Halloween Costume ideas 2015

अखंड भारताचे स्वागतच


एखाद्या वैचारिक संस्थेने आपल्या स्थापनेच्या वेळी काही उद्दिष्टे ठरवलेली असतात. ती उद्दिष्टे साकार करण्यासाठी ती संस्था, संघटना, तिचे कार्यकर्ते आयुष्यभर सतत संघर्ष करत असतात. अशा सर्व संस्था-संघटनांची उद्दिष्टे साकार होतीलच याची शाश्वती नसते. वर्षानुवर्षे सतत प्रयत्नशील असताना प्रसंगी आपल्या ऐहिक ऐश्वर्यांचे बलिदान दिल्यावर देखील काही साध्य झाले नसेल तर मग अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येते. जे आपल्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत असतात त्यांच्यावर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य उदासीनता येऊ नये यासाठी कमालीचे परिश्रम घ्यावे लागत असते. त्यांना स्वतःच्या मनोबलासहितच आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल, त्यांच्यातील उत्साह त्यांची संघटनेसाठी निष्ठा या सर्व आणि आणखीन बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते. संघटनेंतर्गत आव्हानांबरोबरच बाहेरील आव्हाने देखील असतात. शासनाशी सामना करावा लागतो. इतर सामाजिक-धार्मिक समुदायांच्या शंका-कुशंकांचे निरसन करावे लागते. जोपर्यंत आपण ठरवलेली उद्दिष्टे साकार होत नाहीत तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित-अव्यवस्थित, भले-बुरे संस्थासधनांना जीवित ठेवले जाते, कारण त्या पलिकडे दुसरा उपाय नसतो. कोणत्याही संघटनेसमोर खरे आव्हान तिच्या प्रस्थापितांनी ठरवलेले उद्दिष्ट साकार झालेले असता तेव्हा उभे राहातात. रा. स्व. संघासमोर सध्या हीच समस्या निर्माण झाल्यासारखी वाटते. त्यांनी कोणते उद्दिष्ट ठरवले होते याची उघड माहिती त्यांनी लोकांना दिली नाही. त्यांना नेमके काय हवे आहे? भारतात ८० टक्के हिंदू धर्मियांची लोकसंख्या असताना देखील ‘हिंदुत्वा’च्या वेगळ्या विचारधारेची गरज का भासली? त्यांना भारत देशाच्या भुगोलाची जास्त काळजी आहे की तमाम भारतीय मानवतेची काळजी आहे? त्यांना भारताच्या नागरिकांचा विकास घडवायचा आहे की कोणत्या एका विशिष्ट समुदायाची त्यांना जास्त काळजी आहे? लोकांची अशी समजूत आहे की संघाला अभिप्रेत म्हणजे ब्राह्मणवाद किंवा बाह्मण समुदाय आहे. पण हे कितपत खरे व कितपत खोटे हे सांगता येत नाही. कारण संघाने आपल्या तोंडातून असे कधी सांगितलेले नाही. त्याचबरोबर हे देखील तितकेच खरे की संघाने असेही कधी सांगितले नाही की साऱ्या भारतीयांच्या मग ते कोणत्याही जातीधर्माचे नागरिक असोत, त्यांचे कल्याण त्याला अभिप्रेत आहे. जर ब्राहम्ण समाजाचे हित साधायचे असेल तर सध्या त्यांच्यासाठी सत्ता आणि संपत्तीची सर्व दारे खुली आहेत. शासन-प्रशासन, शिक्षण, माध्यम, अर्थकारण, संस्कृती-सभ्यता, प्रगतीची हे सारे स्रोत त्यांना उपलब्ध आहेत. यापुढे आणखीन काय हवंय? एक गोष्ट नक्की की अर्थकारणावर सध्या केवळ गुजरातींचा ताबा आहे आणि तेही संघाच्याच संगनमताने. कोणत्याही संघटनेचे एक महत्त्वाचे लक्ष्य सत्ताप्राप्ती असते. कारण ही गुरुकिल्ली आहे कोणत्याही समुदायाला अबाधित वर्चस्व प्राप्त करण्याची. संघाची खरी अडचण हीच आहे. एकदा सत्तेचे उद्दिष्ट गाठल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना आता कोणती स्वप्ने दाखवायची? आणि म्हणूनच सरसंघचालक सध्या नवनवीन भाषा आणि भाषणे करत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अनेकदा मुस्लिमांना संबोधून असे म्हटले होते की भारतातील मुस्लिमांचा आणि येथील साऱ्या नागरिकांचा डीएनए एकच आहे. सारे मुस्लिम भारतीयच आहेत. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. कारण तेही उतरांसारखे हिंदूच आहेत. फक्त त्यांच्या पूजाअर्चा, उपासना विधी वेगळ्या आहेत. मुस्लिमांनी यावर काही आक्षेपही घेतला नाही की उघड मान्यताही दिली नाही. याची कारणे सर्वांनाच माहीत असतील. आता भागवतांचे म्हणणे असे आहे की हिंदू जेथे राहात आहेत आणि आपल्या परंपरेचे पालन करत आहेत तो हा हिंदुस्थान आहे. हिंदू नावांनी ओळखल्या जाणाऱ्यांनी या भूमीचा विकास केला आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत. असे त्यांनी ग्वाल्हेर येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. भागवतांनी जे काही हिंदू आणि भारताविषयी विचार मांडले त्यावर आजपर्यंत कुणी प्रश्नचिन्ह मांडले नाही आणि पूर्वीपासूनच ही सत्यता चालत आलेली असताना आज पुन्हा त्याची उजळणी करून देण्याची काय गरज होती? प्रश्न हा आहे. पुढे जाऊन ते म्हणतात की ब्रिटिशांनी आमची हिंदुत्वाची ओळख नष्ट केली. ब्रिटिशांनी कुणाची ओळख नष्ट केली हा इतिहासाचा प्रश्न आहे. काही इतिहासतज्ज्ञांच्या मते ब्रिटिशांना भारतातील अजेंडा इथली सत्ता मुस्लिमांच्या हातातून काढून हिंदुंच्या हातात द्यायची होती आणि झालेही तसेच. तेव्हा ब्रिटिशांनी कुणाची ओळख नष्ट केली याचा संबंध सद्यस्थितीशी नाही. भागवतांनी जे विचार या कार्यक्रमात मांडले ते नेहमीचेच आहेत. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र असून त्याचे मूळ हिंदुत्व आहे. हा विचार देखील जुनाच आहे. काही लोकांचा त्यांच्या या विचारावर पुर्वीपासून आक्षेप आहे. पण हा आक्षेप वैचारिक पातळीबर आहे. यामुळे भारतीय नागरिकांत आजवर कलह निर्माण झाला नाही. ते पुढे म्हणाले की हिंदू हे भारतापासून अबिभाज्य आहेत आण भारत हा हिंदूंपासून वेगळा नाही, हेदेखील खरे आहे. सरसंघचालक असेही म्हणाले की हिंदुंना हिंदू म्हणून कायम राहायचे असेल तर त्यांनी या देशाला अखंड बनवावे लागेल. अखंड भारताची कल्पानादेखील नवीन नाही. संधाने पूर्वीपासूनच वेळोवेळी हे विचार मांडले आहेत. आणि जर पुन्हा एकदा अखंड भारत करता आला तर त्याचे स्वागतच. कारण भारताच्या अर्ध्याहून अधिक समस्या आपोआपच संपुष्टात येतील. मुस्लिमांची पाकिस्तानची अडचण दूर झाली की ते सुद्धा शांततेचे जीवन जगतील. कुणी त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची धमकी देणार नाही. धमकी देणारेच पाकिस्तानला भारताशी जोडतील. आणि पाकिस्तानच काय इतिहासापासून अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार या सगळ्यांनी मिळून अखंड भारत बनविला तर आणखीनच बरे होईल. काश्मीरची समस्या कायमची सुटून जाईल. तर कुणी अखंड भारताचा विरोध करणार असे त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी तसा विचार करू नये. खरी गोष्ट अशी की एकदा सत्ता हाती आली की कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते सैरावैरा होतात. त्यांना एकजूट ठेवणे संघटनेची गरज असते. तसे केले नाही तर संघटनेचे अस्तित्वच धोक्यात येते. हे टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना जुनी उद्दिष्टे नव्या रूपात सांगायची असतात ही वस्तुस्थिती.              

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget