भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. सध्याच्या पिढीतील अधिकांश लोक हे स्वातंत्र्यानंतर जन्मले आहेत. स्वातंत्र्याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. यासाठी अगणित स्वातंत्र्ययोध्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, शहीद झाले. स्वातंत्र्याच्या उच्च विचारांनी प्रेरित तत्कालीन समाजधुरीनांनी जनतेची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी यथायोग्य पावले उचलली. प्रत्येक माणसाचा सन्मान व प्रतिष्ठा जपणारी लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद तसेच व्यक्तिगत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व संस्कृती यांचे स्वातंत्र्य ज्यामुळे नवराष्ट्राचे ऐक्य व एकात्मता दृढ होईल हा मानवतावादी पायाभूत विचार देशाची राज्यघटना (संविधान) अंमलात आणून रुजवला. या तत्त्वविचारांनीच देशाची जडणघडण झाली. लोकशाहीच्या सर्व सामाजिक संस्था व सार्वजनिक साधन सुविधा या आधारानेच भरभराटीला आल्या. एक व्यक्ती व देशाचे नागरिक म्हणून दुर्बल, वंचित, शोषित, पीडित, समाजाला जगण्याचा हक्क व अधिकार मिळाला. शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे, शेती, व्यवसाय, नोकरी, बँका, दळणवळण व इतर साधन सुविधा यांचे सरकारीकरण, सार्वत्रिकरण, सार्वजनिकरण यामुळे आपण खऱ्या अर्थाने देशाचे स्वतंत्र व सार्वभौम नागरिक झालो. सातवी, मॅट्रिकपर्यंत शिकलेले अनेक जण शिक्षक, सरकारी व प्रशासकीय नोकरी, बँका, पोष्ट, रेल्वे, पोलीस व सरकारी उद्योग धंदे यांमध्ये दाखल झाले. पुढच्या आणखी एक दोन पिढ्या उच्च शिक्षण घेऊन आणखी वरच्या पदापर्यंत पोहोचल्या.
परंतु काही स्वार्थी, मतलबी, विद्वेषी व विकृत मनोवृत्तीची माणसे सातत्याने हे भारतीय सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत होती. शेकडो वर्षापासून या देशांमध्ये सर्व जाती, धर्माची व वेगवेगळ्या संस्कृतीची एक मिली-जुली संस्कृती, गंगा-जमुनी तहजीब जपणारी माणसे गुण्यागोविंदाने राहत आलेली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी मिळून बाजी लावली. वेगवेगळ्या जाती धर्माचे स्वातंत्र्यवीर हातात हात घालून फासावर चढले. एकमेकासाठी प्राणांची आहुती दिली. जे लोक या स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हते व ज्यांनी इंग्रजांची नाही तर पूर्वीच्या सर्वच सत्ताधीशांची चाकरी केली असे स्वार्थी लोक सामाजिक जीवनात विष कालवण्याचे काम करीत होती. कारण सामाजिक वर्चस्वाची सारी सूत्रे यांच्या हातातून निसटली होती. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, जाती-धर्म आणि भेदाभेदाचे हे विष हळूहळू पसरत गेले. मंडल-कमंडल, आरक्षण, मंदिर-मस्जिद अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक षडयंत्रातून ही विषवल्ली वाढतच गेली. सच्चे, प्रामाणिक, पापभीरु, धर्मभीरु माणसे संभ्रमित होवून या विषाला कळत नकळत बळी पडली. याचा आता ब्रह्मराक्षस झाला आहे. आणि देशावर काळ बनून घाला घालत आहे. सर्व देशालाच गिळंकृत करायला टपलेला आहे.
ज्या स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाच्या आधारावर हा देश उभा राहिला आहे तो आधारच उध्वस्त करायचा प्रयत्न हे सैतानी लोक करत आहेत. आज देशाचे संविधान सर्वोच्च आहे. या संविधानिक मूल्यांच्या पायावर उभारलेल्या सर्व प्रकारच्या लोकशाही संस्था, सामाजिक संस्था, सरकारी संस्था, शासन, प्रशासन नष्ट करून काही स्वार्थी, मतलबी उच्चवर्गीय लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय वर्चस्व देशावर लादून देशाला पुन्हा एकदा गुलामीच्या वाटेवर न्यायचे आहे. समाजातील समता, बंधुता व सौहार्द संपवून विषमतावादी, भेदभावपूर्ण, विकारी, संकुचित विचारधारा रुजवायची आहे. ज्यामध्ये फक्त काही ठराविक उच्च जात वर्गीय लोकांचे हित असेल.
या सर्व विषारी षडयंत्राचा सर्वात जास्त मुस्लिम समाज बळी ठरलेला आहे. धर्म संस्कृतीच्या आधारावर वेगळे ठरवून बहुजन हिंदू समाजाला त्यांचे विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात ब्राह्मणी धर्म संस्कृती बहुजनावर लादून उदोउदो मात्र बहुजन हिंदू संस्कृतीचा केला जातो. ब्राह्मणी धर्म संस्कृती ही बहुजनांच्या धर्म संस्कृती पेक्षा वेगळी आहे. परंतु बहुजनांची दिशाभूल करून ब्राह्मणी धर्म संस्कृतीचे वर्चस्व त्यांचेवर लादले जाते व त्यांना एक प्रकारे मानसिक गुलाम केले जाते. बहुजनांचे देवधर्म, पूजाअर्चा, रितीरिवाज वेगळे असून त्यामध्ये कोठेही भट, बामण, पुरोहिताची मध्यस्थी व दलाली लागत नाही. परंतु मानसिक गुलामीमुळे ते भट, बामणाकडे जातात. बहुजनांचे देव हे ‘बा’ आणि ‘आई’ च्या स्वरूपात असतात आणि त्यांची उपासना, पूजा पद्धती अतिशय साधी देवाला पाने फुले वाहून किंवा प्रसंगी कोंबडे बकरे बळी देऊन मनोभावे प्रार्थना करणे अशी असते. परंतु जन्म कुंडली, राशि भविष्य, यज्ञयाग, होम हवन, पुजापाठ, शांती, कर्मकांड अशा बामणी षडयंत्राच्या बहुजन समाज आहारी जातो. मुस्लिम व कांही इतर धर्म संस्कृती वाले मात्र या ब्राह्मणी कर्मकांडाच्या वर्चस्वाखाली येत नाहीत. त्यांची धर्म संस्कृती, उपासना पद्धती अगदी वेगळी आहे त्यामुळे त्यांना वेगळ्या धर्म संस्कृतीच्या नावाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जातो.
मुस्लिमांच्या बदनामी व राक्षसीकरणाचे हे षडयंत्र स्वातंत्र्यापासूनच सुरू झाले आहे. देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरवून देशात अनेक ठिकाणी दंगली घडवून आणल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या घडवून त्याचा आळ व गुन्हा मुस्लिमांच्यावर घालायचा प्रयत्न केला गेला. त्यानंतरही देशात अनेक ठिकाणी काही ना काही कारणाने दंगली होतच राहिल्या. मुस्लिमांच्या पाठीमागे हे शुक्लकाष्ठ साधारण 1980 च्या दशकापासून मोठ्या प्रमाणात लागले आहे. बाबरी मस्जिद आंदोलनानंतर तर नेतेमंडळींनी मुस्लिमांवर उघड उघड शिवीगाळी, दमण, हिंसाचार सुरू केला. 1992 चे बाबरी कांड व त्यानंतरचे बॉम्बस्फोट प्रकरणाने सारा देश हादरून गेला होता हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. मुस्लिमांना संशयित, दहशतवादी, देशाचे शत्रू ठरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. यासाठी इतिहासाचा विकृतपणे वापर केला गेला. सामान्य बहुजनांची माथी भडकावण्यात आली. अनेक निष्पाप मुस्लिमांना संशयित, दहशतवादी म्हणून सरळ सरळ वर्षांनुवर्षे तुरुंगात दाबून ठेवले. शिकल्या सवरल्या तरुणांना दहशतवादी, देशद्रोही संघटनांच्या नांवावर अक्षरशः वर्षानुवर्षी कोठडीत डांबून उध्वस्त केले. विषाची पेरणी सुरूच होती. अशातच 2002 साली गुजरात कांड घडवून आणले. देश अक्षरशः सुन्न व थिजून गेला होता. या सगळ्या अमानुष गोष्टींचा वापर पद्धतशीरपणे मुस्लिमांना शत्रू ठरवत मुस्लिमांचे हिंदुत्वाचे राजकारण उभे केले. आपण तरुण असाल तर यानंतरच्या अनेक अमानवी घटनांचे आपण साक्षीदार आहात.
अमानुषतेचा हा क्रूर खेळ दिवसेंदिवस वाढतच गेला. आजची देशाची सामाजिक, राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे. हा सैतानी आगडोंब सगळ्या देशालाच गिळंकृत करायला टपलेला आहे. केवळ मुस्लिमच नाही तर दलित, आदिवासी, मागास व संपूर्ण बहुजन समाजाला याने वेढले आहे. अनेक ठिकाणी मंदिर-मज्जिद प्रकरणे, कब्रस्तान जमीन, अतिक्रमणे, बेकायदेशीर मदरसे, धार्मिक रितीरिवाज, लव जिहाद, लँड जिहाद, माॅबलिंचींग, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा व आदर्श, आक्षेपार्ह वर्तन, मोबाईल स्टेटस, खाणपान, पोशाख अशा अनेक गोष्टीं व व्यवहारावर आक्षेप व बंधने लावण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसंगी स्थानिक वातावरण बिघडवून दंगल करून मुस्लिमांची घरे, मस्जिदीं, मदरसे, उद्योग, व्यवसायावर हल्ले केले जात आहेत. अशावेळी मुस्लिमांकडून कांही प्रतिकार झालाच तर पोलिस, प्रशासना मार्फत दडपशाही केली जाते. अशा घटनेत सामिल लोकांचे घरांवर, उद्योग, धंदे व व्यवसायांवर बुलडोझर चालवला जात आहे. अशा हिंसेतून प्रसंगी मुस्लिमांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. एखाद्या निष्पाप जीवाला हिंस्र व माथेफिरू जमावाने हल्ला करून ठार मारणे हे अमानुष व रानटीपणाचेच लक्षण आहे. रमेश बिधुडी सारखे बीजेपीचे खासदार एका मुस्लिम खासदाराला संसदेत जातीधर्माच्या नावाने उघड उघड शिवीगाळ करून देशातून हाकलून देण्याची भाषा करतात. त्याचेवर कोणतीच कारवाई होत नाही. उघड उघड मुस्लिमांची मते नाकारली जात आहेत. इतर पक्षांना देशद्रोही ठरवले जात आहे. मुस्लिमांवर एकप्रकारे सामाजिक, राजकीय अस्पृश्यताच लादली जात आहे. आज सर्वार्थाने मुस्लिम समाजाचे जीवन आणि जगणे धोक्यात आलेली आहे. हा सगळा मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय असंघटन व दुर्बलतेचा परिणाम आहे.
आज भारत एक स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान मानणारा देश म्हणून प्रत्येकाला प्रतिष्ठा, सन्मान, सुरक्षितता व विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. परंतु लोकशाहीच्या सर्व संस्था यांनी आपल्या विचारांनी भ्रष्ट केल्या आहेत. सर्व संस्थांमध्ये यांनी आपली माणसे पेरली आहेत. ही माणसे फक्त आणि फक्त स्वतःच्या हिताचेच काम करतात. देशाचे संविधान संपवण्याचा व्यवहार सर्वत्र दिसून येत आहे. मनमानी, हुकूमशाही, दमणकारी, फॅसिस्ट प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. ‘अब की बार ४०० पार’ च्या घोषणा देशाचे संविधान व लोकशाहीचे स्वरूप बदलण्याचे दुष्ट हेतूने केल्या जात आहेत. त्यामुळे एकंदरीतच देशाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक जीवन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, लोकशाही, संविधानाचा आधार व पाया पूर्ववत मजबूत व्हावा. समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्म धर्मनिरपेक्ष मूल्ये जपली गेली पाहिजेत. हाच सामाजिक व राजकीय विचार दृढ करून अशा व्यक्ती, पक्ष, संघटना व चळवळी यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. सत्य, न्याय, नैतिकतेचा सामाजिक, राजकीय लोकशाही विचार जोपासणारा समाज निर्माण झाला तर प्रत्येकाला एक चांगले सन्मानित जीवन जगता येईल. मुस्लिमांनीही धर्मांधता व कट्टर वाद सोडून स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाची मूल्ये जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर समाज बांधवांशी समता, बंधुता व सौहार्दाचे जीवन जगता येईल. त्यांनीही अशाच व्यक्ती, पक्ष, संस्था व संघटनांना पाठबळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे एक सशक्त, सुदृढ, निकोप, कल्याणकारक, प्रगतिशील समाज व लोकशाही देशात सर्वांचे हिताचे रक्षण होईल.
(पूर्वार्ध)
- शफीक देसाई
सामाजिक कार्यकर्ते
Post a Comment