समाज हा एक मोठा कळपच आहे, खरं तर कळपानं रहातात ती जनावरं....! अर्थात माणसाला ही "मनुष्यप्राणी" असचं संबोधलं जातं. तोही सुरुवातीला जनावरांसारखंच जंगलात, वनात रहात असे, कंदमुळं हेच त्याचे जगण्याचे साधन होतं. काहीवेळा प्राणी-पक्षी मारून तो सामिशआ हार ही करायचा, पण जंगलात एकदा काहीतरी कारणाने वणवा पेटला अणि त्या वणव्यात जळून मेलेल्या जनावरांवर त्याने येथेच्छ ताव मारला आणि त्याच्या तोंडाला खरपूस भाजलेल्या मांसाची चव लागली, तिथून पुढे त्याने अग्नी आणि अन्नाचा उपयोग करून आपली भूक भागविण्याची कला विकसित केली. आज आधुनिक काळातील मानवाने संशोधन, सुधारणा आणि विकासाच्या वाटेवर स्वार होवून प्रचंड प्रगती केल्याचे दिसते. रानटी पशूवत अवस्था ते आजची आधुनिक काळातील स्थिती यामध्ये आमुलाग्र बदल तर झालाच, पण माणसाने बुद्धीच्या जीवावर थक्क करून सोडणारे संशोधनही केले आणि सगळ्या जगात इतर प्राण्यापेक्षा, मनुष्यप्राणी किती श्रेष्ठ आहे, हे दाखवून दिले. खरं तर माणसाच्या या कौशल्याचे कौतुकच केले पाहिजे.
आजच्या प्रगतीच्या वारूवर स्वार झालेला माणूस या सर्व सुधारणांमुळे तसेच द्रूतगतीने झालेल्या विकासामुळे सुखी असायला हवा, असा सर्वसाधारण नैसर्गिक नियम सांगतो. पण खरंच माणूस सुखी झाला आहे का? याचे उत्तर बिल्कूल नाही, असेच द्यावे लागेल. याला कारण संशोधनामुळे, सुधारणांमुळे, विकासामुळे माणूस सुशिक्षीत झाला तसेच समृद्धही झाला पण तो सुसंस्कृत झाला का? तर त्याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. याला कारण माणसातील असलेल्या नाना प्रकारच्या वृत्ती आणि प्रकृती.
मला या समाजातील असंख्य हरतर्हेच्या रंगीबेरंगी आणि बेरकी माणसाबद्दल लिहायला बोलायला फार आवडत मी माझ्या व्याख्यानात एकतरी अस्सल आणि ज्वलंत घडलेल्या घटनावरील उदाहरण देत असतो. श्रोत्यांनाही ते मनापासून भावते, मला भेटलेली माणसं ज्या तर्हेची, ज्या वृत्तीची, ज्या प्रवृत्तीची होती. तशीच काहीशी साम्य असणारी माणसं त्यांनाही या समाजात भेटलेली असतात. याचा त्यांना प्रत्यय येतो. अरे जगत असतांना हे केवळ आपल्या वाट्यालाच आलेलं नाही, तर प्रत्येकाला कमीअधिक फरकानं अशी माणसं भेटलेली आहेत. चला बरं झालं.... आपल्यासारखा आणखी एक जण भेटला, असे उदगार आपसूक अनेकांच्या तोंडातून बाहेर पडतात.मी या वाटेवर एकटा नाही याचेच खूप समाधान त्यांना वाटते.
खरंतर जीवन हे आशा निराशेने भरलेले आहे, अशा काटेरी वाटेत अल्पसे समाधानही माणसाला सुख देवून जाते, दैनंदिन जीवनातील क्षणिक समाधान सुद्घा सुखाची शिदोरी बहाल करते.
जीवनात भेटलला प्रत्येक माणूस तुम्हाला कमी अधिक प्रमाणात शिकवून जात असतो, मात्र तुमची दृष्टी चौकस हवी, कसं वागावं, कसं वागू नये हे देखील अशी माणसंच नकळत शिकवत असतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सभोवतालची माणसं आपल्या जीवनाचा एक अंग बनून राहतात. त्यामुळे जगण्याचा धडा ही हे अवतीभवतीचे लोकच तुम्हाला देत असतात. फक्त ते योग्यप्रकारे ग्रहण करण्याची व समजून घेण्याची कला तुमच्यामध्ये पाहिजे, त्यासाठी तुम्हाला मनाचा सराव करायला पाहिजे, चिंतन-मनन करायला पाहिजे.
शाळा ही जीवनात लिहायला वाचायला शिकवते. हे पुस्तही ज्ञान काही स्टेजपर्यंत आवश्यक ही आहे, मात्र जग ही एक मोठी शाळा आहे, ते तुम्हाला कसं जगायचं हे तर शिकवतेच मात्र आपलं जगणं सुंदर कसं बनवावं हे ही शिकवत असते. अनुभवाची शाळा खरं ज्ञान देते, हे येणारे अनुभव टिप कागदाप्रमाणे टिपायला हवेत, आज इतक्या वर्षांनी समृद्ध झालेलं अनुभवविश्व पाहून थक्क व्हायला होतं.किती तर्हेतर्हेची माणंस भेटली या जीवन नावाच्या प्रवासात....! खरंच आज कल्पनाही करवत नाही. इतके प्रचंड धक्के काही काही वेळा या भेटलेल्या माणसांनी दिले आणि हे असं वागू कसं शकतात? याचे उत्तर शोधण्यात जीवनाच्या अनेक रात्री दिवसासारख्या जागून काढायला लागल्या.
"अरे हीच तुझी अनुभवाची शाळा, जीवनभर ती तुला शिकवत असते. अरे अनुभवाचे गाठोडे मोठ्या मनाने स्विकारायचे असते. या गाठोड्याच्या गाठी सोडण्याचा आनंद घ्यायचा असतो. आला क्षण आनंदाने समाधानात व्यथित करायला हवा. शेवटी समाधान हेच महत्वाचे आहे.
माणसाच्या स्वभावाचा त्यांच्या अंतरंगाचा थांगपत्ता कुणालाच शोधता आलेला नाही हे एकदा मान्य केले की, अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप सुटली जातात. समाजात किती किती प्रकारची माणसं भेटतात? दैनंदिन जीवनात वावरत असतांना सर्रास खोटं बोलणारी माणसं भेटतात, खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रवृत्तींची ही माणसं भेटतात. कधी कधी त्यांचं खोटं उघड पडतं, तेव्हा ते पुन्हा खोटं बोलूनच, खोटचं खरं कसं आहे याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आपल्यासमोर रडून सहानुभूती मिळवायची व या सहानुभूतीतून आपला स्वार्थ साधायचा असाही काही जणांचा डाव असतो, आपल्या दु:खाला बाहेर वाटाण्याच्या अक्षता लावून आपली दु:ख बाहेरच्या लोकांना हसून सांगणारी लोक ही भेटतात, आपल्या व इतरांच्या दु:खाची अपमानाची, अवहेलनेची येथेच्छ चार पदरच्या गोष्टी घालून तिखटमीठ लावून बातमी करणारी माणसं ही भेटतात, आपल्या गुणावर, तसेच यशावर मौन बाळगून अनुल्लेखानं मारणारी माणसं ही भेटतात, आपल्यात असणार्या क्षमतांवर नाराज असणारी माणसं ही भेटतात, ही माणसं "अरे याला सर्वच बाबतीत यश मिळतेच कसे?" असा प्रश्न मनात ठेवून आपल्या कर्तृत्वावर जळणारीही माणसं भेटतात, आपल्या तोंडावर गोड बोलून इतरत्र ठिकाणी आपली निंदानालस्ती करणारी लोक ही भेटतात, कोणत्यातरी उद्देशाची मलई लाटण्यासाठी लगट करणारी माणसं ही भेटतात, ज्यांना त्यांच्या पडत्या काळात आपण मदत केली. आधार दिला त्यांनाच माज आलेली माणसं ही भेटतात, एखाद्याचा केविलवाणा उदोउदो करीत लाचार झालेली माणसं तर क्षणोक्षणी भेटतात, केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी इमान विकलेली बेईमान माणसं ही सर्रास नजरेत येतात. कर्तृत्वाचा गंध ही नसणारी काही माणसं केवळ वरिष्ठांच्या कृपेने अधिकाराच्या जागेवर जावून बसलेली पहावे लागते. नवश्रीमंतांच्या पायी साक्षात लोटांगण घेत लाचारीचं प्रदर्शन करणारी माणसं ही भेटतात, नाक कापलं तरी भोकं आहेत म्हणणारी माणसं ही भेटतात. काही झालं तरी जनाची नाही तर मनाची कसलीच लाज वाटत नाही अशी निर्लज्ज माणंस ही पावलोपावली भेटतात. स्वाभिमानाचा कणा नसणारी बांडगुळ वृत्तीची लोकंही भेटतात, बेरकी, कपटी, लबाडांच आश्रयस्थान आणि प्रामाणिक, सालस, सरळमार्गी माणसांच्या वाटेत काटे पेरणारी ही माणसं भेटतात.
सातत्याने बेगडी व ढोंगी मुखवटे धारण करून जगाच्या डोळ्यात धुळ फेकणारी स्वत:चा चेहराच हरवून बसलेली ही माणसं पहिली की थक्क व्हायला होतं, जगणं अमूल्य आहे याची जाणीव कोसो मैल दूर असणारी आणि सदाचारानं जगावं इतरांना जगू द्यावं याचा गंधही नसणारी मूल्यहीन माणसं आज जीवनाच्या वाटेवर कोपर्या कोपर्यावर भेटतात, अशावेळी शांतपणे मनाला धक्का देणारं वाक्य आपल्या तोंडातून बाहेर पडतं... बापरे किती प्रकारचे लोक हे ....किती विविध स्वरुपाची ही माणसं....किती नाना रुपं ही.... खरंच ही माणसं जगतात कशासाठी? याचं जगणं या नियतीला ही भ्रष्ट करतं नै का?
-सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी - 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. )
Post a Comment