पोंछकर अश्क अपनी आँखों से
मुस्कुराओ तो कोई बात बने
सर झुकाने से कुछ नहीं होता
सर उठाओ तो कोई बात बने
नफरतों के जहां में हमको
प्यार की बस्ती बसानी हैं
दूर नहीं कोई कमाल नहीं
पास आओ तो कोई बात बने
मजान संपल्या-संपल्या जमाअते इस्लामी हिंद तर्फे देशभरात ईद मिलन कार्यक्रमांना सुरूवात झालेली आहे. या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी जमाअतचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत. वर्तमानपत्रातून अशा कार्यक्रमांचे फोटो वाचकांनी पाहिले असतील. फोटो आणि त्याखालची बातमी यातून ईद मिलनाच्या कार्यक्रमाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होत नाही म्हणून या विषयावर संक्षेपमध्ये लेख लिहून वाचकांपर्यंत या कार्यक्रमांचा उद्देश काय आहे हे पोहोचविण्यासाठी हा लेखन प्रपंच.
ईद मिलन तो बहाना है
आपस में संवाद बढाना है
जेव्हापासून 4जी स्मार्ट फोन आणि स्वस्त इंटरनेटचा सुळसुळाट वाढला आहे तेव्हापासून समाजात संवाद तुटलेला आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये पूर्वी जसे एकत्र येण्याची अनेक कारणं उपलब्ध होती. उदा. नाटक, मैदानी खेळ, वादविवाद स्पर्धा इत्यादी. या गोष्टी आता जवळ-जवळ संपुष्टात आलेल्या आहेत. खेळ सुद्धा आपण आता एकांतात बसून मोबाईलवर पाहण्यात आनंद मानतो. एकाच घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांकडे स्वतंत्र स्मार्ट फोन असल्यामुळे प्रत्येकजण घरात असूनसुद्धा एकटा आहे. मुलांचा पालकांशी, पालकांचा मुलांशी, पतीचा पत्नीशी, पत्नीचा पतीशी, भावाचा बहिणीशी, बहिणीचा भावाशी संवाद आतापावेतोच्या सर्वात कमी पातळीवर येवून स्थिरावलेला आहे. अशात समाजा-समाजामध्ये संवाद होणे कठीणच झालेले आहे. संवाद खुंटल्यामुळे दुरावा वाढलेला आहे. बहुसंख्य बांधवांशी अल्पसंख्यांकांचा संवाद बहाल करावा व दोन्ही समाजामध्ये होत असलेला दुरावा कमी करावा या उदात्त हेतून जमाअते इस्लामी हिंद विविध कार्यक्रम आयोजित करत असते. ईद मिलन त्यातल्या त्यात एक असा कार्यक्रम असतो ज्यात बहुसंख्य समाजाची मंडळी मोठ्या प्रमाणात आनंदाने सहभागी होत असतात.
युनान, फारस व रूमा सब मिट गए जहां से
लेकिन अभी है बाकी नामो निशां हमारा
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा
थोडकयत आपसात संवाद साधून राष्ट्रहित साध्य करण्यासाठी ईद मिलनाचे कार्यक्रम जमाअते इस्लामी हिंद आयोजित करत असते. ज्याप्रमाणे 20 टक्के शरीर पंगू ठेवून कोणताही खेळाडू कुठल्याही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे 20 टक्के अल्पसंख्यांना बाजूला सारून कोणताही देश आंतरराष्ट्रीय पातळीवर महासत्ता बनू शकत नाही. कोणत्याही देशाला महासत्ता बनविण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. 1. मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि निर्यात. 2. राजकीय स्थैर्य 3. सामाजिक न्याय. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे कितपत आहेत याचा प्रत्येक वाचकाने स्वतंत्रपणे विचार करावा. भांडवलशाही लोकशाही व्यवस्था ही कल्याणकारी व्यवस्था असल्याचे मानले जाते. आपल्या देशातही हीच व्यवस्था आहे. ही कल्याणकारी आहे तर वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे? व्याजाचा विळखा नागरिकांच्या गळ्याभोवती का आवळला जात आहे? समाजातील प्रत्येक गटात वर्षागणिक आत्महत्यांचा दर का वाढत आहे? बेरोजगारी दिवसेंदिवस का वाढत आहे? राजकीय भ्रष्टाचार हिमालया एवढा का वाढत आहे? संविधान हजारो कायदे, लाखो पोलिस, हजारो न्यायालय, लाखो वकील, हजारो न्यायाधीश असून सुद्धा गुन्हेगारी का वाढत आहे? आर्थिक विषमता वाढून देशाची संसाधने मुठभर लोकांच्या हातात का गोळा होत आहे? शिक्षण घेणे महाग का होत आहे? आरोग्य सुविधा सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर का जाताहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जबाबदार नागरिकांनी एकमेकांशी संवाद करणे गरजेचे आहे की नाही? या गरजेपोटीच ईद मिलनाचा कार्यक्रम नेमाने जमाअते इस्लामी हिंद घेत असते.
एक महत्त्वाचा प्रश्न वाचकांना मी विचारू इच्छितो तो म्हणजे इंग्रजही बाहेरून आले होते आणि मुस्लिम राजेही बाहेरून आले होते. इंग्रजांनी या देशाला कधीच आपला देश मानला नाही. त्यांनी येथील संसाधने लूटून ब्रिटनला नेली, शेवटी स्वतःही ब्रिटनला निघून गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी भारतीय नागरिकांना गुलामासारखी वागणूक दिली. तरी बहुसंख्य बांधवांना इंग्रजांनी त्यांच्या देशांविषयी प्रचंड आपुलकी आहे. मुस्लिम शासक भलेही बाहेरून आले, या देशावर शासन केले. येथील संसाधनांचा येथेच वापर केला. ते राहिले देखील येथेच. मरण पावले देखील येथेच. त्यांच्या काळात स्थानिक लोकांवर अत्याचार झाले नाहीत असे नाही. परंतु, इंग्रजांच्या तुलनेत मात्र कमी झाले एवढे नक्की. असे असतांना मुस्लिम शासकांविषयी पराकोटीचा द्वेष का? या प्रश्नाचे उत्तर असे की, इंग्रजांची अनैतिकतेवर आधारित चंगळवादी जीवनशैली आपल्या देशातील बहुसंख्यांकांनाच नव्हेच अल्पसंख्यांकांना सुद्धा आकर्षित करते. याउलट इस्लामची नैतिकतेवर आधारित साधी (कदाचित रूक्ष) परंतु, शितल जीवनशैली कोणालाच आकर्षित करत नाही. परंतु, ही कुरआनवर आधारित ईश्वराने निश्चित केलेली जीवनशैली हीच सर्व मानवसमाजासाठी या लोकीच नाही तर परलोकी सुद्धा यशस्वी करणारी आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी नेमाने ईद मिलनचा कार्यक्रम आयाजित केला जातो.
जगाच्या इतिहासावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी एक गोष्ट ठळकपणे लक्षा त येते ती म्हणजे दुराचाऱ्यांच्या व भ्रष्टाचाऱ्यांच्या नेतृत्वात आदर्श व्यवस्थेची रचना होऊच शकत नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी बसचे उदाहरण घेऊ. गृहित धरा आपल्याला पूर्वेकडे एका गावी जायचे आहे. आपण बसमध्ये बसलो तिकीट घेतलं, कंडा्नटरने डबल बेल दिली आणि चालकाने बस सुरू केली. थोड्याच वेळात प्रवाशांच्या लक्षात आले की, बस आपल्या गंत्वय दिशेकडे न जाता पश्चिमेकडे जात आहे. प्रवाशांनी आरडा ओरडा केला तरी चालक काही दाद देत नाही तो पिलेला असल्याचेही लक्षात आले. अशा परिस्थिती प्रवाशांच्या कहातात काहीच राहत नाही. चालक ज्या दिशेला बस जाईल त्या दिवशी नाईलाजाने त्यांना फरपटत जावे लागेल. देश ही एका बस प्रमाणे आहे. याचे स्टेरींग जर का आपण चांगल्या लोकांच्या हातात दिले तर ते देशाला योग्य दिशेला घेऊन जातील आणि जर का जात, पात, धर्म, पैसा, दारू इत्यादी घेऊन देशाचे स्टेरिंग अनैतिक आणि भ्रष्ट चालकाच्या हातात दिले तर तो देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, यात शंका नाही. लोकशाही ही लोण्यासारखी असते. ज्याप्रमाणे दूध चांगले असेल तर त्यापासून तयार होणारे लोणी दुधापेक्षा चांगले निघेल. जर का दूध विषारी असेल तर त्यापासून निघणारे लोणी दुधापेक्षा जास्त विषारी असेल. हीच गोष्ट समस्त नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून ईद मिलनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. चांगले चालक निवडण्याची संधी आहे. ही संधी नागरिकांनी वाया घालू नये. हे या निमित्ताने मी स्पष्ट करू इच्छितो. आदर्श शासन व्यवस्था जगामध्ये कधी अस्तित्वात होती का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. अशी व्यवस्था 40 वर्षे अस्तित्वात होती. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वातील मदीनेतील दहा वर्षांची सत्ता आणि त्यानंतर 4 पवित्र खलीफांची 30 वर्षांची सत्ता ही मानवी इतिहासामध्ये आदर्श अशी लोकशाही व्यवस्था होती. या व्यवस्थेपूर्वी अरबस्थानमध्ये राहणाऱ्या रानटी समाजाचेे रूपांतर इस्लामी खिलाफतीच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये नैतिक समाजामध्ये झाले. जे अरबी लोक दारूवर प्रचंड प्रेम करत होते त्यांनी कुरआनमध्ये नशाबंदीची आयत अवतरीत झाल्या बरोबर एका क्षणात दारू सोडली. अशी सोडली की आज 1400 वर्षानंतरही त्या लोकांनी दारूला हात लावला नाही. जे लोक मुलींना जीवंत जमिनीमध्ये पुरत होते त्या लोकांनी मुलींना आपल्या संपत्तीतून वारसा हक्क देण्यास सुरूवात केली. विधवांच्या इद्दतीची मुदत संपण्यापूर्वीच त्यांना पुनर्विवाहाचे प्रस्ताव येवू लागले. मक्का शहरातून आलेल्या मुहाजीरांना मदीना येथील अन्सारनी अशी मदत केली की त्यांच्या त्यागाचे दुसरे उदाहरण आजपर्यंत सापडू शकलेले नाही. या 40 वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा उमवी, अब्बासी आणि उस्मानी खिलाफतीचा काळ जो की 3 मार्च 1924 रोजी संपला. आदर्श जरी नसला तरी आजच्या जागतिक लोकशाही पेक्षा (काही अपवाद वगळून) कितीतरी पटीने चांगला होता.
इस्लामी व्याजमुक्त अर्थव्यवस्था, व्याजावर आधारित भांडवलशाही व्यवस्थेपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्याची क्षमता इस्लामच्या परदा व्यवस्थेमध्ये आहे. याचा परिचय करून देण्यासाठी ईद मिलनचा कार्यक्रम घेतला जातो. थोडक्यात देशाला, देशाच्या संविधानाला, लोकशाहीला आणि कुटुंब व्यवस्थेला वाचवायचे असल्यास इस्लामशिवाय पर्याय नाही. हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ईद मिलनच्या निमित्ताने संवाद साधला गेला पाहिजे. म्हणूनच जमाअते इस्लामी हिंदतर्फे ईद मिलनचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment