Halloween Costume ideas 2015

समुपदेशनाची गरज


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, डेल्टा, आणि आता नव्याने येऊ घातलेल्या ओमिक्राॅन  या विषाणूंमुळे सर्वत्र संभ्रमावस्था व भय निर्माण झाले आहे, कोरोनामुळे अनेक नातेवाईक, आप्त, मित्र, शेजारी यांच्यापैकी बळी पडलेले रुग्ण आणि त्यांच्या हलाखीच्या बातम्या किंवा अफवा ऐकून सर्वसामान्य माणूस घाबरून व हडबडून गेला होता,

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून समाजात औदासिन्य आणि नैराश्यता यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यातून मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे.कितीही प्रयत्न केला तरी वृत्तपत्रांतील तसेच दूरदर्शन वरील व समाज माध्यमातून कोरोनाच्या बातम्या आणि दृश्ये पाहून सर्वसामान्य माणसाचे मन सैरभर होते. त्यामुळे समाजमनाची एकाग्रता भंग पावते. त्यातच हे मानवनिर्मित संकट असून जागतिक जैविक युद्घाची नांदी आहे की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. चीन ने पुकारलेले हे जैविक युद्ध आहे, असे माध्यमातून ऐ्कल्यापासून तर सर्वसामान्य माणूस मोठ्या प्रमाणावर औदासिन्याच्या आणि नैराश्याच्या गर्तेत जावू लागला आहे. 

खरं तर शरीराचे आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे. ही संपत्ती मिळण्याकरिता प्रत्येक माणसाला एकाग्रता जरूरीची असते. स्वास्थ्य म्हणजे तरी काय ? ज्याचे चित्त 'स्व' मध्येच राहते तो स्वस्थ. आपले चित्त स्वभावतः 'स्व' कडून इतरत्र जात असते. कोठूनही आवाज आला की आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. समाजात काही अघटीत घडले की एकाग्रता भंग पावते. एखादे आकर्षक दृश्य समोर आले की आपली नजर तिथे खिळते. अर्थात या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कुठे दुखले-खुपले की आपले लक्ष शरीराच्या त्या-त्या भागाकडे जाते. मनाविरूद्ध काही घडले की, आपला अपमान झाला असे वाटते. मग त्याच विचाराने पुन्हा पुन्हा आपले मन त्रस्त होते. आपले आर्थिक नुकसान झाले, किंवा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, तर भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. तसेच, काही सामाजिक घटनांची स्मृती आपल्याला छळत राहते. या सर्वांमुळे आपले शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक स्वास्थ्य बिघडते व आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनाला नैराश्य येऊ लागते. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने स्वास्थ्याची व्याख्या केली आहे. स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार अथवा अपंगत्व यांचा अभाव एवढेच नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती म्हणजेच स्वास्थ्य. अशी ही व्याख्या आहे. या पार्श्वभूमीवर स्थिर पद्धतीचे व्यायाम म्हणजे जीममध्ये जाऊन वेटलिफ्टींग, स्प्रिंग एक्झरसायझेसन,तर चल पद्धतीचे व्यायाम म्हणजे चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालविणे, तसेच तोल सांभाळता येणे यासारखी विशिष्ट कवायती, लवचिकता येण्यासाठी योगासने व सूर्यनमस्कार यांची सवय करावी. यामुळे स्नायूंचा व सांध्यांचा कडकपणा कमी होऊ शकतो. अर्थातच प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची प्रसन्नता!म्हंटलंच आहे,..." मन करारे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण||"

जीवनात ज्याला कुठेही रस दिसत नाही; बाह्य जीवनातील रसांचा आस्वाद घेण्याएवढी रसनिष्पत्ती ज्यांत होत नाही तो नीरस म्हणजे निराश माणूस. जीभ कोरडी पडली की चव समजत नाही. जिभेवर जोपर्यंत ओलावा/किंवा रस असतो, तोपर्यंतच तोंडाला चव असते, आणि मनुष्याला खावेसे वाटते. तसेच, जीवनात सर्व अंगांचा रस चाखण्याच्या बाबतीत शरीरात शक्ती असावी लागते व ती रसरूपाने प्रकट व्हावी लागते अन् खाल्यानंतर त्याचा प्रथम रस होतो आणि अन्नाचे सेवन होत-होत अस्थी तयार झाल्या की पुढे अस्थींमधील मज्जा तयार होतात हे चक्र शरीरात सतत चालू असते.

"पळा पळा कोण पुढे पळे तो" अशी सध्याची अवस्था आहे,जीवनातील अति धावपळीमुळे किंवा अतिप्रमाणांत असलेल्या - इच्छा,हाव किंवा वासनांमागे पळण्यांत माणसाची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते, अर्थात त्यामुळे मनुष्य स्वास्थ्य हरवून बसला आहे,  पण गेल्या दोन वर्षांपासून  कोरोनामुळे माणसाचे पळणेच बंद झाले आहे. त्यामुळे त्याला काही साध्य करता येत नाही. यामुळे माणसाला नैराश्य येते. काही करावेसे न वाटणे, म्हणजे चलनवलनांत आलेला अडथळा, बसल्या जागेवरून उठावेसे न वाटणे, डोळे मिटून पडावेसे वाटणे, कोणाशी बोलू नये असे वाटणे, माझी इच्छा नाही, मला काही नको- अशा तऱ्हेची प्रतिक्रिया येणे, हे सर्व प्रकार लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पहायला मिळाले. कोरोनाविषयी सतत येणारे डोक्यातले विचार थांबतच नाहीत व डोके भणभणायला लागते व यांतून नैराश्य येते. अशी परिस्थिती सर्वत्र पहायला मिळाली,

आपण नुसताच  बसून वेळ वाया घालवतो आहे. या विचारांमुळे, बर्‍याच लोकांना नैराश्य व औदासिन्य आले. पण लक्षात घ्या की काहीही न करण्याची एक कला आहे. तीला समजून घेणे आवश्यक आहे.म्हणजे पहा मजा म्हणून, फन म्हणून काहीतरी मनाला आवडेल ते करायचे, कामात व्यग्र नाही म्हणून निराश होऊ नका. ‘क्या बडा तो दम बडा', ही म्हण लक्षात घ्या. नैराश्य किंवा औदासिन्य हे काही आज नवं नाही. तरीही त्या रोगाची लक्षणे जाणून घ्यावीत. जीवनातील चढउतार सर्वांच्या परिचयाचे असतात. परिस्थितीनुसार, कधी आनंदित होणे, कधी दु:खी होणे, कधी चिंतित होणे स्वाभाविक होय. पण जगण्यांत स्वास्थ्य उरले नाही. स्वतःहून काही करण्याची इच्छाच नाही. जीवनांत रस उरला नाही असे सतत वाटू लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही भावना दीर्घ काळपर्यंत तशीच राहिली किंवा पुन्हा पुन्हा जाणवू लागली तर ते अधिक हानीकारक आहे, कोरोनाचा संसर्ग व प्रत्येक वेळचे लॉकडाऊन यामुळे झोप कमी किंवा खूपच जास्त येणे, मन एकाग्र न होणे, जी गोष्ट सहज करता येत असे,ती आत्ता जमेनाशी होणे, छोट्या, छोट्या गोष्टींचा राग येणे, स्वत:वर नियंत्रण ठेवता न येणे, अन्नावरची वासना एकदम उडणे, जगण्याचा कंटाळा येणे, शारीरिक पातळीवर थकवा व मानसिक पातळीवर गोंधळ उडणे, निर्णय घेणे अवघड होणे, असुरक्षित वाटणे, धडाडीने काही करावे अशी इच्छाच न होणे आदी लक्षणे ही केवळ भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. एक प्रकारचा भयगंड समाजमनामध्ये मोठ्या प्रमाणात पसरू लागला. समाजाच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे वाईट व घातकच आहे . हा भयगंड घालविण्यासाठी समुपदेशनाची मोठी गरज आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारतर्फे अशा समुपदेशनासाठी काही योजना आखल्या पाहिजेत, शिवाय समाजातील जाणत्या नागरिकांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे.मानसिक स्वास्थ्यासाठी जवळच्या माणसाचा आधार आणि समुपदेशन यांची मुख्यतः गरज असते.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget