त्याने पत्र्याची पेटी कधी पाहिलेली नव्हती. समोरच दोघे जण एक पत्र्याची पेटी रिक्षात ठेवत होते आणि तिसरा कापडाची पिशवी हाता घेऊन उभा होता.
आजोबा म्हणाले, ‘‘ही लोखंडाने बनवलेली पेटी आहे.’’
बबलूने विचारले, ‘‘ही पेटी काय असते?’’
‘‘आपल्याकडे जशा बॅगा असतात तशीच ती पेटी.’’ आजोबांनी उत्तर दिले.
‘‘पण ही फार मोठी आहे.’’ बबलू म्हणाला.
‘‘ही तुझ्या बाबांकडे आहे तशीच, ते गावाला जाताना घेऊन जातात तशी.’’ आजोबा म्हणाले.
बबलू म्हणाला, ‘‘समजलं आता. पण बाबांच्या बॅगेला तर चाकंसुद्धा आहेत.’’
‘‘हो त्याचे बजन जास्त असते म्हणून.’’ आजोबा उत्तरले.
‘‘या पेटीत काय आहे?’’
आजोबा गंभीर विचारात पडले. म्हणाले, ‘‘यात काही वचनं आहेत, काही स्वप्नं आहेत आणि काही आकांक्षा आहेत जे हे मजूर आपल्याबरोबर घेऊन हिंडत असतात.’’
‘‘मला काही कळलं नाही. काय असतात, वचनं, स्वप्नं, आकांक्षा?’’
‘‘बाळ तुला कळणार नाही.’’
‘‘का बरं? मला समजायला काय करावं लागेल?’’
आजोबा म्हणाले, ‘‘आताच नाही तुला कळणार. मोठा झाल्यावर कळतील अशा गोष्टी.’’
पण बबलूने पुन्हा विचारले, ‘‘स्वप्न फार जड असतात, तर…’’
आजोबा म्हणाले, ‘‘होय. स्वप्न सजवायला एक आयुष्य लागते आणि वचनं पूर्ण करता करता माणूस थकून जातो. कधी कधी सर्व आकांक्षा पूर्ण होत नाहीत.’’
‘‘का नाही बरं?’’
‘‘कारण ते फार नाजूक असतात. थोडासा जरी धक्का लागला तरी मोडून जातात.’’
‘‘नाजूक म्हणजे माझ्या खेळण्यांसारखे?’’ बबलूने विचारले.
‘‘होय, हे तुझ्या खेळण्यांपेक्षाही नाजूक असतात.’’
‘‘कळलं मला. मी साबणाच्या पाण्याने बुडबुडे काढतो तसे. जे थोड्याच वेळात फुटून जातात, तसेच ना!’’
बबलूच्या या वक्तव्याने आजोबा हैरान झाले. त्यांना अंदाज नव्हता की लहान बालक इतके मोठी उपमा देईल. आजोबा म्हणाले, ‘‘होय, तू एकदम खरं बोललास.’’
बबलू म्हणाला, ‘‘मी तर नेहमीच खरं बोलत असतो. पण लोक माझं ऐकतच नाहीत.’’
‘‘तू अगदी लहान आहेस म्हणून.’’
‘‘मग काय झालं, लहान मुलं खरं बोलत नसतात का? आणि त्यासाठी वयाचा कुठे संबंध येतो?’’
आजोबा म्हणाले, ‘‘ते असं आहे की लोक लहानग्यांच्या खऱ्या गोष्टींना चुकीचे म्हणत असतात.’’
‘‘हे मला कळलं आणि मोठ्यांनी जरी चुकीचं सांगितलं तरी ते मान्य करतात.’’
ती पत्र्याची पेटी आता रिक्षात ठेवली गेली आणि ठेवणारा माणूस एका कोपऱ्यात बसला.
बबलूने विचारले, ‘‘ही काय गंमत आहे बाबा! त्या स्वप्नांच्या पेटीला भली मोठी जागा आणि ती स्वप्नं पाहणारा एका कोपऱ्यात.’’
आजोबा म्हणाले, ‘‘हो बाळा! तसंच असते. जो कुणी मोठमोठी स्वप्नं पाहतो तेव्हा असेच घडते. अशा माणसाला एखाद्या कोपऱ्यातच बसावे लागते.’’
‘‘बाबा तुम्ही त्या लोकांना ओळखता?’’ बबलूने आजोबांना विचारले.
आजोबांनी उत्तर दिले, ‘‘मी त्यांना ओळखत नाही. पण ते लोक समोरच्या इमारतीच्या बांधकामावर काम करणारे मजूर आहेत.’’
‘‘तुम्ही त्यांना ओळखत नाही, पण त्यांची बरीच माहिती तुम्हाला आहे.’’
‘‘होय बाळा, अशा गोष्टी सर्वांना माहीत असतात. सावकार आणि मजुरांमधील गोष्टी समान असतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘म्हणजे या दोघांत काही फरक नसतो?’’
‘‘फरक असतो, तुमच्या बाबांची चाकवाली बॅग आणि ही पत्र्याची पेटी दिसायला समान, पण आतमधील वस्तू वेगळ्या असतात. स्वप्नं मात्र सारखीच असतात.’’
ऑटो रिक्षा चालू लागली. त्यांना निरोप देणारे इतर मजूर त्यांना पाहातच राहिले.
‘‘हे लोक जात का नाहीत, काय पाहतात ते?’’ बबलूने विचारले.
‘‘बाळ! हे लोक निघून जातील, पण या घडीला ते स्वप्नं पाहात आहेत. जशी स्वप्नं त्या पत्र्याच्या पेटीत आहेत तशी.’’
‘‘पण हे लोक आले कुठून?’’
‘‘मला माहीत नाही, पण जिथे जिथे बांधकाम आणि विकास होत असतो तिथे ते येऊन धडकतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘मग जेव्हा हे काम बंद होईल, तेव्हा हे लोक कुठे जातील?’
‘‘ते कुठे जाणार हे कुणालाच ठाऊक नाही.’’
‘‘कुणालाच ठाऊक नाही?’’ बबलूने विचारले.
आजोबा म्हणाले, ‘‘हे कुणालाच माहीत नसते. ज्याने हे जग निर्माण केले त्यालाच तेवढे माहीत. मी त्या ठिकाणचा पत्ता सांगू शकतो जिथं कुठं बांधकाम आणि विकास होत असेल, तिथं ते जातील.’’
बबलू म्हणाला, ‘‘मग त्या पेटीत त्यांच्या मजुरीचे पैसे असतील!’’
आजोबा म्हणाले, ‘‘रोजगार नव्हे, पण त्या पेटीत नाजूक आणि मृदू अशी स्वप्ने असतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘कळलं मला. पाण्याच्या बुडबुड्यांसारखी, जे काही वेळातच हवेत विरघळून जातात.’’
आजोबा म्हणाले, ‘‘बाळ तू वारंवार….’’
बबलू म्हणाला, ‘‘कारण की मला तो खेळ लई आवडतो.’’
- डॉ. सलीम खान
Post a Comment