(८८) मूसा (अ.) ने८६ प्रार्थना केली, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! तू फिरऔन आणि त्याच्या सरदारांना ऐहिक जीवनात ऐश्वर्य८७ व मालमत्तेने८८ उपकृत केले आहेस, हे पालनकर्त्या, काय हे अशाकरिता आहे की - त्यांनी लोकांना तुझ्या मार्गापासून बहकवावे? हे पालनकर्त्या! यांची संपत्ती नष्ट कर आणि यांच्या हृदयांवर अशी मोहर लाव की यांनी श्रद्धा ठेवू नये जोपर्यंत की ते दु:खदायक प्रकोप पाहात नाहीत.’’८९
(८९)सर्वश्रेष्ठ अल्लाहने उत्तरादाखल फर्माविले, ‘‘तुम्हा दोघांची प्रार्थना स्वीकारली गेली, दृढ राहा आणि त्या लोकांच्या पद्धतीचे मुळीच अनुकरण करू नका ज्यांना ज्ञान नाही.’’९०
(९०) आणि आम्ही बनीइस्राईलना समुद्रपार नेले. मग फिरऔन व त्याचे सैन्य जुलूम व अत्याचाराच्या हेतूने त्यांच्या मागे निघाले येथपावेतो की जेव्हा फिरऔन बुडू लागला तेव्हा उद्गारला, ‘‘मी मान्य केले की खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही ज्यावर बनीइस्राईलनी श्रद्धा ठेवली आणि मीदेखील आज्ञाधारकांपैकीच आहे.’’९१
(९१) (उत्तर दिले गेले) ‘‘आता श्रद्धा ठेवतोस? एरव्ही या आगोदरपर्यंत तर अवज्ञा करीत राहिलास आणि उपद्रव माजविणाऱ्यांपैकी होतास.
(९२) आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेतासच वाचवू जेणेकरून तू नंतरच्या पिढ्यांकरिता उद्बोध-चिन्ह ठरावे.९२ जरी बरीचशी माणसे अशी आहेत जे आमच्या संकेताकडे दुर्लक्ष करीत आहेत.९३
(९३) आम्ही बनीइस्राईलना फार चांगले ठिकाण दिले९४ व फार उत्तम उपजीविका प्रदान केली मग त्यांनी आपापसात मतभेद केले नाही परंतु त्या वेळी जेव्हा ज्ञान त्यांच्यापर्यंत आले होते.९५ नि:संशय तुझा पालनकर्ता पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निर्णय लावील ज्यामध्ये ते मतभेद करीत राहिले आहेत.
८६) वरील आयती आदरणीय मूसा (अ.) यांच्या आवाहनाच्या आरंभिक युगाशी संबंधित आहेत. ही प्रार्थना इजिप्त्मधील वास्तव्याच्या अंतिम समयी केलेली आहे. मध्ये बराचकाळ लोटला आहे ज्याचे वर्णन येथे केले नाही. दुसऱ्या ठिकाणी कुरआनमध्ये या मधल्या काळाचे विस्तृत विवेचन सापडते.
८७) म्हणजे ठाठबाट, शान आणि संस्कृती व सभ्यतेची ती प्रतिमा ज्यामुळे जग त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर खूष आहे. प्रत्येकाला त्यांच्यासारखे आपण व्हावे असे वाटते.
८८) म्हणजे संसाधन अधिक मात्रेत उपलब्ध असल्याने आपल्या उपायांना व्यवहारात आणण्यासाठी त्यांना सहज शक्य होते. सत्यावादी याच्या अभावामुळे आपल्या उपयांना व्यवहारात आणू शकत नाहीत.
८९) आम्ही आताच सांगितले आहे की ही प्रार्थना मूसा (अ.) यांनी इजिप्त् निवास काळात अंतिम समयी केली होती. त्या काळी एकामागून एक चमत्कार पाहूनही आणि जीवन धर्माची युक्ती पूर्ण होऊनसुद्धा फिरऔन आणि त्याचे सरदार असत्यावर कायम होते. सत्याचा विरोध ते निकराने करीत होते. अशा वेळी पैगंबर जी बद्दुवा (शाप) करतो त्याप्रमाणेच घडते. याविषयी नाकारणाऱ्यांविरुद्धचा अल्लाहचा निर्णय निश्चित आहे. त्यांना यानंतर ईमान धारण करण्याचे सौभाग्य प्राप्त् होत नाही.
९०) जे लोक वास्तविकतेला जाणत नाहीत आणि अल्लाहच्या युक्तीला समजत नाहीत. तसेच सत्य बाजूची कमजोरी आणि सत्य स्थापित करणाऱ्यांच्या विफलता आणि असत्याच्या पुढाऱ्याचे थाट आणि भौतिक प्रगती पाहून असे लोक विचार करू लागतात की अल्लाहला हेच स्वीकार्य असेल. अल्लाहच्या विद्रोहीचे जगावर राज्य असावे किंवा असत्याच्या मुकाबल्यात सत्याची बाजू अल्लाहने घेतली नाही असा अविचार त्या लोकांचा होतो आणि ते नादान लोक शेवटी अशा निष्कर्षावर येतात की सत्य स्थापन करणे अशा स्थितीत अशक्य आहे. आता हेच शहाणपणाचे आहे की थोड्याशा धार्मिकतेने संतुष्ट होऊन बसून राहावे ज्याची परवानगी विद्रोही आणि धोकेबाज शासन व्यवस्थेत आज मिळत आहे. या आयतमध्ये अल्लाहने आदरणीय मूसा (अ.) यांना आणि त्यांच्या अनुयायांना याच गैरसमजूतीपासून दूर राहण्याची ताकिद केली आहे. अल्लाहच्या सांगण्याचा हेतू येथे हा आहे की धैर्याने आणि संयमाने याच प्रतिकूल परिस्थितीत काम करत जावे. असे होऊ नये की तुम्हीसुद्धा त्या गैरसमजूतीत पाडावे जसे अज्ञानी आणि अविचारी लोक सामान्यत: अशा स्थितीत गैरसमजूत करून घेतात.
९१) बायबलमध्ये या घटनेचा उल्लेख आला नाही परंतु तलमुदमध्ये स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की बुडताना फिरऔन ओरडून म्हणत होता, ''मी तुझ्यावर ईमान धारण केले. हे खुदावंद! तुझ्याशिवाय कोणी दुसरा खुदा नाही.''
९२) अद्याप हे स्थान सीना प्राय:द्विपाच्या पश्चिमी तटावर विद्यमान आहे. येथे फिरऔनचे शव पाण्यात वाहताना दिसले होते. यास 'जबले फिरऔन' म्हणतात. याच्याचजवळ गरम पाण्याचा स्त्रोत आहे ज्यांस स्थानिक लोकांनी `फिरऔनचे स्नानगृह' म्हटले आहे. हे ठिकाण अबू जैनमापासून काही मैल वरच्या बाजूला उत्तरेकडे आहे. स्थानिक लोक याच ठिकाणी फिरऔनचे शव मिळाले होते असे म्हणतात.
फिरऔनचे शव काहिरा संग्राहालयात अद्याप आहे. ज्यास आजच्या शोध कार्याने मूसा (अ.) यांच्या काळातील फिरऔन सिद्ध केला आहे. इ. स. १९०७ मध्ये सर ग्राफ्टन इलियटस्मिथ याने त्याच्या ममीवरून जेव्हा पट्ट्या खोलल्या तेव्हा त्याचे शव पूर्णत: मिठाने आच्छादित होते. खाऱ्या पाण्यात बुडून मरण्याची ही स्पष्ट निशाणी होती.
९३) म्हणजे आम्ही बोधप्रद निशाण्या दाखवितच जाऊ. परंतु बहुतेकांची ही स्थिती आहे की मोठमोठ्या बोधप्रद निशाण्या पाहूनसुद्धा त्यांचे डोळे उघडत नाहीत.
९४) म्हणजे इजिप्त्हून बाहेर पडल्यावर पॅलेस्टाईनची भूमी.
९५) म्हणजे नंतर त्यांनी आपल्या धर्मात भेद निर्माण केले आणि नवनवीन धर्म स्थापन केले याचे कारण हे नव्हते की त्यांना वास्तविकतेचे ज्ञान दिले गेले नव्हते. माहीत नसताना त्यानी विवश होऊन नवीन धर्म बनविले असे नाही, तर हे सर्व त्यांच्या मनाच्या दुष्टतेचे परिणाम होते. अल्लाहकडून त्यांना स्पष्ट सांगितले गेले होते की सत्यधर्म हा आहे. त्याचे नियम, निकड आणि मागण्या तसेच एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वातील फरक, आज्ञापालन म्हणजे काय आणि अवज्ञा कशाला म्हणतात इ. सर्वांचे ज्ञान त्यांना होते. त्यांना माहीत होते की अल्लाहसमोर कर्माचा हिशेब द्यावा लागणार आहे. अल्लाहने जीवनव्यवस्थेसाठी घालून दिलेले सर्व नियम त्यांना माहीत होते; परंतु या स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी एका धर्माचे अनेक धर्म आणि एका ईश्वराऐवजी अनेक ईश्वर बनून टाकले. अल्लाहने दिलेल्या मूलभूत तत्त्वांना सोडून दुसऱ्या तत्त्वांवर आपापले धर्म उभे केले.
Post a Comment