सध्या देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. या वेळेच्या निवडणुकांना एक प्रकारचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मग कोणत्याही पक्षाला/आघाडीला बहुमत मिळाले तरी भारताची राजकीय, सामाजिक वगैरे परिस्थिती जशी सध्या आहे तशी निवडणुकीनंतरही राहणार आहे का हा गहन प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. पण नेमके हे कोण नागरिक आहेत ज्यांना निवडणुकीच्या निकालामुळे बदललेल्या परिस्थितीशी वाईट असो की चांगली तोंड द्यावे लागणार? भारतातील कमी-अधिक ७५ टक्के नागरिकांना निवडणुकांशी तेवढी काही देणे घेणे नाही, जसे बाकीच्या नागरिकांना आहे. या वर्गाला निवडणुकांचा निकाल कोणत्या बाजुने लागणार याची म्हणून जास्त काळजी आहे.
सध्या जेथे निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडले यामध्ये असे दिसून आले की मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा कमी झालेली आहे. याचा सरळसरळ अर्थ असा की गेल्या निवडणुकीत ज्या लोकांना वाटत होते की हीच सत्ता परत यावी त्यांनासुद्धा आता तसे वाटत नसेल. आणि ज्यांना असे वाटते की विरोधी पक्षांची सत्ता यावी त्यांना अशी खात्री नाही की ती सत्ता येईलच. म्हणूनच दोन्ही बाजुंच्या मतदारांमध्ये या निवडणुकीत मागील निवडणुकांसारखा उत्साह नाही. पक्षच नाही तर मतदारसुद्धा उदासीन आहे. ज्यांना बदल हवा त्यांना खात्री नसल्याने ते उदासीन आहेत आणि ज्यांना पूर्वीचीच सत्ता हवी आहे तेसुद्धा त्या सत्ताधाऱ्यांशी उदासीन आहेत. म्हणून निवडणुकांमधला सारा उत्साह जणू निघूनच गेला... नव्हे गेला होता, कारण निवडणुका व्हाव्यात आणि भाजपने सांप्रदायिक वळण देऊ नये हे शक्यच नाही. भाजपचा एकमेव राजकीय ठेवा म्हणजे सांप्रदायिकता, धार्मिक द्वेष! यापलीक़डे त्यांची बुद्धिमत्ता गेलीच नाही. सध्या चालविल्या जात असलेल्या बौद्धिक वर्गामध्ये जे शिकवले जाते त्यानुसार त्यांच्या बुद्धिमत्तेच्या विचारसरणीची जडणघडण होते. बाहेरचे जग तर सोडा, भारत देशात काय काय आहे, बौद्धिक पातळीवर देश किती संपन्न आहे आणि किती संपन्न होता, कसे कसे विद्वान या देशात जन्माला आले, त्यांनी कशी या देशाची सेवा केली यातलं काहीही त्यांना माहीतच नाही. सांगायचे झाल्यास भलामोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणताना या धर्माचे विद्वान त्या धर्माचे विद्वान असा फरक केला जात नाही. सारे विद्वान या देशाचे/राष्ट्राचे वारस आहेत. भाजप विचारसरणीत अशा लोकांची दिशाभूल केली जाते की या देशात फक्त एकाच धर्माचे लोक इथले नागरिक आहेत, पण त्यांना इतिहास माहीत नाही. कारण ते ऐकीव ज्ञानावर आपले विचार मांडत असतात. आपण या देशातील काही लोकसंख्येला आदिवासी म्हणतो, त्याचा अर्थ काय? त्यांना सोडून बाकीचे सर्व या देशाचे निवासी नाहीत. सारेचे सारे घूसखोर आहेत. त्यांचा इतिहासच त्यांना माहीत नाही आणि ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांचा इतिहास इतिहासजमा होतो.
या घूसखोरांमध्ये काही लोक इराणकडून आले, त्यापूर्वी आफ्रिकेतून आले. त्यानंतर यूरोपमधून आले. यूरोपमधून आलेल्या घूसखोरांना तर त्याचा अभिमान आहे. ते म्हणतात की यूरोपीय आर्य आमचे भाऊबंद आहेत. मात्र ४ टक्के घूसखोरांना तसेच ५-६ उद्योगपतींना खरे पाहता पैशाच्या संपत्तीतून सर्वांत जास्त ७०-८० टक्के वाटा दिला जातो, पण नाव मात्र दुसऱ्याचे घेतात. कारण लोकांना वस्तुस्थिती माहीत होऊ नये.
सध्याच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे जो निरुत्साह दिसत होता, जी उदासीनता होती ती शेवटी सांप्रदायिकतेची फोडणी देऊन या निवडणुकीमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न झालाच. मतदार त्याला कसे बळी पडतात की पडत नाहीत हे निकाल लागल्यावर माहीत होईल!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment