वर्षभरात सर्वात आनंदी, उत्साही, सुखी, त्यागी आणि नैतिकतेने भरपूर असा महिना कोणता असेल तर तो रमजानचा महिना. या महिन्याने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतात. हे बदल पुढील 11 महिने जर कायम ठेवले तर मनुष्य वर्षभरही खऱ्या सुखाचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही. रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहिली. तो आला आणि महिनाभर जीवन जगण्याचे प्रशिक्षण देऊन गेला. खरं तर हा महिना प्रत्येक इमानधारकासाठी दररोज ईद असल्याचीच अनुभूती देऊन गेला.
मित्रानों! रमजान जीवनाला ईशमार्गावर चालण्याचे वळण देऊन जातो. ईश्वराच्या निर्मितीवर चिंतन, मनन, मंथन करण्यास भाग पाडतो. ईश्वर कुरआनमध्ये ईमानधारकांना उद्देशून सांगतो की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 110) मित्रानों, या आयातीमधून अल्लाहने ईमानधारकांना किती मोठ्या उद्देशासाठी निर्माण केले आहे हे लक्षात येते. या आयातीच्या परीपेक्षात मुस्लिम बांधवांनी आपले आयुष्य कसे जगावे आणि काय करावे, हे सांगितले आहे. त्यासाठीच प्रत्येक वर्षी रमजानमध्ये आपल्या रोजेधारकांना अल्लाह याची आठवण खडतर प्रशिक्षणातून करून देत असतो.
मित्रांनों! प्रेषित सल्ल. यांचे जीवन चालतेबोलते कुरआन होते. म्हणून त्यांची वचने अर्थात हदीसही फक्त वाचून चालत नाही तर त्यानुसार आचरण करायला सुरूवात केल्यास जीवनाला खरी दिशा मिळते. आनंद मिळतो तो वेगळाच. कुरआन वाचताना नवनवीन आणि मनाला भिडणारी आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी माहिती समोर येते. कधी-कधी तर वाटते मी ईश्वराशी संवादच साधत आहे. कुरआनचे मार्गदर्शन ईश्वरीय असल्याने ते मन,मस्तीष्क आणि हृदयात खोलपर्यंत रूजते. त्यामुळे जीवन जगताना ते वारंवार समोर येते आणि माणूस नैतिकतेच्या चौकटीत आपले जीवन जगायला सुरूवात करतो आणि खऱ्या जगण्याचा आनंद घेतो. कुरआनने सांगितले की, सत्य आणि असत्य कधीच बराबर चालू शकत नाहीत. चांगले आणि वाईट कधीच मिसळू शकत नाहीत. व्याज, भ्रष्टाचार, व्याभिचार, जुगार, निंदानालस्ती, चहाडी, चोरी, राग, भांडण-तंटे यापासून वारंवार स्वत:ला वाचविण्याची ताकीद करतो. जगताना याच गोष्टी माणसाचा घात करत असतात. अनाथ, गरीब, मजूर यांच्याशी सद्वर्तन करण्याची वारंवार ताकीद करतो, दान, धर्म करायला प्रेरित करतो. रमजानमध्ये जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून दान करण्याच्या महत्वास अधोरेखित केले आहे.
रमजानची शिदोरी कायम कशी ठेवायची...
रमजानमध्ये सर्वात मोठी गोष्ट शरीराशी आणि मनाशी जडली ती म्हणजे संयम. परोकोटीचा संयम हा रोजा आपल्यात घडवून आणतो. त्यामुळे प्रत्येक काम संयमाने आणि हिकमतीने करण्याकडे आपला कल असला पाहिजे. रोजाच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या आचार, विचार आणि कृतीला नैतिक मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक गरजवंत आणि सर्वांशी प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवत असतो. तो हिरहिरीने समोरच्या रोजाधारकाला सहेर आणि इफ्तारसाठी आपल्याकडील खाद्यपदार्थ पुढे करत असतो. रमजाननंतरही आपण हीच पद्धत दैनंदिन जगण्यात अवलंबवण्याकडे मनाला वळवावे. हीच पद्धत आहे जी मनांना जोडते.
मित्रानों! वाईट गोष्टींकडे वळणे हा मानवी मनाचा स्वभावगुण आहे. पण याला खरे वेसण हे कुरआनचे मार्गदर्शनच घालू शकते. मी अनेक लोकं पाहिली आहेत ज्यांचे विचार चांगले असतात मात्र आचरणात गडबड दिसून येते. पुरोगामीत्वाच्या गोष्टी करतील मात्र व्याज, व्याभिचारापासून दूर राहताना दिसत नाहीत. संधी मिळेल तिथे हात मारताना दिसतील. मित्रानों! कुरआनमध्ये ईश्वर सांगतो, माणूस तोट्यात आहे. हे खरचं आहे. आजचं जीवन पाहिले तर माणसाला पावलोपावली वाईटाचा सामना करावा लागत आहे. त्याला परीक्षा द्यावी लागत आहे. मित्रानों! तोच खरा व्यक्ती जो पराकोटीचा संयम बाळगून आपले पाऊल चांगल्याच मार्गाकडे टाकतो. तो आपल्या आशा आणि आकांक्षा वैध ठेवतो.
रमजानमधील खडतर प्रशिक्षणातून प्राप्त करण्यात आलेले संयम, तक्वा, धैर्य पुढच्या अकरा महिन्यापर्यंत अमलात आणण्याचा दृढ निश्चय करा. वेळ काढून दररोज कुरआनचे पठण समजून करा. निश्चितच ते तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जाईल. अल्लाह मला, तुम्हाला आणि समस्त भारतीयांना ईश्वरीय मार्गदर्शनाप्रमाणे चालण्याची सद्बुद्धी आणि समज देओ. आमीन.
- बशीर शेख, उपसंपादक
Post a Comment