बनवतात. ज्याच्या चारित्र्यावर कोणताही डाग आढळून येत नसल्याने त्याच्या विरोधात अपप्रचार करून त्याला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून इतर लोकांनी त्याच्या विचारांना गंभीरपणे घेऊ नये आणि त्याकडे दुर्लक्ष करावे. हीच परिस्थिती तेंव्हाही निर्माण झाली होती जेंव्हा आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी मूर्तीपूजा करणाऱ्या, अनिष्ट प्रथा पाळणाऱ्या व धार्मिक उन्मादात अन्याय व अत्याचार करणाऱ्या लोकांसमोर खऱ्या धर्माची व्याख्या स्पष्ट केली. त्यांच्यासमोर यशस्वी जीवनाची तत्वे ठेवली आणि त्यांना भक्ती व उपासनेचे योग्य मार्ग दाखवले. याबरोबर मागील काळातील अनेक राष्ट्रे व समाजाच्या अधोगतीची आणि विनाशाची कारणे मांडली. जगात ईश-द्रोहामुळे येणारे भयंकर प्रकोप, कयामत म्हणजे न्यायाच्या दिवसाला गंभीरपणे घेण्याची गरज व मरणोत्तर जीवनाची वास्तविकता स्पष्ट केली. या गंभीर विषयांवर लोकांना सावध करताना एक वेळ अशीही आली जेव्हा विरोधक धीटपणे म्हणू लागले की हे पैगंबर! जर तुम्ही खरे आहात, तर ज्या न्यायाच्या दिवसापासून तुम्ही आम्हाला घाबरवता तो दिवस आणून दाखवा. ज्या ईश-प्रकोपाची भीती बाळगण्याचा संदेश तुम्ही आम्हाला देतात, तो प्रकोप आणून दाखवा. अशा परिस्थितीत अल्लाहने आदरणीय पैगंबर मुहम्मद(स) यांना आपली भूमिका लोकांसमोर स्पष्ट करण्याचा आदेश दिला,
कुल् या’अय्युहन्नासु इन्नमा अ-न लकुम् नजीरुम्-मुबीनुन
अनुवाद :-
हे पैगंबर! सांगून टाका की, लोकहो! तुमच्यासाठी मी तर फक्त स्पष्टपणे सावध करणारा आहे. ( 22 अल्-हज्ज : 49 )
म्हणजे, तुमच्या नशीबाचा निर्णय माझ्या हाती नाही. तुमचा काय निकाल लावायचा हेही माझ्या अधिकारात नाही. मी तर फक्त संकट येण्यापूर्वी तुम्हाला चेतावणी देणारा आहे. शिक्षा होण्यापूर्वी तुम्हाला सावध करणे ही माझी जबाबदारी आहे. तुमच्यासाठी पुढचा निर्णय घेणे हे अल्लाहचे काम आहे. कुणाला कितपर्यंत स्वातंत्र्य द्यायचे आणि कुणाला कधी व कोणत्या पद्धतीने शिक्षा करायची हे ईश्वरच ठरवतो. तुम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि मृत्यूनंतरच्या जीवनातील सर्व टप्प्यांबद्दल स्पष्टपणे चेतावणी देण्यासाठी अल्लाहने मला पैगंबर म्हणून नियुक्त केले आहे.
.......... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment