सहाबियात (कोण होत्या त्या?)
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या काळातल्या श्रद्धावंत महिलांना सहाबियात म्हटले जाते. प्रेषित सल्ल. यांच्या पत्नीं, त्यांच्या मुली, त्यांच्या श्रद्धावंत नातेवाईक महिला, (आत्या, काकू) तसेच इतर श्रद्धावंत महिलांचा समावेश आहे. सहाबियत शूर, आज्ञाधारक, कष्टाळू, सत्यवान, अतिशय दयाळू होत्या. एका-एका सहाबियांच्या चारित्र्यावर एक -एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येऊ शकते. पण सदरचा लेख म्हणजे समुद्राला एक वाटीत सामावण्याचा एक प्रयत्न.
षित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नींना ’उम्महातुल मोमीनीन’(श्रद्धावंतांच्या आई) असे संबोधले जाते. यात सर्वात प्रथम क्रमांक येतो हजरत खदीजा (रजि.) यांचा. हजरत खदीजा रजि. पैगंबर सल्ल. यांच्या पहिल्या पत्नी होत. पैगम्बरांशी निकाहच्या अगोदर त्या दोन वेळा विधवा झाल्या होत्या. पहिल्या पतीचे नाव अबुहाला आणि दुसऱ्याचे अतिक बिन अयाज मखझुमी होते. ह. खदीजा रजि. या मक्केतील श्रीमंत महिला होत्या. त्यांचे वडील मोठे व्यावसायिक होते. आजच्या युगात अतिशय सुंदर 25 वर्षाचा असा कोण तरूण आहे का जो 40 वर्षाच्या, दोनदा विधवा झालेल्या, 3 मुलं असणाऱ्या महिलेशी विवाह करण्यास तयार होईल? प्रेमात अंध झालेले काही तरूण कदाचित तयार ही होतील पण हा प्रेमविवाह नव्हता. पैगम्बर मुहम्मद सल्ल. यांचा प्रामाणिकपणा व त्यांच्या चारित्र्याची स्तुती आपल्या गुलाम मैसराच्या तोंडी ऐकून हजरत खदीजा रजि. यांनी स्वतः निकाहचा पैगाम त्यांची मैत्रिण नफिसा मार्फत दिला. जो प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुबुल केला. त्यांनी लग्नानंतर आपले सर्वस्व आपले पती मुहम्मद सल्ल. यांच्या सुपूर्द केले. त्या पैगम्बर सल्ल. यांना नेहमी हर प्रकारे पाठिंबा देत. खदीजा रजि. सर्वात प्रथम व्यक्ती होत्या ज्यांनी एकमात्र अल्लाहच निर्माणकर्ता आणि पैगम्बर मुहम्मद सल्ल. हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत याची ग्वाही दिली. पैगंबर सल्ल. यांच्या वैवाहिक जीवनाच्या (38 वर्षे) दोन तृतीयांश काळ त्या सोबत राहिल्या. जोपर्यंत हजरत खदीजा रजि. जिवंत होत्या प्रेषित सल्ल. यांनी दूसरा विवाह केला नाही. ते खदीजा रजि. यांच्यावर खूप प्रेम करायचे व मृत्यूनंतरही नेहमी त्यांची आठवण करायचे. पैगम्बर सल्ल. यांना ह. खदीजा रजि. यांच्यापासून 4 मुली व 2 मुले होती. फक्त इब्राहीम हे मारिया किबतीया रजि. यांच्यापासून होते.
65 व्या वर्षी हजरत खदीजा रजि. यांचे निधन झाले. त्यांना मक्काच्या हजून नावाच्या डोंगरातील कब्रस्तानात दफन केले गेले. पैगम्बर सल्ल. यांनी स्वतः त्यांचा दफनविधी केला. पण नमाजे जनाजा अदा केली नाही कारण तोपर्यंत नमाजे जनाजाचा आदेश आला नव्हता. सही बुखारी हदीस नं. 6278 मध्ये हजरत आएशा रजि. म्हणतात की ’’मला प्रेषित सल्ल. यांच्या कोणत्याही पत्नीशी इतकी इर्ष्या नव्हती जितकी खदीजा रजि. यांच्याशी होती. कारण पैगम्बर सल्ल. त्यांची खूप आठवण करायचे. अल्लाह व जिब्रईल अलै. सलाम यांनी खदीजा रजि. यांना सलाम पाठविला होता.
सैय्यदा सौदा बिन्त जमआ रजि. या पैगम्बर सल्ल. यांच्या दूसऱ्या पत्नी होत्या. त्यांची उंची सर्वात जास्त होती आणि वय ही पैगम्बर सल्ल. यांच्या इतके म्हणजे विवाहाच्या वेळेस दोघांचे वय बरोबर 50 वर्षे होते. त्यांचे वजनही जास्त होते. पैगम्बर सल्ल. यांनी त्यांच्याशी विवाह का केला? आज तरूण मुले स्थूल मुलीशी विवाह करणे पसंत करत नाहीत. किती तरी मुली फक्त स्थूल असल्यामुळे विवाहापासून वंचित राहिल्या आहेत. पैगम्बर सल्ल. यांच्याजवळ लग्नासाठी मापदंड फक्त चारित्र्यसंपन्नता होते आणि त्यांनी जगाला हा नवीन मापदंड दिला. याच्यावर जर आजचे तरूण चालले तरी कितीतरी मुलींचा विवाह सहज होऊन जाईल. हजरत खदीजा रजि. यांच्या निधनानंतर हजरत सौदा रजि. यांनी कौशल्यपूर्णपणे पैगम्बरांच्या घराची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या 4 मुलींचे संगोपन सख्या आईसारखे केले. त्या कातडी रंगविण्याचे काम करीत आणि जे काही कमवित सर्व दानधर्म करीत. खदीजा रजि. यांच्या निधनानंतर 4 वर्ष पैगम्बर सल्ल.यांच्या निकाहमध्ये त्या एकट्याच होत्या. त्यांचे पहिले पती सकरान नावाचे व्यक्ती होते व त्यांना एक मुलगाही होता. सकरानच्या निधनानंतर त्यांनी ह. पैगम्बर सल्ल यांच्याशी निकाह केला होता.
3. हजरत आयेशा रजि. या पैगम्बर सल्ल. यांच्या तिसऱ्या पत्नी व हजरत सौदा रजि. यांच्या सवत. पण हजरत सौदाचा व्यवहार हजरत आयशा रजि. यांच्याची एवढा प्रेमळ होता की, हजरत आयशा म्हणतात की, ’’मला वाटायचे माझी आत्मा हजरत सौदा रजि. यांच्या शरीरात असेल. हजरत सौदा रजि. यांच्यात हसद (इर्ष्या) नावालाही नव्हती.’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी हजरत आयशा रजि. यांच्याशी निकाह अल्लाहच्या आदेशावरून केला होता. पैगम्बर सल्ल. यांना तीन वेळा स्वप्नात एक मुलगी रेशममध्ये गुंडाळलेली दाखविली गेली आणि सांगण्यात आले, ’’ह्या तुमच्या पत्नी आहेेत’’ पाहिल्यावर आयशा रजि. होत्या. (सही बुखारी हदीस नं. 7012). प्रेषितांचे स्वप्न हे खरे असतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. फरमावितात हे अल्लाहकडून असेल तर मी हे पूर्ण करेन आणि मग त्यांनी ह.आयशा रजि. यांचे वडील ह.अबुबकर रजि. यांना निकाहचा पैगाम पाठविला व त्यांनी तो स्विकारला. अरब देशज्ञच्या हवामानात मुली लवकर तारूण्यात येतात. 9 वर्षात त्यांची रूखस्ती झाली अगदी सोप्या पद्धतीने निकाह झाला. हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे की आपण ही अतिशय साध्या पद्धतीने विावह करावा. जेणेकरून मुलीच्या पित्याला मुली या ओझे वाटणार नाहीत. हजरत आयशा रजि. खूप ज्ञानी होत्या.
तीन उम्महातुल मोमीनीन यांना कुरआन तोंडपाठ होते. हजरत आएशा रजि, हजरत हफ्सा रजि. आणि हजरत उम्मे सलमा रजि.. हजरत आएशा रजि. या चांगल्या व्नत्या व उपदेशिका होत्या. लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या होत्या. हजरत आयशा रजि. वर पैगम्बर खूप प्रेम करायचे. पाणी न मिळाल्यास वजू ऐवजी तयम्मूम करायचे. या आयाती हजरत आयशा रजि. यांच्यामुळे अवतरीत झाल्या. हजरत जिब्रईल यांनी हजरत आयशा रजि. यांना सलाम पाठविले. आयशा रजि. यांच्या हुजऱ्यामध्ये पैगम्बर सल्ल. यांचा शेवटचा दिवस व्यतीत झाला. आजही तो हुजरा (खोली) आपल्या पूर्वस्थितीत आहे. आयशा रजि. बाबत लिहिने खूप अवघड आहे. या छोट्याशा लेखामध्ये त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अनेक गोष्टी सामावू शकत नाहीत.
4. सय्यदा हफ्सा रजि. : ह्या हजरत उमर रजि. यांच्या कन्या होत. ज्यांच्याशी प्रेषित सल्ल. यांच्याशी लग्न झाले. हजरत अबुबकर रजि. यांनी कुरआन लेखी स्वरूपात हफसा रजि. यांच्याकडे ठेवले होते. कारण त्या अमीन (वस्तूंना खूप जपणाऱ्या होत्या.)
5. जैनब बिन्त खुजैमा रजि. (उम्मुल मसाकिन) या सुद्धा पैगम्बर सल्ल. यांच्या पत्नी होत. त्यांना गोरगरीबांच्या आई म्हटले जाई. त्यांचा विवाह 3 हिजरीमध्ये प्रेषित सल्ल. यांच्याशी झाला. त्या फक्त 2-3 महिनेच निकाहत राहिल्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हजरत खदीजा रजि. नंतर पहिले निधन त्यांचेच झाले.
6. उम्मेसलमा बिन्त अबी उम्मया (रजि.) : यांचे वडील खूप श्रीमंत उद्योगपती होते. पूर्ण कबिल्याचा खर्च स्वतः करत म्हणून ’’झादूर्राकीब’’ ही पदवी त्यांना मिळाली. 4 हिजरीत त्यांचा निकाह झाला. पहिले पती अबुसलमा होते. त्यांच्या निधनानंतर प्रेषित सल्ल. यांनी त्यांची नमाजे जनाजा 9 तकबिरांनी अदा केली. (असे 4 तकबिर असतात.) प्रेषितांना विचारल्यावर त्यांनी फरमाविले ते हजार तकबिराचे लायक होते. हजरत आयशा रजि. यांच्यानंतर या सर्वात ज्ञानी पत्नी होत्या. त्यांना सर्वात दीर्घ आयुष्य लाभले. 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अबुहुरैरा रजि. यांनी नमाजे जनाजा अदा केली. त्या जन्नतुलबकी मध्ये दफन आहेत.
7. सय्यदा जैनब बिन जहेश रजि. : या प्रेषित सल्ल. यांच्या आत्याची मुलगी. अरबमध्ये ही प्रथा होती की मानलेल्या मुलाच्या पत्नीशी विवाह अवैध होता पण अल्लाहने वहीच्या मार्फत यांचा निकाह करून ही प्रथा मोडली. यांच्या निधनानंतर गोरगरीबांत हाहाकार माजला. कारण त्या खूप सदका (दान) देत होत्या.
8. सय्यद जुवेरिया रजि. : या ’’जिव’’ सरदार हारिस बिन अबी जिरारच्या लेक होत्या. नेहमी आपल्या जिभेला अल्लाहच्या जिक्र (जप)ने ओली ठेवायच्या. एकदा नमाजे फज्रपासून चाश्त पर्यंत त्या जिक्र करत होत्या. पैगम्बर सल्ल. यांनी 4 कलीमे शिकविले आणि म्हटले हे त्या जिक्रपेक्षा भारीआहेत. ते हे ’’सुबहानल्लाही व बिहम्दीही, अदद खलकीही व रिजा नफसीही व झिनत अरशीही व मिदाद कलिमातीही’’ हे कलमे तीन वेळा सकाळी पठन केल्यास प्रचंड जिक्रचे पुण्य मिळते. 65 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्या 6 वर्ष प्रेषित सल्ल. यांच्या सोबत राहिल्या.
9. उम्मे हबीबा रजि. : यांचे नाव रमला होते. 6 हिजरीत निकाह झाला. त्या अबु सुफियानच्या लेक होत्या. त्यांनी 165 हदीस रिवायत केल्या. उम्मे हबीबा यांनी एकदा प्रेषित सल्ल. यांना सांगितले होते, आपण माझी बहीण उझ्झाशी ही लग्न करा. त्यावर पैगम्बर सल्ल. यांनी सांगितले की, ’’पत्नीच्या हयातीत तिच्या बहिणी सोबत निकाह अवैध आहे.’’
10. सफिया बिन्त हुइ्ई बिन अखतब रजि. : त्या ज्यू होत्या. त्या 17 वर्षाच्या होत्या पण अगोदर त्यांचे दोन निकाह झाले होते. त्यांचे पती व भाऊ युद्धात शहीद झाले होते. पावणे चार वर्षे सफिया रजि. प्रेषित सल्ल. यांच्यासोबत राहिल्या.
हजरत आयशा रजि. म्हणतात, ’’मी सफिया रजि. पेक्षा चांगला स्वयंपाक करणारी नाही पाहिली’’ खूप सत्यवान होत्या. स्वतः पैगम्बर सल्ल. यांनी ग्वाही दिली.
11. सैयद्दा मैमूना बिन्त हारिस : यांचे मूळ नाव बररा होते ते बदलून पैगम्बर सल्ल. यांनी मैमूना ठेवले. 7 हिजरीमध्ये त्यांचा निकाह झाला होता. 3 वर्षे चार महिने त्या प्रेषित सल्ल. यांच्या सोबत राहिल्या. त्यांना गुलामांना आजाद करणे आवडत होते.
* सय्यद मारिया किबतिया रजि. या मिस्त्र (इजिप्त) च्या मकोकस बादशाह ने 7 हिजरीमध्ये प्रेषित सल्ल. यांना तोहफ्यामध्ये दिले होते. त्या खूप सुंदर होत्या. यांच्याशी इब्राहीम हे पुत्र झाले. जे 16-17 महिन्यात त्यांचे निधन झाले.
* सय्यद रेहाना या ज्यू वंशाच्या होत्या. कैदी म्हणून आल्या. प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले ’’वाटल्यास इस्लाम कुबूल करा किंवा तुमच्या धर्मावर रहा’’ पण त्यांनी इस्लाम व मुहम्मद सल्ल. यांना पसंत केले. (क्रमशः)
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
Post a Comment