’तबलिगींनी कोरोना आणला’, असा शोध लावणारी माध्यमं तर याविषयी बोलतील, हे संभवतही नाही. बेमुर्वतखोर उद्योजक, विखारी राजकारणी आणि बेताल माध्यमं यांची आघाडी आहे. माध्यमांचं अर्णबायझेशन झालं आहे. माध्यमं मग ती नवी असोत की जुनी, त्यांचं काम एकच आहे. भूल देणं. अनस्थेशिया देणं. माध्यमांनी अनस्थेशिया द्यायचा आणि व्यवस्थेनं ऑपरेशन फत्ते करायचं, असं हे कारस्थान आहे.
आजच्या विषयाच्या शीर्षकाची शब्दसंख्या आणि वक्त्यांची संख्या यामुळे हा परिसंवाद आहे की आंदोलन आहे, असाच प्रश्न मला पडला. पण, संमेलनात तरी या विषयावर चर्चा होते आहे, हे लक्षण चांगले आहे. अन्यथा, कृषी कायदे आले, तेव्हाही चर्चा नाही झाली. आणि, ते मागे घेतले तेव्हाही चर्चा नाही झाली. चर्चाच करायची नाही, असं आपण ठरवलेलं आहे. आपण फक्त ’मन की बात’ करायची आहे! जो चर्चा करेल, तो देशद्रोही. जो मान हलवेल, तो देशभक्त, अशी नवी व्याख्या आहे. त्यामुळं होयबांची सध्या चलती आहे. काही होयबांना कंगना राणावत म्हणतात. काही होयबांना अर्णब गोस्वामी म्हणतात. तर, काही होयबांना विक्रम गोखले म्हणतात. त्या ’लष्कर ए तोयबा’पेक्षा या ’लष्कर ए होयबा’ची भीती मला जास्त वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना संसदेत सादर केली, तेव्हा त्यांचं 25 नोव्हेंबर 1949 चं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही एकदा मुद्दा मांडलात आणि तो मला पटला नाही, तर तुमचा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण, मला मान्य नसलेला तुमचा मुद्दाही तुम्हाला मांडता यावा, यासाठी जिवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाचि वाद आपणाशी पण, ही स्पेस आहे कुठे? वेगळा मुद्दा मांडला की त्याचा दाभोळकर होतो. गोविंद पानसरे होतो. गौरी लंकेशचा खून होतो. कलबुर्गींचा खून होतो. मग, नयनतारा सहगल यांच्यासारख्या म्हातारीची भीती वाटते. मग, भीती वाटते जावेद अख्तर यांचीही. असा हा काळ आहे. नकार देणं सोपं नाही. विरोध करणं सोपं नाही. हेमंत टकले, हसू नका. आज तुम्ही बोलता आहात. पण, संसदेत हे कायदे मंजूर होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तुमचा पक्ष काय करत होता? तुम्हीही त्या ’लष्कर ए होयबा’मध्येच तर होतात! अशावेळी नकार कोण देणार? काल जावेद अख्तर म्हणाले ते खरंय. बिल्ली के गले में घंटी बांधना! यहां तो दिल्ली के गले घंटी बांधनी थी। पण, आमचे शेतकरी उभे राहिले आणि त्यांनी दिल्लीच्या विरोधात आंदोलन उभे केले.
शेतकऱ्यांनी आजवर कमीवेळा आंदोलन केलेले नाही. पण, यावेळचे आंदोलन वेगळे होते. कारण, ते केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन उरले नाही. प्रत्येक माणूस त्या आंदोलनात उतरला. आजवर सगळ्यात मोठी गोची हीच झाली आहे की शेतकरी ही कोणत्याही पक्षाला व्होटबँक वाटत नाही.
शेतकरी व्होटबँक होण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्येकाला आपले वाटायला हवेत. पण, तसे ते होत नाहीत. पंजाबमध्ये प्रामुख्याने हे घडले. हा मुद्दा शेतकऱ्यांचा राहिलाच नाही. पूर्ण राज्याचा झाला. शिरोमणी अकाली दलाला सरकारमधून आणि मग एनडीएमधून बाहेर पडावे लागले. कॅप्टन अमरिंदरसिंग काँग्रेसमधून बाहेर पडले खरे, पण या मुद्यावरून भाजपला पाठिंबा देणे त्यांना शक्य नव्हते. अखेर हे कायदे मागे घेतले गेले. अर्थात, अजूनही आंदोलन थांबलेले नाही. मुद्दा असा की, शेतकऱ्यांचा मुद्दा राज्याचा होतो, तेव्हाच असे यश मिळू शकते.
धनदांडग्या उद्योजकांच्या घशात संपूर्ण देश दिला आहेच. पण, कोणीच काही बोलले नाही. शेतकरी मात्र बोलला. म्हणून हे यश मिळाले. त्याला भयंकर त्रास दिला गेला. त्यांच्या वाटेत खिळे टाकले. त्यांना गुन्हेगार ठरवले. तरीही शेतकरी गांधींच्या वाटेने जात राहिला. तोच गांधी, ज्याने त्याचे पहिले आंदोलन शेतकऱ्यांसाठी केले. चंपारण्य सत्याग्रह काय होता? चंपारण्य सत्याग्रहालाही यश मिळाले. या आंदोलनालाही यश मिळाले. गांधींच्या समोर असणारे सरकार जुलमी होते. पण, तरीही किमान विवेक शाबूत होता. या शेतकऱ्यांसमोर असणारे सरकार जुलमी होतेच, पण अविवेकीही होते. पण, कोणत्याही आंदोलनात शेवटी गांधीच वाट दाखवत असतो. गांधींचा विजय होणारच असतो.
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है
सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है
मुद्दा असा आहे की, हे सगळे होत असताना, माझ्या देशातील, महाराष्ट्रातील लेखक-कवी कुठे आहेत?
मला पाकिस्तानातील एका कवीची कविता आठवते. आणि, पाकिस्तानातील कवीची कविता, हे सांगणे महत्त्वाचे यासाठी आहे. कारण, पाकिस्तानात कवीही असतात, हे आपल्याला कळायला हवे. असो. तर, तो कवी असे म्हणतोः माझ्या देशात दंगल उसळली, तेव्हा लष्कर काय करत होतं? पुढं तो म्हणतो, माझ्या देशात दंगल उसळली, तेव्हा पोलीस काय करत होते?
आणि शेवटी तो विचारतोः
माझ्या देशात कवी आणि लेखक असताना दंगल उसळलीच कशी? कवी आणि लेखक असणं म्हणजे हे आहे.
पण, पाना-फुलांच्या कविता करणाऱ्या आमच्या साहित्यिकांना या वास्तवाचं भान तरी आहे का? अब्रूची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या वर्तमानाला जाब तरी विचारताहेत का हे लोक? शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवलं जातं. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना मारलं जातं. तरीही, याविषयी बोलायला आमचा लेखक तयार नाही. तो मग्न आहे पुरस्कारांच्या गर्दीत. महामंडळं आणि सरकारी कमिट्या हव्यात त्याला. अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख करतो आपण, पण अण्णा भाऊ त्या काळात भूमिका घेत होते. तो वारसा झेपणार आहे का यांना? चलनी नाण्याप्रमाणं वारसा सांगतील हे बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा आणि आणखी कोणाचा! पण, प्रत्यक्षात हे आहेत पार्टनर व्यवस्थेचे. यांच्याकडून अपेक्षा काय बाळगायची? हे चांगले साहित्यिक तर नाहीतच, पण चांगले नागरिकही होऊ शकणार नाहीत असे लोक.
अहो, केरळ हे कम्युनिस्ट राज्य. पण, तिथंल्या एका मल्टिनॅशनल कंपनीने चक्क स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या. आणि, काही जिंकल्याही. ही कंपनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी करतेय. घखढएद नावाची ही कॉर्पोरेट कंपनी. एम. सी. जेकब या उद्योजकाने 1968 मध्ये ती सुरू केली. सध्या ती केरळमधील सगळ्यात मोठी प्रायव्हेट कंपनी आहे, जी सर्वाधिक लोकांना रोजगार देते. या कंपनीची वैचारिक भूमिका अशी, की कंपनीने एकही कामगार युनियन उभी होऊ दिली नाही. इस्ट इंडिया कंपनी अशी समोर असतानाही आमचे लेखक त्यावर बोलत नाहीत. भाष्य करत नाहीत.
’शेतकऱ्यांचा आसूड’ उगारणारा महात्मा फुले हा कोण माणूस होता? तो लेखक होता. कवी होता. शाहीर होता. नाटककार होता. गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद हे सारे लेखक होते. तेही लेखक होते. तुम्हीही लेखक आहात. मग तुम्ही गप्प कसे बसू शकता? मूक कसे असू शकता? सगळे लेखक सुट्टीवर गेले आहेत आणि सुट्टीच्याच गोष्टी लिहीत आहे. म्हणून ही अवस्था आज आहे.
पंजाबमध्ये सगळेच एकवटले, म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली. उद्दाम राजसत्तेला माफी मागावी लागली. ’कोरोना’च्या कालावधीने तर हे सगळे आणखी ठळक केले आहे. स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे देशभर दिसत होते. ’डिजिटल’ जगात झूम आणि गुगल मीट सुरू झालेल्या असताना, ही माणसं जिवाच्या आकांतानं पायपीट करत होती. अचानक ’लॉकडाऊन’ जाहीर झाला आणि हातावरच ज्यांचे पोट होते, त्यांचे जगणे उद्ध्वस्त झाले. स्थलांतरित मजूर आपापल्या गावाकडे निघाले. त्यांच्याकडे ना जीपीएस होते, ना कोणते वाहन. हजारो किलोमीटरची वाट तरीही ते तुडवत राहिले. पोलिसांच्या काठ्या चुकवत, दिसेल त्या दिशेने चालत राहिले. औरंगाबादजवळच्या करमाडमध्ये रेल्वे ट्रॅकवर चालताना भरधाव रेल्वेखाली चिरडून सोळा मजूर मृत्युमुखी पडले.
तो फोटो आला, तेव्हा संपादक म्हणून मोठा पेच होता. फोटोमध्ये सोळा मृतदेह दिसत होते आणि त्यांच्याशेजारी इतस्ततः भाकरी पडलेली. असा फोटो प्रसिद्ध करणे हे लोकांचे लक्ष विचलित करणारे. त्यामुळे हा फोटो प्रसिद्ध करू नये, असाही एक विचारप्रवाह होता. मात्र, वास्तवापासून दूर पळता येत नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तो प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्या फोटोशेजारी मी दिलेली कॅप्शन अशी होती -
अजंठा-वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेतं आणि, शेजारी सापडेल, निवर्तलेली भाकरी तेव्हा, विकास हीच त्या काळातील सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील.
फोटो पाहून सगळेच हादरले. पण, संसदेत हा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा सरकारकडे ना मृतांचा आकडा होता, ना स्थलांतरितांची माहिती. एरव्ही, ’डेटा इज फ्यूएल’, असे म्हणणाऱ्या सरकारकडे हा डेटा मात्र नव्हता. या मजुरांचं काय झालं, या प्रश्नावर कोणाकडंही अधिकृत उत्तर नाही. सारे चूप आहेत. ’तबलिगींनी कोरोना आणला’, असा शोध लावणारी माध्यमं तर याविषयी बोलतील, हे संभवतही नाही. बेमुर्वतखोर उद्योजक, विखारी राजकारणी आणि बेताल माध्यमं यांची आघाडी आहे. माध्यमांचं अर्णबायझेशन झालं आहे. माध्यमं मग ती नवी असोत की जुनी, त्यांचं काम एकच आहे. भूल देणं. अनस्थेशिया देणं. माध्यमांनी अनस्थेशिया द्यायचा आणि व्यवस्थेनं ऑपरेशन फत्ते करायचं, असं हे कारस्थान आहे.
अशावेळी नकार कोण देणार? ’मॅन्युफॅक्चरिंग कन्सेन्ट’ असे सहमती तयार करणारे कारखाने तेजीत असताना, माझ्या शेतकऱ्यांनी नकार दिला. प्रश्न विचारायचं धाडस केलं. आणि, व्यवस्थेलाही माघार घ्यावी लागली.
ले मशाले चल पडे है, लोग मेरे गांव के
अब अंधेरा जीत लेंगे, लोग मेरे गांव के!
ही खात्री त्यामुळे अधोरेखित झाली आहे.
पण, ही मशाल लेखकांच्या हातात मात्र नाही, हे शल्य नोंदवत इथं थांबतो.
Post a Comment