जलचक्र एक ईशसंकेत
नैसर्गिक संसाधने ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मानवांसाठी देणग्या आहेत. जमिनीवरील बर्फ, द्रवरूप पाणी आणि समुद्रातील खारे पाणी नेहमी त्याच अवस्थेत राहत नाही. या एकाच अवस्थेत राहिलेले पाणी सजीवांसाठी किंवा माणसांसाठी फारसे उपयोगातही येत नाही. याचा पुरेपूर आणि योग्य वापर होण्यासाठी जलचक्र चालवले जाते, जेणेकरून जास्तीत जास्त पाणी उपभोगता येईल. वनस्पतीशास्त्राच्या पर्यावरण या शाखेत जलचक्र या घटकाला फार महत्त्व आहे.
कुरआनमध्ये अध्याय अन्-नहल च्या १० आणि ११ क्रमांकाच्या आयातीमध्ये याचा उल्लेख आहे,
तोच आहे ज्याने आकाशांतून तुमच्यासाठी पर्जन्यवृष्टी केली ज्याने तुम्ही स्वतः देखील तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठी सुद्धा चारा उत्पन्न होतो. तो त्या पाण्याद्वारे शेती फुलवितो आणि जैतून व खजूर व द्राक्षे आणि तऱ्हेतऱ्हेचे फळे निर्माण करतो. यात तर मोठा संकेत आहे त्या लोकांसाठी जे गांभीर्याने विचार करतात."
निसर्गकर्त्याने येथे त्या प्राण्यांचा उल्लेख केला आहे ज्यापासून मनुष्याला मांस, अंडी, दुध आणि इतर फायदे मिळतात. या दोन आयतींमध्ये अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यांना अन्न म्हणून वनस्पती आपल्या शरीरासाठी पुरवतात. तसेच यामध्ये ज्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यात आले आहे ते म्हणजे अल्लाह आकाशातून पाऊस पाडतो, ते तुम्ही स्वतःही पित असता आणि पृथ्वीवर जे पाणी बरसते ते तुमच्यासाठी पृथ्वीतच साठवून ठेवले जाते. मग तेच पाणी, तीच जमीन, तीच हवा आणि तोच सूर्यप्रकाश पण पृथ्वीवर एक नव्हे, तर लाखो प्रकारच्या वनस्पती उगवतात. ज्यामध्ये झुडपे, औषधी वनस्पती, गवत आणि फळे न येणारे झाडे व फळझाडे आणि यांचे असंख्य प्रकार आहेत. त्यापैकी काही गुरांसाठी चारा बनतात आणि काही आपल्यासाठी अन्न म्हणून उपयोगात येतात. या सगळ्यात जलचक्र महत्वाचे कार्य पार पाडते. ज्यामध्ये महासागरातून पाण्याची वाफ होणे, मग ढगांच्या रूपात ते वाहणे, मग पावसाच्या रूपात पडणे, मग त्याच पाण्याने पृथ्वीला सिंचित करणे इत्यादी गोष्टी येतात, हे असे का होते?
कारण पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी अन्न पुरवण्यासाठी वनस्पती वेळोवेळी शुद्ध पाणी पावसाच्या रूपात मिळवतात. तसेच अतिरिक्त पाणी कालव्याच्या स्वरूपात इतर भागातील जमिनीला सिंचनासाठी वाहून नेले जाते आणि यातून उरलेले अतिरिक्त पाणी नंतर समुद्रात जमा होते. समुद्रातून बाष्पीभवन होऊन परत त्याचे ढग बनतात. या साऱ्या चक्रात आपल्यासाठी आणि आपल्या जनावरांसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे, पण ही व्यवस्था स्वयंचलित आहे का? की ती एखाद्या ज्ञानी आणि जाणकार अस्तित्वाकडून चालवली जात आहे? निश्चितच ही संपूर्ण व्यवस्था एकमेव निर्मात्याद्वारे चालवली जात आहे ज्यामध्ये अन्य कोणाचाही हस्तक्षेप नाही.
जरी अल्लाहने या संपूर्ण व्यवस्थेसाठी भौतिक नियम बनवले आहेत, तरीही या संपूर्ण व्यवस्थेची लगाम त्याच्याच हातात आहे, ज्याचा पुरावा हा आहे की एखाद्या ठिकाणी वर्षभरात एका विशिष्ट ऋतूमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि कधी कधी खूप कमी. जर हा फक्त भौतिक नियमांचा खेळ असता तर यामध्ये फेरबदल होणे अशक्य असते. परंतु या गोष्टी त्या लोकांना समजणे जास्त सोपे आहे जे श्रद्धा ठेवतात. बाकिच्यांना तर नैसर्गिक संसाधने आणि इतर नैसर्गिक देणग्या वापरण्याशी मतलब आहे असे वाटते.
(क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment