Halloween Costume ideas 2015

रहेजा हाऊसिंग सोसायटी कल्याण येथे ‘इफ्तार’चे आयोजन

 


कल्याण -

(मलिक अकबर यांजकडून)

रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी फलाह-ए-आम सोसायटी कल्याण तर्फे रहेजा हाऊसिंग सोसायटी येथे मुस्लिमेतर बंधूभगिनींसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ५-४५ वा. असीम फाळके यांच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मोईन डोन यांनी ट्रस्टतर्फे चालवण्यात आलेल्या वी केअर डायग्नॉस्टिक सेंटरच्या सुविधांवर थोडक्यात प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की आमच्या सेंटरमध्ये अल्प दरात अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. तसेच सेंटरमध्ये आधुनिक जागतिक दर्जाची उपकरणे आहेत. त्यांचे रिपोर्ट्सवर अनेक लहान-मोठे हॉस्पिटल्सकडून ग्राह्य धरले जातात. तसेच वी केअरमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स बसतात, त्यांची फी नाममात्र आहे.

यानंतर ट्रस्टकडून अस्पा मध्ये चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचा मिशल चौधरी यांनी परिचय करून दिला.

पवित्र रमजानमधील रोजा इफ्तार कार्यक्रमासाठी आमंत्रित जळगाव जमाअत ए इस्लामी हिंदचे अमीर सोहेल यांनी रोजा इफ्तारच्या २५ मिनिट अगोदर आपल्या मृदू शैलीत भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की रमजानमध्ये मी दररोज माझ्या घरी माझ्या कुटुंबासोबत रोजा इफ्तार करतो, पण आज मी माझ्या मोठ्या परिवारासोबत रोजा इफ्तार करत आहे. कारण पवित्र कुरआननुसार आपण एकाच मातापित्याची संतान असून या कारणाने आपण सर्व भारतवर्षातील नागरिक हे भाऊ-बहीण आहोत. म्हणून आपल्याबरोबर रोजा इफ्तारचा मला मोठा आनंद होत आहे. अजून आनंदाची ही बाब आहे की रहेजा सोसायटीमध्ये अनेक विचारधारा, संप्रदाय व जातीचे लोक गुण्यागोविदाने राहतात आणि आपल्या समोर मला रोजामागचे तत्त्वज्ञान मांडण्याचा अवसर प्राप्त झाला आहे. पवित्र कुरआनमधील सूरह बकरा, आयत नं. १८३ मध्ये अल्लाहने रोजाचे उद्दिष्ट सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे की रोजाद्वारे अल्लाह आपल्या हृदयात ईशभय निर्माण करू इच्छितो. रोजा ५-१० वर्षांचे मूलही ठेवते. ते स्वयंपाकघरात जाऊन काही खाऊ शकते किंवा फ्रिजमधून थंडगार कोल्ड्रिंक पिऊ शकते. पण ते तसे करत नाही. त्याला अल्लाहचे भय असते. त्याला हे माहीत असते की मला आई-वडील पाहत नाहीत. पण माझा अल्लाह तर पाहत आहे आणि ते आपला हात माग घेतो. ज्याच्यासाठी मी रोजा ठेवला आहे तो तर मला २४ तास पाहत आहे. त्याच्या मनात ईशभय निर्माण होते. हाच उद्देश रोजाचा आहे की मला कुणी बघत नाही पण माझा अल्लाह तर बघतच आहे.

आजही आपल्या देशात उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अएनेक राज्यांत गरिबांची परिस्थिती फार हलाखिची आहे. मला ओरिसा राज्यात जाण्याचा योग आला. तिथे झोपडपट्टीमध्ये राहणारे अनेक अशी कुटुंबे आहेत जी १५० ते २०० रुपयांसाठी पोटच्या संतानाला विकून टाकतात. कारण त्यांचे पोट भरण्याकरिता त्यांच्याकडे अन्न नाहे. ह्या अशा गरिबांची अवस्था व भुकेच्या वेदनांचा अंदाज आपल्याला ड्रायफ्रूट खाऊउन किंवा कोल्ड्रिंक पिऊन येणार नाही. रोजा आपल्याला भुकेची व तहानेची जाणीव करून देतो.

रमजानचे एक वैशिष्ट्य हे आहे की या महिन्यात कुरआन अवतरित झाले आहे. त्यात संपूर्ण जाती व मानवांसाठी शांतीचा संदेश आहे. हा ग्रंथ सगळ्यांचा आहे. या आधुनिक जगात कुरआनचे भाषांतर सहज उपलब्ध आहे. जर आपण इच्छुक असाल तर आयोजक तुम्हाला कुरआनचे भाषांतर देऊ शकतात.

सोहेल अमीर यांनी शेवटी सांगितले की ही आपल्या देशाची सुंदरता आहे की इथे अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्माचे लोक मिळूनमिसळून राहतात. आपल्या या रहेजा सोसायटीमध्येही वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक राहतात आणि आज आपण एकत्र रोजा इफ्तार करणार आहोत. जर असे कार्यक्रम सतत होत राहिले तर आम्ही उज्ज्वल भारताकडे वाटचाल करू. याचे सुंदर चित्र इथे दिसत आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आज जसे आम्ही खांद्याला खांदा लावून बसलो आहोत, अल्लाह आपल्याला स्वर्गातही एकत्र करो, आमीन.

अरफा फरीद यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहील यांनी उत्तमरित्या पार पाडले. यानंतर सर्वांनी एकत्र बसून रोजा इफ्तार केला. इफ्तारनंतर या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget