(२९) आपला हात गळ्यात अडकवू नका आणि त्याला एकदम सैलदेखील सोडू नका की तुम्ही तिरस्कृत व लाचार बनून राहावे.१२
(३०) तुझा पालनकर्ता ज्याच्यासाठी इच्छितो, विपूल उपजीविका करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो, तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर ठेवणारा आहे आणि त्यांना पाहत आहे.
(३१) आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हालासुद्धा. वस्तुत: त्यांना ठार करणे एक मोठा अपराध आहे.
(३२) व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग.
(३३) कोणाचीही हत्या करू नका जिला अल्लाहने निषिद्ध ठरविले आहे, परंतु न्याय व सत्यानिशी आणि जी व्यक्ती अन्यायाने ठार केली गेली असेल तिच्या वारसास आम्ही किसास (बदला) च्या मागणीचा हक्क दिला आहे.१३ म्हणून त्याने हत्येसंबंधी मर्यादा ओलांडू नये१४ त्याला मदत दिली जाईल.१५
१२) ‘हात बांधून घेणे’ ही कंजूसपणासाठी उपमा आहे व हात मोकळे सोडण्याने वायफळ खर्च अभिप्रेत आहे.
१३) मूळ शब्द ‘त्याच्या वलीला आम्ही सुल्तान प्रदान केले आहे’ असे आहेत. सुल्तानने या ठिकाणी ‘प्रमाण’ अभिप्रेत आहे ज्याच्या आधारे तो किसास (बदला) ची मागणी करू शकतो.
१४) हत्या करण्यात मर्यादा ओलांडण्याचे अनेक प्रकार असू शकतात व त्या सर्वांची मनाई आहे. उदा. सुडाच्या आवेशात अपराध्याशिवाय इतरांनाही ठार करणे, किंवा अपराध्याला यातना देऊन मारणे, अथवा ठार केल्यानंतर त्याच्या शवावर राग काढणे, अथवा खुनाचा मोबदला वसूल केल्यानंतर पुन्हा त्याला ठार करणे, इ.
१५) त्या वेळपर्यंत इस्लामी राज्य प्रस्थापित झाले नव्हते म्हणून, त्याला मदत कोण करील या गोष्टीचा उलगडा केलेला नाही. हिजरतनंतर जेव्हा इस्लामी राज्य प्रस्थापित झाले तेव्हा त्याला मदत करणे त्याच्या मित्रांचे किंवा त्याच्या जातबिरादरीचे काम नव्हे तर इस्लामी राज्य व त्याच्या न्यायसंस्थेचे काम आहे, असे निश्चित केले गेले. कोणत्याही व्यक्तीला अगर समूहाला स्वत:च सूड घेण्याचा अधिकार नाही तर हे अधिकारस्थान इस्लामी राज्याचे आहे की न्याय मिळविण्यासाठी त्याची मदत मागितली जावी.
Post a Comment