Halloween Costume ideas 2015

इस्लामोफोबिया, मॉबलिंचिंग थांबणार!

 झारखंड विधानसभेत ’मॉब व्हायलंस अँड मॉबलिंचिंग बिल 2021’ झाले मंजूर. 
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह मध्येही इस्लामोफोबियाच्या विरूद्ध विधेयक.


मागच्या आठवड्यात झारखंड विधानसभेमध्ये ’मॉब व्हायलंस अँड मॉबलिंचिंग बिल 2021’ मंजूर करण्यात आले. आता हे बिल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह मध्येही इस्लामोफोबियाच्या विरूद्ध एक बिल मंजूर करण्यात आले असून ते सुद्धा आता सिनेटमध्ये चर्चेसाठी पाठविले जाणार आहे. सिनेटमध्ये डेमोक्रेटस्चे बहुमत असल्यामुळे हे विधेयक तेथेही मंजूर होईल अशी आशा आहे. डेमोक्रेट महिला सिनेटर इलहान उमर यांना रिपब्लिकन सिनेटर लॉरेन बोपट यांनी मुलतत्ववादी म्हणून संबोधल्यानंतर अमेरिकेमध्ये मोठा गदारोळ झाला, ज्याची परिणीती सकृतदर्शनी या बिलाच्या रूपाने समोर आल्याचे दिसून येते. या बिलाचे वैशिष्टये म्हणजे हे बिल फक्त अमेरिकेतच मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या घटनांची दखल घेणार नाही तर जागतिक स्तरावर मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या घटनांची दखल घेणार आहे. या बिलाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर अमेरिकन सरकारकडून एका विशेष दूताची नेमणूक केली जाईल. तो दूत देश आणि विदेशात घडणाऱ्या मुस्लिमांविरूद्धच्या घटनांची दखल घेईल आणि त्याची वर्गवारी करून त्याच्यावर वार्षिक अहवाल सरकारला सादर करील, ही माहिती बिगर सरकारी संस्थांन, तसेच मीडियामधून रिपोर्ट झालेल्या बातम्यांमधून गोळा केली जाईल. 

सकृतदर्शनी या कायद्याचा उद्देश चांगला दिसतो, परंतु हे बिल त्या देशाकडून सादर केले जाणे, ज्याने इराक, अफगानिस्तान आणि लिबियासह अनेक मुस्लिम देशांवर आक्रमण करून तेथील नागरिकांची जीवाची आणि मालमत्तेची अपरिमित अशी हानी केली ही दुर्दैवी बाब आहे. 

हे बिल जरी कायद्यात रूपांतर झाले आणि जरी त्यात नमूद केल्याप्रमाणे विशेष दूत नेमला गेला आणि त्यांने वार्षिक रिपोर्ट जरी सादर केला तरी इस्लामोफोबिया अंतर्गत घडणाऱ्या घटनांमध्ये फारसा फरक पडेल असे वाटत नाही. केवळ एक दबाव म्हणून या कायद्याचा उपयोग होऊ शकेल. या सर्व पार्श्वभूमीवर इस्लामोफोबिया म्हणजे काय? याबद्दल या आठवड्यात चर्चा करणे अनाठायी होणार नाही. म्हणून हा लेखन प्रपंच. 

इस्लामोफोबिया म्हणजे काय?

इस्लाम म्हणजे इस्लाम धर्म, फोबिया म्हणजे भीती. म्हणजे इस्लाम धर्माची भीती असा याचा अर्थ होतो. आता ही भीती खरी आहे का खोटी आहे? हे आपण पाहू. 

हे सत्य आहे की अलिकडे काही लोकांना इस्लामची अवास्तव भीती वाटते. इस्लामची म्हणण्यापेक्षा मुस्लिमांविषयी अवास्तव भीती वाटते, असे म्हणणे जास्त संयुक्तीक राहिल.  ही भीती वाटण्याचे कारण म्हणजे काही देशांकडून अशी भीती मुद्दाम निर्माण केली जाते. विशेष म्हणजे अशी भीती निर्माण करण्यामागचे कारण धार्मिक नसून आर्थिक आहे, ते कसे हे समजून घेणे गरजेचे आहे. 

विसाव्या शतकामध्ये दोन महासत्ता होत्या. 1. अमेरिका 2. सोवियत रशिया. अमेरिका ही भांडवलशाही लोकशाहीचे नेतृत्व करत होती तर सोव्हियत रशिया साम्यवादी राज्यव्यवस्थेचे. 1991 साली सोव्हियत रशियाच्या विघटनानंतर साम्यवादी रशियाचे विघटन झाले. जगात आजमितीला कुठल्याही देशात शुद्ध स्वरूपात साम्यवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. 1991 साली शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने ’न्यू वर्ल्ड ऑर्डर’ची घोषणा केली. त्या अंतर्गत भांडवलशाही अर्थव्यवस्था ही जगाच्या प्रत्येक राष्ट्रात अस्तित्वात आली. व्याज हा या अर्थव्यवस्थेचा पाया असून, यात गरजू लोकांचे शोषण अगदी त्यांच्याच मर्जीने केले जाते. गरजवंत आपल्या मर्जीने कर्ज घेतात आणि ते फेडता येत नसल्याने ते फेडण्यासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेतात व कर्ज फेडत-फेडतच मरून जातात. या अर्थव्यवस्थमध्ये श्रीमंतांची संपत्ती फारसे श्रम न करता (व्याजामुळे) वाढत जाते तर गरीबांची संपत्ती सर्व प्रयत्न करूनही न वाढता कमी होत जाते. या व्यवस्थेचे चटके सहन न झाल्याने आजपर्यंत लाखो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 

याला पर्याय म्हणून व्याजरहित इस्लामी अर्थव्यवस्थेची चर्चा अलिकडे जगात मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पूर्व गव्हर्नर एस.रघुराम राजन यांनीसुद्धा या व्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचे सविस्तर विवेचन मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी रहे. यांनी विसाव्या शतकामध्ये अनेक पुस्तके लिहून केलेले आहे. युरोपमध्ये सुद्धा या पर्यायी अर्थव्यवस्थेबद्दल आकर्षण वाढत असून, अगदी लंडन सहीत अनेक शहरांमधील बँकामध्ये व्याजविरहित बँकिंग व्यवस्थेचे काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. या व्यवस्थेवर मुस्लिमच नव्हे तर अनेक बिगर मुस्लिम लेखकांनी सुद्धा चिंतन, मनन सुरू केलेले असून या विषयावर त्यांनी मुस्लिमांपेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत व सातत्याने लिहिली जात आहेत. यावर संशोधन सुरू असून, व्याजाधारित अर्थव्यवस्थेला पर्याय म्हणून व्याजविरहित इस्लामी अर्थव्यवस्था कशी उभी करता येईल, यावर विचार मंथन सुरू आहे. आज जरी हा विचार ’व्यवस्था’ म्हणून मांडण्याइतपत प्रगत झालेला नसला तरी आज ना उद्या तो कुठल्या ना कुठल्या देशात प्रत्यक्षात लागू करण्यात येईल यात शंका नाही. एकदा का हा विचार प्रत्यक्षात आला आणि लोकप्रिय झाला तर भांडवलशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही व आपल्या व्यवस्थेचे धिंडवडे आपल्याच डोळ्यासमोर याची देही याची डोळा पहावे लागतील, या भीतीतून इस्लामविषयक मुद्दाम भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे. इस्लामोफोबिया पसरविण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे आणि ही भीती पसरविण्यामध्ये सर्वात मोठा पुढाकार स्वतः अमेरिकेनेच घेतलेला आहे, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. 

इस्लामोफोबिया पसरविण्याचे दूसरे कारण नैतिक आणि अनैतिक जीवन व्यवस्थेमधील द्वंद्व आहे. चंगळवाद आणि अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यातून निर्माण झालेली अनैतिक जीवन व्यवस्था आजमितीला युरोप आणि अमेरिकेमध्ये स्थिरावलेली आहे. या जीवन व्यवस्थेतील फोलपणा व मानवतेला होत असलेली हानी इस्लामी जीवन व्यवस्थेच्या तौलनिक अभ्यासामुळे एव्हाना स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामविषयी वाढते आकर्षण लपून राहिलेले नाही.   आपलेच नागरिक आपल्याच व्यवस्थेला कंटाळून इस्लामकडे आकर्षित होत असल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या भीतीतून त्यांना इस्लाम स्विकारण्यापासून रोखण्यासाठी म्हणून इस्लाम आणि मुस्लिमांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात भीती निर्माण करणारे मटेरियल रात्रंदिवस जनतेसमोर सादर केले जात आहे. 

इस्लामोफोबिया निर्माण करण्याची गरज

इस्लाम हा धर्म आणि व्यवस्था दोन्ही आहे, म्हणून  कुठल्याही देशात इस्लाम आधारित अर्थव्यवस्थेचे समर्थक सरकार येऊ नये यासाठी अमेरिका रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून दक्ष असते. त्यासाठी अगदी पाश्चिमात्य लोकशाही पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपरवर निवडून आलेले इस्लामप्रिय सरकारेसुद्धा पाडली जातात. याचे ताजे उदाहरण इजिप्त आहे. अरबस्प्रिंग नंतर तहेरीर चौकाच्या आंदोलनातून इजिप्तमध्ये 51 टक्के मत घेवून निवडून आलेल्या मोहम्मद मुर्सी सरकारला पाडून इजिप्तची सुत्रे अमेरिकेच्या बटिक असलेल्या सेनाप्रमुख अब्दुल फतेह अल सिसी याच्या हाती दिले हे आहे. 

आजपासून 1443 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या कल्याणकारी, समतामूलक, व्याजमुक्त अशा आदर्श समाजरचनेसाठी मक्कामध्ये जे आंदोलन सुरू केले होते त्याला तेव्हा ज्या कारणासाठी विरोध झाला होता ते कारणही आर्थिकच होते. आज जो 21 व्या शतकात जो विरोध होत आहे तो ही आर्थिकच आहे. इस्लामने त्यावेळेही म्नका शहराच्या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला जे आव्हान दिले होते तेच आजही कायम आहे. ते अरबस्थानामध्ये जसे यशस्वी झाले तसे आज ना उद्या जगात इतरत्रही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्रीशीर भीती अमेरिका आणि त्याच्या भांडवलशाही समर्थकांना वाटत आहे. तसेच आपल्या अर्थव्यवस्थेतील फोलपणा आणि इस्लामी अर्थव्यवस्थेतील ठोसपणा याची पुरेशी कल्पना असल्याने त्यातून इस्लामोफोबिया पसरविण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

इस्लामविषयक वैचारिक भीती

अमेरिकेमध्ये इस्लामविषयक भीती 1993 साली प्रकाशित झालेल्या ’्नलॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या पुस्तकामुळे सर्वप्रथम निर्माण झाली. हे पुस्तक सॅम्युअल फिलिप्स हंटिंग्टन या अमेरिकी लेखकाने लिहिलेले आहे. या पुस्तकातून त्याने इस्लामविषयक अशी मांडणी केली आहे की, ’’यापुढे जागतिक स्तरावर युद्धे देशा-देशात होणार नाहीत तर इस्लाम आणि इतर संस्कृतीला मानणाऱ्या देशांमध्ये होतील. त्यात पाश्चिमात्य देशांना जगावरचे आपले वर्चस्व गमवावे लागेल.’’ इस्लामविषयक भीती निर्माण करणारे दूसरे पुस्तक सुद्धा अमेरिकेच्याच मायकल एच.हार्ट या लेखकाने लिहिलेले असून, त्याने द हंड्रेडस नावाच्या पुस्तकातून स्वतः ख्रिश्चन असूनही झिजस क्राईस्ट (अलै.) यांच्या नावा अगोदर क्रमांक एकवर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांचे नाव घेऊन जगावर सर्वात जास्त प्रभाव टाकणाऱ्या 100 व्यक्तींची यादी बनविली. यातूनही इस्लामच्या सत्यतेची ओळख अमेरिका आणि युरोपच्या जनतेला झाली. ती ओळख पुसली जावी म्हणून इस्लामोफोबिया पसरविण्याची गरज निर्माण झाली. 

युरोप-अमेरिकेच्या वैचारिक विश्वामध्ये खळबळ माजविणारा तीसरा लेखकही अमेरिकन असून त्याचे नाव डॉ. जोसेफ अ‍ॅडम पिअरसन असे आहे. त्याने उघडपणे असे म्हटले की, ’’जे पाश्चिमात्य लोक असा विचार करून घाबरत आहेत की, अरबांच्या हातात अणुबॉम्ब आल्यास काय होईल? त्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही की शांतीचा इस्लामी अणुबॉम्ब त्याच दिवशी जगावर पडला आहे ज्या दिवशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला होता.’’ 

खऱ्याला खरे म्हणणाऱ्या या सर्व अमेरिकी लेखकांच्या भविष्यवाणीतून स्पष्ट झाले होते की, इस्लामच्या नैतिक शक्तीसमोर पाश्चिमात्य देशांची आर्थिक आणि लष्करी शक्तीसुद्धा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची ही भविष्यवाणी 15 ऑगस्ट 2021 रोजी खरी ठरली. जेव्हा अफगानिस्तानमधून 20 वर्षे लढूनही विजय न मिळाल्यामुळे अपमानास्पदरित्या अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांना तेथून माघार घ्यावी लागली. 

इस्लामोफोबिया पसरविण्यामध्ये मीडियाची भूमिका

जेव्हा इस्लामोफोबिया पसरविण्याचा निर्णय झाला तेव्हा अमेरिका आणि युरोपने आपल्या हाती असलेल्या सर्व मार्गांचा या कामासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रमुख भूमिका मीडियाने बजावली. जागतिक मीडियाची सुत्रे अमेरिकेच्या हाती असल्याने मीडियाला या कामासाठी जुंपण्यात आले आणि रात्रंदिवस मीडिया इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरूद्ध दुष्प्रचार करू लागला. इस्लामोफोबियाची एक वैश्विक मोहिम सुरू झाली. त्यात आपल्या देशातील मीडियानेही त्वेषाने भाग घेतला. याच मोहिमेचा एक भाग म्हणून भोळ्या-भाबड्या इमाम सदृश्य लोकांना स्टुडिओत बोलावून त्यांना वेडे वाकडे प्रश्न विचारून, त्यांच्यावर सामुहिक शाब्दिक आक्रमण करून, त्यांना निरूत्तर केल्याचा देखावा तयार करून लोकमनावर असे बिंबवण्यात मीडियाला बऱ्याच प्रमाणात यश आले की, ’इस्लाम हा एक मध्ययुगीन धर्म असून, त्याला मंजूर असलेली व्यवस्था जुनाट असून 21 व्या शतकातील आधुनिक प्रश्नांना हा धर्म आणि या धर्माच्या व्यवस्थेमध्ये उत्तरे शोधून काही हाती लागणार नाही.’ 

अगोदरपासूनच जगातील बहुसंख्य लोक इस्लाम संबंधी अनभिज्ञ असल्याने त्यांच्यावर मीडियाच्या या दुष्प्रचाराचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला की इस्लामी व्यवस्था ही एक प्रतिगामी व्यवस्था आहे. मात्र भांडवलशाही समर्थकांचे दुर्दैव असे की, सोशल मीडियाचा शोध लागला आणि इस्लामच्या बदनामीचे मेनस्ट्रीम मीडियाचे गणित पार बिघडून गेले. सोशल मीडियातून सत्य मांडले जाऊ लागले व ज्यांची सारासार विवेक बुद्धी शाबूत आहे अशा लोकांच्या लक्षात मेनस्ट्रीम मीडियाची चालाखी आली. ज्याचा परिणाम असा झाला की, इस्लामचा रास्त अभ्यास करून त्याचा स्वीकार करण्याकडे युरोप आणि खुद्द अमेरिकेचा कल वाढला. 

इस्लामच्या मुलभूत शिकवणी उदा. शांती, सन्मार्ग, समानता, न्याय, व्याजमुक्त व्यवस्था, महिलांचे अधिकार, जकात, नैतिकता, नशाबंदी, अश्लीलतेवर प्रतिबंध, परदा पद्धती, घर फोडणाऱ्या वाईट सवयींवर प्रतिबंध, हलाल-हरामची व्यवस्था, भ्रष्टाचाराला लगाम, बंधुभाव इत्यादी मुल्यांवर मीडियात चर्चा न होतांना सुद्धा लोकांच्या अभ्यासातून इस्लामची ही वैशिष्ट्ये ठळकपणे लक्षात आली. या उलट गोहत्या, बहुपत्नीत्व, जनसंख्या वृद्धी, जिहाद, दाढी, टोपी, हिजाब, लवजिहाद, अजान, लाऊड स्पीकर, मदरसे, मध्ययुगीन मुस्लिम शासकांचे अत्याचार इत्यादी मुद्यांवर मीडिया अनावश्यक चर्चा घडवून आणते, हे सुद्धा लोकांच्या लक्षात आले. म्हणून इस्लामफोबियाच्या विरूद्ध जनमत तयार होत असून झारखंड आणि अमेरिकेमध्ये इस्लामोफोबियाच्या विरूद्ध निर्माण केले गेलेले कायदे हे सकारात्मक पाऊल असल्यामुळे त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह! आम्हा भारतीय मुस्लिमांना एवढे बळ दे की आम्ही कल्याणकारी इस्लामच्या शिकवणीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू शकू. आमीन. 

- एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget