सर्व जगातील ऐतिहासिक दीर्घकाळ चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकरीवर्गाचे समाधान तर केलेच पण या आंदोलनाद्वारे देशाला एक असा नेता लाभला ज्याच्या तोडीचा दुसरा नेता सध्या देशात नाही. कृषिविषयक तीन कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एक आंदोलन उभारले. सुरुवातीला याकडे कुणी लक्ष दिले नाही. महत्त्वाची घटना ही की या आंदोलनाद्वारे देशाला एक नवा नेता लाभला. खंबीर, संयमी, सक्षम आणि त्याचबरोबर विनम्र व्यक्तिमत्त्वाचा. ह्या आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान पहिल्याच दिवसापासून सुरू झाले. सुरुवातीला तर महत्त्वच दिले नाही. पण जेव्हा दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी गोळा होऊ लागले तेव्हा नवनवीन शिव्या देण्यास सुरुवात भाजपच्या साध्या कार्यकर्त्यांनी नव्हे केंद्रीय मंत्र्यांनी केली. मंत्र्यांनी काही सांगायला सुरुवात केली ती केली स्वतः प्रधानमंत्र्यांनी सुद्धा संसदेत शेतकऱ्यांच्या विरोधात जे बोलले त्याची अपेक्षा नव्हती. सुरुवात आंदोलनजीवीने केली. म्हणाले की काही लोक आंदोलनाचा आधार घेऊन जगत असतात. त्यांना परजीवी असे ते म्हणाले. ते म्हणाले की शेतकऱ्यांची आड घेऊन काही लोक आपले ध्येय साधत आहेत. नागरिकांनी आंदोलनजीवी आणि विरोध करणाऱ्यांना ओळखायला हवे. शेतकऱ्यांच्या पवित्र हेतूचा उपयोग करण्यासाठी आंदोलनजीवींनी या आंदोलनात उडी घेतली आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आणि आंदोनाचे सर्वेसर्वा राकेश सिंग टिकैत यांनी प्रधानमंत्र्यांनी संसदेत या आंदोलक शेतकऱ्यांना जे जे काही सांगितले त्याची दखल घेतली नाही. प्रधानमंत्री म्हणाले की आतंकवादी, खलिस्तानचे आणि जे तुरुंगात आहेत अशा कैद्यांचे फोटो या आंदोलनात झळकले. टिकैत यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. जसजसे आंदोलनाचे दिवस वाढत होते तसतसे इतर शेतकरी जे आतापर्यंत सहभागी झाले नव्हते त्यांनी प्रधानमंत्र्यांचे भाषण ऐकले आणि सिंधू बॉर्डरकडे निघाले. गर्दी वाढत गेली तसतसे केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांवरच राग अनावर होत गेला. तुकडे तुकडे विचार वाले एक माजी मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की देशाला तुकडे तुकडे करू पाहणारे लोक ह्या आंदोलनाचा वापर करत आहेत. गुजरातमधील एका कार्यक्रमात प्रधानमंत्री म्हणाले की एक षड़्यंत्र रचून शेतकऱ्यंची दिशाभूल केली जात आहे. भाजपच्या आयटी सेलचे अमीत मालविय यांनी एका ट्विटरद्वारे असे सांगितले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे खलिस्तानींचा अजेंडा आहे. केंद्रीय मंत्री पियुश गोयल आणि नरेंद्रसिंग तोमर यांनी या आंदोलनाला देशद्रोही आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले. देशद्रोही, खलिस्तानी, नक्षली ज्यांना जे जे सुचले ते सांगिलते. पण यातील एकाचेही उत्तर राकेश टिकैत यांनी दिले नाही आणि त्यांनीच नव्हे तर आंदोलनातील ३६ शेतकरी संघटनांमधील एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. इतकी पकड टिकैत यांची होती. त्यांनी स्वतःचा तर नाहीच नाही इतरांचाही संयम ढळू दिला नाही. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर कुणीतरी अथवा कुणाकडून शिखांचा झेंडा लावून त्यांना बदनाम करण्याची सुरुवात झाली. ही घटना गंभीर होती. शेतकऱ्यांना हिंसेकडे ढकलून त्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्याची पूर्वतयारी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नेत्यांना अटक करणअयाची योजना झाली. शेतकरी दिल्लीची सीमा सोडून आपल्या घरी निघाले. काही निघायच्या बेतात होते. सर्वांनाच वाटू लागले होते की आता आंदोलन संपले. पण त्यांच्या नेत्यांचा आत्मविश्वास खचला नाही. त्यांचे मनोबल खालावले नाही. अशा गंभीर परिस्थितीत टिकैत यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणात काय म्हणाले हे कुणाच्या लक्षात आले नसेल. पण त्यांच्या डोळ्यांत तरंगत असलेल्या अश्रूंनी कायापालट केला. जे घराकडे निघाले होते ते परत फिरले. जे गावात घरात होते ते आंदोलनाकडे निघाले आणि बघता बघता हजारोंच्या संख्येने लोक परत दिल्लीच्या सीमेवर जमले पूर्वीपेक्षाही जास्त. टिकैत यांनी आंदोलनाला जीवदान दिले. हे नेत्याची कुशलता, प्रसंगावधान आणि प्रामाणिकपणाची ग्वाही देते. सुरुवातीपासूनच आंदोलनाला हिंसक वळण देण्याचे आतोनात प्रयत्न होत होते. सर्वांत गंभीर परिस्थिती लखीमपूर खेरीमधील. अगोदर एका कार्यक्रमात गृहराज्यमंत्री टेनी यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली. त्यांना दोन मिनिटं लागणार नाहीत पांगवण्यासाठी. यापासूनच त्यांच्या पुत्राने प्रेरणा घेतली असेल. शेतकरी परत जात असताना त्यांच्या मागून त्यांच्यावरून आपली गाडी चालवली. यात चार शेतकरी चिरडले गेले. परिस्थिती हाताबाहेर जात होती. साहजिकच शेतकरीसुद्धा हिसेकडे वळले असते. पण टिकैत यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जर हिंसा भडकली असती तर सारं आंदोलन चिरडून टाकले गेले असते. टिकैत यांनी अशा गंभीर परिस्थितीत जे काही केले ते दुसऱ्या कुठल्या नेत्याला जमले नसते. टिकैत यांनी भाजप मंत्र्याच्या, प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाकडे दुर्लक्ष केले. ते विचलित झाले नाहीत. रागावले नाहीत. जर त्यांनी प्रत्युत्तर दिले असते तर ते याच वादात अडकून पडले असते. कुणी खलिस्तानी म्हणाला, कुणी नक्षलवादी, कुणी आतंकवादी, कुणी देशद्रोहीट; ह्या साऱ्या आरोपांना सहन करत आंदोलनाचे जतन केले. शेतकऱ्यांचा उत्साह, त्यांचे मनोबल ढळू दिले नाही. प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मोजक्या शब्दांत उत्तरे दिलीत. इतर नेत्यांसारखे माईक समोर आला की भाषण करायला सुरुवात कधीच केली नाही. शेवटी ज्या आंदोलनाविषयी भारताचा प्रत्येक नागरिक उदासीन होता. त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह लावले होत, ते आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाच्या यशात देशभरातील नागरिकांचे यश आहे. उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर ते साध्य होऊ शकते, असा आशावाद राकेश सिंग टिकैत यांनी साऱ्या राष्ट्राला दिला. वर्षभरापूर्वी त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. घरदार सोडून जे निघाले आज वर्ष संपले तरी घराकडे जाण्याचा विचार नाही. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत त्यांचे घर आणि सर्व काही. इतका त्याग सध्याचे नेते करतील का? म्हणूनच शेवटी अशाच नेत्याच्या प्रयत्नांना यश लाभते.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment