(९५) आणि त्या लोकांमध्ये सामील होऊ नकोस ज्यांनी अल्लाहची वचने खोटी लेखली, अन्यथा तू नुकसान सोसणाऱ्यांपैकी होशील.९६
(९६,९७) वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांवर तुझ्या पालनकर्त्याचे वचन खरे ठरले आहे९७ त्यांच्यासमोर मग कोणते का संकेत येवोत ते कदापि श्रद्धा ठेवणार नाहीत जोपर्यंत दु:खदायक प्रकोप समोर येताना ते पाहणार नाहीत.
(९८) पण असे एखादे उदाहरण आहे काय की एका वस्तीने प्रकोप पाहून श्रद्धा ठेवली आणि तिची श्रद्धा तिला लाभदायक सिद्ध झाली? युनूस (अ.) च्या लोकांखेरीज९८ (अन्य कोणतेही असे उदाहरण नाही) त्या लोकांनी जेव्हा श्रद्धा ठेवली होती अलबत तेव्हा आम्ही त्यांच्यावरील या जगातील जीवनात अपमानजनक प्रकोप टाळला होता.९९ आणि त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी दिली होती.१००
(९९) जर तुझ्या पालनकर्त्याची इच्छा अशी असती (की पृथ्वीतलावर सर्व ईमानधारक व आज्ञाधारकच असावेत) तर सर्व भूतलवासीयांनी श्रद्धा ठेवली असती.१०१ मग तू लोकांना भाग पाडशील का की ते श्रद्धावंत बनतील?१०२
९६) हे संबोधन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे, परंतु खरे तर त्यांना सांगणे अभिप्रेत आहे जे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या संदेशात शंका घेतात. ग्रंथधारकांचा हवाला यासाठी दिला आहे की अरबातील सर्वसामान्य लोक ईशग्रंथाच्या ज्ञानापासून अनभिज्ञ होते. त्यांच्यासाठी हा आवाज एक नवा आवाज होता. परंतु ग्रंथधारकांच्या विद्वानांपैकी जे लोक धार्मिक आणि न्यायप्रिय होते ते याची पुष्टी करू शकत होते की ज्याकडे कुरआन लोकांना बोलवित आहे त्याकडे सर्व पैगंबरांनी लोकांना आवाहन केले आहे.
९७) म्हणजे ते वचन जे सत्यवादी नसतात त्यांना ईमान धारण करण्याचे सौभाग्य प्राप्त् होत नाही; कारण त्यांच्या मनावर दुराग्रह, हठधर्मीपणाची कुलुपे लावलेली असतात. असे लोक जगाच्या मोहात मस्त होतात आणि परिणामांपासून बेफिकीर असतात आणि त्यांना ईमानचे सौभाग्य प्राप्त् होत नाही.
९८) आदरणीय यूनुस (अ.) (यांचे बायबलमध्ये नाव युनाह आहे, यांचा काळ इ. पू.८६०-७८४ दरम्यान दाखविला जातो) इस्राईली पैगंबर होते तरी त्यांना सीरियातील लोकांच्या मार्गदर्शनासाठी इराकला पाठविले गेले होते आणि याच आधारावर त्या लोकांना येथे `यूनुसचे अनुयायी' असे म्हटले आहे. याचे केंद्र त्या वेळी नैनवा शहर होते. याचे अवशेष आजसुद्धा दजला नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वर्तमान नगर मुसलच्या अगदी समोर सापडतात. याच क्षेत्रात ``यूनुसनबी'' म्हणून एक स्थान प्रसिद्ध आहे. या राष्ट्राच्या प्रगतीचा अंदाज यावरून येतो की त्याची राजधानी `नैनवा' अंदाजे साठ मैलाच्या परिघात फैलावली होती.
९९) कुरआनमध्ये या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख संकेतात्मक रीतीने तीनदा आला आहे. (पाहा सूरह २१, आयत ८७-८८, सूरह ३७ आयत १३९-१४८, सूरह ६८, आयत ४८-५०) म्हणून विश्वासपूर्वक सांगू शकत नाही की हे राष्ट्र कोणत्या प्रमुख कारणांनी अल्लाहच्या या नियमांनी मुक्त ठेवले गेले होते की शिक्षेचा निर्णय झाल्यावर ईमान धारण करणे लाभप्रद नसते. कुरआन संकेत आणि यूनुस (अ.) यांच्या ग्रंथातील (सहीफा) विस्तृत विवेचनानुसार माहीत होते, की आदरणीय यूनुस (अ.) शिक्षेची सूचना दिल्यानंतर अल्लाहची परवानगी न घेता त्यांनी त्यांचे मुख्य ठिकाण सोडले होते. म्हणून शिक्षेच्या निशाण्या पाहून आशूरीयांनी पश्चाताप व्यक्त केला तेव्हा अल्लाहने त्यांना क्षमा केली. कुरआनमध्ये अल्लाहच्या विधानाचे जे नियम सांगितले गेले आहेत, त्यापैकी एक म्हणजे अल्लाह कुणा राष्ट्राला (समूहाला) तोपर्यंत शिक्षा देत नाही जोपर्यंत त्यांच्यावर आपली युक्ती पूर्ण करीत नाही. म्हणून पैगंबराने त्या राष्ट्राच्या सवलतीच्या अंतिम काळापर्यंत पैगंबराची जबाबदारी पूर्ण केली नाही आणि अल्लाहच्या निर्धारित वेळेपूर्वीच आपल्या जागेवरून दुसरीकडे गेला, तेव्हा अल्लाहच्या न्यायाने त्या राष्ट्राला शिक्षा करणे योग्य समजले नाही. कारण युक्ती पूर्ण करण्याची कायदेशीर बाब पूर्ण झाली नव्हती. (तपशीलासाठी पाहा सूरह ३७, टीप ८५)
१००) जेव्हा या लोकसमुहाने ईमान धारण केले तेव्हा त्याच्यासाठी सवलतीची मुदत वाढविण्यात आली. कालांतराने त्यांनी पुन्हा विचार आणि आचारात मार्गभ्रष्टता स्वीकारली. पैगंबर नाहूम (इ. पू. ७२०-६९८ ) यांनी त्या लोकांना सचेत करण्यासाठी चेतावनी दिली, तीसुद्धा उपयोगी ठरली नाही. नंतर पैगंबर सफनियाह (इ.पू. ६४०-६०९ ) यांनी त्यांना अंतिम चेतावनी दिली परंतु लोकांनी त्या चेतावनीकडे दुर्लक्ष केले. शेवटी इ. पू. ६१२ च्या काळात अल्लाहने मीडियावाल्यांना त्यांच्यावर प्रभुत्वशाली बनविले. त्यांनी संपूर्ण शहर जाळून राख केले. अशूरचा बादशाह स्वत: आपल्या महालात आगीत जळाला आणि त्याच्यासह अशूरी राज्य आणि संस्कृती कायमचीच नष्ट झाली. वर्तमान युगात पुरातत्व विभागाचे खोदकाम या क्षेत्रात झाले त्यात अग्नीत भस्म झालेले अवशेष सापडतात.
१०१) जर अल्लाहची इच्छा असती की त्याच्या भूमीत नाकारणारे आणि अवज्ञाकारी प्रारंभापासून नकोत तर त्याच्यासाठी हे काम अवघड नव्हते. परंतु मानवाला निर्माण करण्यात जो विवेकपूर्ण उद्देश त्याच्यासमोर होता तो अशाने समाप्त् झाला असता. म्हणून अल्लाह स्वत: मनुष्याला ईमान धारण करणे किंवा न करणे तसेच आज्ञापालन करणे किंवा न करणेसाठी स्वतंत्र ठेवू इच्छितो.
Post a Comment