Halloween Costume ideas 2015

तर तुम्ही तेजाच्या वाटेवर घोडदौड कराल...


"भय इथले संपत नाही", असे म्हणतात ते खरंच.. कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावलेले कित्येकजण केवळ भीतीचे बळी ठरलेले आहेत. आपल्याला कोरोना झाला आहे आणि आपल्याला कोविड सेंटरमध्ये एकटे बेवारसपणे जगावे लागणार आहे, या भयाने अनेकांनी शेवटचा श्वास घेतला आहे. अर्थात भीतीने उदासीनता आणि चिंताग्रस्तता अथवा छिन्नमनस्कता वाढते, या भीतीच्या वरवंट्याखाली माणसाचे मन चिरडून जाते, मग भीती माणसाच्या सर्वच क्रीयांवर आपला अंमल बसवते. भय, भीती, धास्ती, दहशत, भयाकुलता, भयार्तता, भयक्रांतपणा, घोर लागून रहाणे, धास्तावून जाणे ही भयग्रस्त मनाची विविध रुपे आपल्यासमोर फेर धरुन नाचू लागतात. त्यांच्या तीव्रतेनुसार, प्रसंगानुसार, वेळेनुसार आपण वरील वेगवेगळे शब्द वापरत असलो तरी, मूळ भावना म्हणजे आपल्या जीविताला धोका आहे, आणि आपले हे जीवन संपुष्टात येणार आहे की काय असे वाटणे, म्हणजेच मृत्यूची भीती माणसाला निष्प्रभ करते. हेच प्रकर्षाने अनुभवाला येते. अर्थात आपले जीवन संपणार आहे ही भावना प्रत्येक माणसाच्या मनाला प्रचंड भयग्रस्त करते आणि हे साहजिकच आहे. सदासर्वकाळ माणूस भीतीच्या छायेत वावरतो. अशावेळी माणसाला "भय इथले संपत नाही", याचा अनुभव येवू लागतो. भीतीने माणूस गर्भगळीत तर होतोच, शिवाय त्याला कशातच रुची वाटत नाही. अर्थात अशी भयग्रस्त परिस्थिती निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. मात्र अनेकदा भीतीच्या कारणांचा मुळात जाऊन शोध घेत गेल्यास या परिस्थितीच्या मुळाशी गैरसमजाची विषवल्ली असते. हेच सिद्ध होते म्हणजेच वाटेत पडलेल्या दोरीलाच आपण साप साप म्हणून भुई थोपटत असतो. ही विषवल्ली नेस्तनाबूत करणे, म्हणजेच मनातून मुळासकट काढून टाकणे, हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग कधी ना कधी आवर्जून येत असतात. मात्र अशा परिस्थितीतील बारकावे समजून घेणे आवश्यक असते. आपल्याला नेमके काय होते आहे? असे का होते आहे? कसं होत आहे? हे जाणून घेणं, समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ते प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून आहे, मात्र भीतीला अधिक न घाबरता त्याच्या सामोरे जाणे हेच आपल्या हातातील एकमेव शस्त्र आहे. भीतीच्या या संकटाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी या शस्त्राचा आपण पुरेपुर वापर केला पाहिजे.

तुम्हाला येणारा भीतीचा अनुभव आपल्या संपूर्ण देहाचा आणि पर्यायाने मनाचा प्रचंड थरकाप उडवणारा असेलच असे नाही, परंतु भीतीच्या अनुभवाने माणसाच्या वृत्ती गोठून जात असतील, व्याकुळतेने मन बिथरून जात असेल, आणि आपल्या मनामध्ये असणारी भीती स्वत:बद्दलच अविश्वास दाखवत असेल तर आपला आत्मविश्वास पुर्णपणे  डळमळू लागतो आणि भीतीच्या खोल गर्तेत आपण जास्तच अडकून बसतो. भयगंड या आजाराचे आपण सावज होतो.अर्थात आपणच या परिस्थितीला जबाबदार आहोत, या भीतीचे मूळच चुकीच्या वैचारिक बैठकीतून निर्माण झाले असेल, भ्रामक कल्पनांमध्ये उगाचच घुटमळलेले असेल तर ते मूळच काढून फेकून देणे आवश्यक असते. विचारांची विषवल्ली उपटून टाकली तर त्याबरोबर भीतीचं किंवा भयगंडाचं सडकं फळही तात्काळ नष्ट करता येईल. यासाठी अनेक उपाययोजना आहेत, निराश होण्याचे कारण नाही, तेव्हा मनातली ही विषवल्ली फेकून देण्याची कला आपल्याला साध्य झाली की, मनात दाटलेला काळा कभिन्न काळोख क्षणार्धात नाहीसा होतो. आणि आयुष्याच्या उर्वरीत वाटेवर लख्ख प्रकाश पडतो.

माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, पोटात दुखायला लागलं म्हणून शहरातल्या एका नामांकित डाॅक्टरला दाखवायला मी गेलो, तर त्यांनी अनेक चाचण्या घ्यायला लावल्या,शिवाय हे सगळे सोपस्कार पार पाडून झाल्यावर मला मोठा आजार झाल्याची भीती घातली, भरपूर फी वसूल केली,मी भीतीने त्या वेळी गर्भगळीतच झालो होतो, मात्र पुढे एका जवळच्या सामान्य व साधा दवाखाना असलेल्या  डाॅक्टरंनी पित्तामुळे झालेल्या त्रासाचे निदान काढून आठ दिवसांची ट्रिटमेंट देऊन माझ्या मनात रूतून बसलेल्या भीतीचे व भयगंडाचे उच्चाटन केले, आणि मी पुढे सुखाने दोन घास खाऊ लागलो. त्यांनी, तसेच माझ्या एका जवळच्या संमोहनशास्त्र जाणणाऱ्या मित्राने ही भयगंड नावाची विषवल्ली माझ्या मनातून काढून टाकली,नसती तर मी नैराश्यता व औदासीन्यता या घोर खाईतून कधीच बाहेर पडू शकलो नसतो.

तसं पहायला गेलं तर प्रत्येकाचं आयुष्य विविध घटना, अनेक प्रसंग व कोड्यात टाकणार्‍या असंख्य अनुभवांनी भरलेलं असतं, खरं तर आयुष्य हेच एक अनाकलनीय कोडंच आहे. ज्यामध्ये पुढला क्षण आपल्यासमोर काय वाढून घेवून आलाय हे कधीच कळत नाही. उद्याच्या दिवसाचा अंदाज नसतो ना कल्पना नसते. सगळं असतं ते बेभरवशाचं. नवनवीन आव्हानं प्रत्येक टप्प्यावर उभी टाकलेलीच असतात. आपल्या आयुष्याची वाट या आव्हानांनी कधी कधी इतकी, बिकट व काटेरी  होते की, चालतांना माणूस एकतर थकून तरी जातो कींवा रक्तबंबाळ तरी होतो, त्याच्या जीवनातला आनंदच लूप्त हेातो, पण हीच आव्हानं अनेकांनी लीलया पेलली आहेत आणि अशी आव्हानं स्विकारत त्यांच्याशी दोन हात करीत ते यशाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहेत. अशी जीवनात संकटांची मालिका येवूनही यशस्वी झालेली माणसं आजूबाजूला नेहमीच वावरत असतात, संकटांशी सामना करतांना पहिल्यांदा ती सुद्धा सैरभैर होतात, मात्र सरतेशवेटी ती संकटांवर आणि आव्हानांवर मात करून यशस्वी होतात, अशा आजूबाजूच्या माणसांचं आपण सूक्ष्म अवलोकन करायला हवे, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी अशा यशस्वी व्यक्तींच्या सान्निध्यात गेलं पाहिजे, ते शक्य नसेल तर अशा आव्हानांना पेलून यशस्वी झालेल्या व्यक्तींविषयीची पुस्तके बाजारात आहेत ती वाचनात ठेवली पाहिजेत. सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल हे पाहिले पाहिजे. भीतीचे तन मनामधून काढून टाकण्यासाठी सकारात्मक विचारांची औषध फवारणी करणे आवश्यक असते, त्यातूनच आत्मिक आणि मानसिक धैर्य निर्माण होते, असे धैर्य निर्माण झाले की निर्भयता येते. अर्थात हीच खरी निर्भयता तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा मार्ग मिळवून देते, अशी निर्भयता मिळविण्यासाठी दृढ निश्चय करा, जवळच्या माणसांशी मग ते मित्र असोत, व्यवसायबंधू असोत, अथवा जवळचे कुटूंबातील रीस्तेदार असोत, त्यांच्यासोबत याविषयी खुलेपणाने बोला. अशी भेटलेली माणसं, पुस्तके एखादे नाटक-चित्रपट यातूनच कदाचित तुमच्या जीवनात एक वेगळी वाट गवसेल, मग तुम्ही आनंदाच्या, यशाच्या, प्रसन्नतेच्या आणि तेजाच्या वाटेवर निश्चितच पुन्हा घोडदौड कराल...!

- सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget