Halloween Costume ideas 2015

इफ्तार पार्टी @ के क्लिफ रिसॉर्ट


मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये “इफ्तार” पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये व टीव्हीवर झळकत असतात. बहुतांशी या पार्ट्या राजकीय व सिनेसृष्टीच्या समाजाशी निगडित असतात. त्यामुळे सर्वसामान्य इतर धर्मीय लोकांना या इफ्तार पार्टीविषयी कुतूहल असते.

होळीनिमित्त धुळवडीचाचा सण नुकताच २५ मार्च म्हणजे सोमवारी, आदल्या दिवशीच जोशपूर्ण साजरा झाला होता. त्या आसपास मला माझा जीपीएस कॉलेज वर्गमित्र, इम्तियाज शेखचा फोन आला की आपण आपल्या जीपीएस कॉलेज मित्रांसाठी एक इफ्तार पार्टी मंगळवारी (२६ मार्च २०२४) ठेवू या का? 

ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो ती घटना प्रत्यक्षात येणार या कल्पनेने मी अतिशय खुशीने होकार दिला. अशा नेक कामासाठी आमचा एडमिन व खास मित्र लतीफभाई सय्यदने सर्व प्राथमिक तयारी केली.

साधारण ४५ वर्षांपूर्वी इम्तियाज शेख आणि मी, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, सोलापूरला तीन वर्ष डिप्लोमाला एका वर्गात शिकत होतो. आमच्या वर्गातील सिनियर, सभ्य आणि हुशार मुलगा असा इम्तियाज भाईचा लौकिक होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या त्याच्या प्राविण्‍यामुळे कॉलेज संपल्यानंतर त्याला टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाली. चाळीस वर्षे प्रतिष्ठित नोकरी केल्यानंतर तो सन्मानाने निवृत्त झाला. त्याच्या सत्कर्मामुळे व पुढची पिढी कर्तबगार असल्यामुळे तो निवृत्तीपश्चातचे जीवन आनंदाने व समाधानाने व्यतीत करत आहे. तो मुस्लिम धर्माचा गाढा अभ्यासक व समाज सुधारक आहे.

इम्तियाज भाईच्या अगत्यपूर्ण आमंत्रणाचा स्वीकार करून, आम्ही तीस जीपीएस मित्र संध्याकाळी सहा वाजता कोळेवाडी येथे ‘के क्लीफ रिसॉर्ट’वर जमा झालो. संध्याकाळच्या सुंदर वातावरणात, नेहमीप्रमाणे, नयनरम्य डोंगरा आड जाणाऱ्या सूर्यास्ताचा आनंद घेतल्यानंतर लगेच रिसॉर्टच्या लॉनवर आमची गोलमेज परिषद चालू झाली. या इफ्तार पार्टीचे मुख्य यजमान आयोजक इम्तियाज भाई शेख, अजीमुद्दीन शेख करीमुद्दीन शेख सर, इम्तियाज अख्तर सर यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. संध्याकाळी सहा ते पावणे सातपर्यंत इस्लाम, कुरआन, रमजान, रोजा, इफ्तार याविषयी शुद्ध मराठी ओघवत्या भाषेत माहिती सांगितली. संध्याकाळच्या पावणे सात वाजता सर्वशक्तिमान ईश्वर अल्लाहचे आभार मानत खजूर आणि फळांच्या डिशचा आस्वाद घेऊन पहाटे साडेपाच वाजल्यापासून ठेवलेला उपास म्हणजेच रोजा सोडण्यात आला. त्यानंतर मुस्लिम बंधूंनी नमाज पठण केले.

त्यानंतर कुरकुरीत भजी व चहा कॉफीचा आस्वाद घेत धर्म रूढी-परंपरा व समज-गैरसमजांवर आधारित अशा प्रश्नोत्तरांचा संवाद तासभर रंगला. शेख आणि मित्र कंपनीने सर्व शंकाचे अभ्यासपूर्ण निवारण केले. त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

इफ्तार म्हणजे काय?

दिवसभराच्या उपवासानंतर दिवस मावळल्यानंतर खजूर, विविध फळे, शराबत किंवा पाणी प्राशन करून उपवास सोडला जातो त्याला रोजा इफ्तार असे म्हंटले जाते. इफ्तार हे संध्याकाळचे जेवण आहे, ज्याने मुस्लिम त्यांचे रोजचे रमजान उपवास संपवतात. मगरीबच्या प्रार्थनेसाठी अजान झाल्यावर, नमाज अदा केली जाते आणि ८.३० ते ९.४० या वेळात रोज ३० दिवस विशेष नमाज अदा केली जाते यास तरावीह असे म्हटले जाते.

भारतातील तसंच जगभरातील मुस्लिम नागरिक सध्याला ईद-उल-फित्रच्या तयारीत आहेत. मुस्लिम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लिम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण म्हणूनही ओळखला जातो. 

ईद-उल-फित्र म्हणजे काय?

रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.

ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल. रमजान ईदचा सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे येतो, त्यामुळे त्याच्या क्रमानुसार प्रत्येक ऋतूमध्ये तो साजरा केला जातो. आहार नियंत्रणामुळे ‘रमजान’ वा ‘रमदान’मध्ये वजन कमी होऊ शकते. रमजान महिना म्हणजे मुस्लिम वर्षाचा नववा महिना, ज्या दरम्यान सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कठोर उपवास केला जातो. 

ईद साजरी कशी करतात?

ईदच्या दिवशी मुस्लिम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात. ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला फितरा असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लिम व्यक्ती हा फित्रा देऊन नमाज पठण करण्यास जाते. नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते. एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना ईद-मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. शीरखुर्मा हे पेय सामान्यतः रमजान महिन्याशी संबंधित असते आणि ते ईदच्या दिवशीच बनवले जाते.

रमजान म्हणजे काय?

रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लाम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणून हा रमजान महिन्याचा रोज़ा (उपवास) आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला कुरआनात सांगितल्याप्रमाणे पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं. रमजान महिन्यातच पवित्र कुरआन या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं अवतरली गेलीत, अशी इस्लाम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुरआन पठणावर अधिक भर दिला जातो. शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लिम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

रमजान काळातील दिनचर्या कशी असते?

रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवण केलं जातं. या वेळी जे जेवण केलं जातं, याला सहरी किंवा सहूर असं म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार म्हटलं जातं. रमजानच्या काळात दान करण्यालाही इस्लाम धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. संयम, सदाचार यांचं पालन करून अल्लाहसोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी मित्र, नातेवाईक एकत्र येऊन जेवण करतात, मित्र-नातेवाईकांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. इस्लाममध्ये धूम्रपान, मद्यपान आणि नशापान यास सक्त मनाई आहे. रमजान महिन्यात औपचारिक प्रार्थना (नमाज) आणि उपवास (रोजा) यासह काही औपचारिक धार्मिक पद्धतींने, कुरआन पठणामध्ये विशेष लक्ष दिले जाते.

तरावीह म्हणजे काय?

रमजान महिन्यात तरावीहसुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी मशिदीत करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असं संबोधतात. फक्त रमजान महिन्यातच तरावीह प्रार्थना केली जाते, हे विशेष.

रमजान आणि ईदचे दिवस कसे मोजले जातात?

इस्लामी कॅलेंडरमध्ये १२ महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. तर रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. इस्लामी कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना हा २९ किंवा ३० दिवसांचा असतो. चंद्रोदयापासून हे दिवस मोजले जातात. जगभरात इंडोनेशियापासून मोरोक्कोपर्यंत अत्यंत मोठ्या भौगोलिक प्रदेशात मुस्लिम देश पसरलेले आहेत. त्यामुळे या देशांमध्ये होणाऱ्या चंद्रोदयाच्या वेळेत फरक असू शकतो. त्यामुळे ही वेळ ठरवण्यासाठी सौदी अरेबिया येथील मक्का हे स्थान गृहीत धरण्यात आलेलं आहे. येथे चंद्र दिसल्यापासून इस्लामी कॅलेंडरमधील एक दिवस ग्राह्य धरला जातो, अशी माहिती आमच्या या मित्रांनी दिली. पाश्चिमात्य कॅलेंडरपेक्षा लुनार कॅलेंडरमध्ये ११ दिवस कमी असतात.

रोजा कोण करू शकतो?

इस्लाम धर्मीयांमध्ये निरोगी असलेल्या व्यक्तीनेच रोजा करावा, अशी सूचना आहे. लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवासाने त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट आहे. 

इफ्तार मुबारक संदेश हे रमजानच्या पवित्र महिन्यात मित्र, कुटुंब आणि प्रियजनांना व इतर धर्मीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याचा एक मार्ग आहे. हे संदेश सद्भावनेचा पाया आहेत. आणि समुदाय म्हणून एकत्र उपवास सोडण्याच्या महत्त्वाच्या कृतीची आठवण करून देतात. रमजानमध्ये काय करावे व काय करू नये, याची संहिता सर्वश्रुत असते व त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. 

इस्लाममध्ये स्त्रियांचा विशेष मानसन्मान केला जातो. अनैतिक दु:ष्कृत्याला मुस्लिम देशांमध्ये भयंकर शिक्षा दिली जाते. काफिर शब्दाचा अर्थ इम्तियाज अख्तर साहेबांनी उदाहरणासह समजावून सांगितला. शिक्षणाविषयी जागृती या समाजात वाढते आहे, हे त्यांनी सांगितले. 

इफ्तार हा रमजानच्या धार्मिक उत्सव बहुतेक वेळा सांप्रदायिकरित्या आयोजित केला जातो, लोक विश्रांतीसाठी एकत्र येतात. मुस्लिमेतर बांधव या काळामध्ये अभिनंदन करण्यासाठी वा प्रोत्साहन देण्यासाठी इफ्तार पार्टीमध्ये सामील होतात. चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते.

मुस्लिम समाजाविषयी विनाकारण गैरसमज, वेगवान सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात अफवाद्वारे पसरवले जात आहेत. त्याचे निर्मूलन करण्यासाठी, समाज प्रबोधन व सर्वधर्म समभावाची सध्याला सक्त जरुरी आहे.

रमजान महिन्यातच 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. 

अतिशय पवित्र असा रमजान आपला संयम वाढवतो. तहान भुकेवरचे व शारीरिक तसेच मानसिक भाव भावनेवर नियंत्रण मिळवून देतो. 

जन्नत म्हणजे काय? ती मिळवण्यासाठी काय करावे लागते याबद्दल चर्चा झाली.

समाजातील आर्थिक दरी बुजवण्याचे काम या महिन्यात केले जाते.  “गरीबांसाठी, हा नेहमीच रमजान महिना आनंददायी असतो.”

रमजानमध्ये दरवाजे आणि अंतःकरण उघडावे. समाजातील अशिक्षित, अज्ञानी, गरीब, दीनदुबळ्यांना नेहमी मदत करावी, असे चर्चेतून निष्पन्न झाले.

आदरणीय अजीमूद्दीन शेख, करीमूद्दीन शेख, इम्तियाज अख्तर, सलीम मुनावर, सलीम शेख, अजहर सलीम शेख, मुजाहिद गढवाल, इम्तियाज शेख आणि लतीफ सय्यद या सर्व मुस्लिम बांधवांनी इतर मित्रांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे देऊन समाधान केले. अतिशय सहज सुंदर वातावरणात हे चर्चासत्र घडून आले.

त्यानंतर हसत खेळत, विनोदी वातावरणात, गप्पा मारत,रात्री पावणे आठ वाजता रिसॉर्ट मध्ये लज्जतदार जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. आमच्या रिसॉर्टमधील मॅनेजमेंटचे अथर्व, वैभव, मानस व रिसॉर्ट टीमने सर्वांची मनापासून या स्पेशल इफ्तार डिनरची चोख व्यवस्था ठेवली. संध्याकाळचे निसर्गरम्य वातावरण, बैठक रचना, अभ्यासू चर्चा, फोटोग्राफी, खाद्यपदार्थांचा दर्जा व एकूण संपूर्ण व्यवस्थेबद्दल रिसॉर्ट मॅनेजमेंटचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.

रात्री नऊ वाजता इम्तियाज शेख व मित्रमंडळींनी खजूर बॉक्स व चार धार्मिक पुस्तकाचा संच भेट म्हणून सर्व मित्रांना दिला. 

एकूण “इफ्तार” कार्यक्रम अविस्मरणीय झाल्याबद्दल माझे मनोगत मी बोलून दाखवत सर्वांचे आभार मानले. माझ्या एकूण सहा दशकाच्या जीवन कालखंडामध्ये मनात दडून राहिलेल्या इस्लाम धर्माच्या अनुषंगाने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मला या इफ्तार पार्टीमध्ये मिळाल्याचे समाधान खूपच होते. त्यानंतर “शब्बा खैर” म्हणत आम्ही सर्वजण मार्गस्थ झालो.


- विलास बाबर

पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget