दिवाळीच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांची होळी’ या शीर्षकाखाली, ऑक्टोबर 2020च्या ‘पुरोगामी जनगर्जना’ व ’शोधन’ मध्ये लेख लिहून शेतीची तीन विधेयके, कोणत्याही चर्चेला वाव न देता, 17 सप्टेंबर 2020 रोजी लोकसभेत बहुमताच्या आधारे आणि 20 सप्टेंबर 2020 रोजी राज्यसभेत बहुमत नसल्याने आवाजी मतदानाच्या आधारे ज्या प्रकारे मंजूर करून घेण्यात आली आणि राष्ट्रपतींनी सही केल्याने त्या विधेयकांचे ज्या पद्धतीने कायद्यात रूपांतर करण्यात आले त्याचा तीव्र धिक्कार केला होता. देशाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूद करून आता त्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषिक्षेत्र कॉर्पोरेटक्षेत्राच्या घशात घालण्याचे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे असेही आम्ही मांडले होते.
आपल्या देशातील 50% रोजगार हा कृषिक्षेत्र निर्माण करते. भारतातील 58% जनतेचा उदरनिर्वाह हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. आपल्या देशाचा 17% जी.डी.पी. हा एकट्या कृषिक्षेत्रातून येतो तर सुमारे 48% हिस्सा सेवाक्षेत्राकडून येतो.
देशाच्या जी.डी.पी.मधील उद्योग क्षेत्राचा 2019 मधील वाटा आहे 25% (जो मोदी येण्यापूर्वी 32% होता. स्मार्ट इंडिया, स्कील इंडिया, मेक इन इंडिया, एफ.डी.आय. अशा त्यांच्या अनेक प्रयत्नांनी तो घटला). जगण्याच्या सर्व सुखसोयी, सुविधा, सवलती भोगणाऱ्या, माणशी सर्वात अधिक उत्पन्न घेणाऱ्या आय.टी. क्षेत्राचा यातील वाटा आहे फक्त 8%. कोरोना महासाथीत उद्योग क्षेत्रातील रथीमहारथी नामोहरम झाले पण कृषिक्षेत्र भक्कमपणे टिकले. बेदरकार मोदी आणि बेताल कोरोना या दोघांच्या हल्लयाने कोलमडणाऱ्या अर्थव्यवस्थेला फार मोठा आधार दिला तो कृषिक्षेत्राने. असे असताना कोरोना महासाथीच्या आडून मोदी सरकारने हे कायदे आणण्याचे षड्यंत्र ज्या पद्धतीने रचले ते निषेधार्ह होते. हे सर्व कायदे किती फसवे आहेत याचीही चिरफाड आम्ही त्या लेखात केली होती. अर्थात या कायद्यांविरुद्ध असे ऐतिहासिक आंदोलन उभे राहील हे मात्र अनपेक्षित होते. कारण गेले दीडदशक मोदी बेगुमानपणे देशात आणि देशाबाहेर थैमान घालत होते. हा अश्वमेघ कोणीच अडवू शकत नाही असे त्यांना आणि त्यांच्या बुद्धी गहाण टाकलेल्या अंधभक्तांना वाटू लागले होते. एका चहावाल्याचे रूपांतर लहरी आणि अहंकारी राजात झाले होते.
आपण करू ती पूर्व दिशा, जे बोलू ते सत्य असे त्याला वाटू लागले. देश म्हणजे मी आणि मी म्हणजे विश्वाचा महागुरू. याच अहंकारातून हा राजा देशातील बळीराजाला टाचेखाली घ्यायला निघाला. पुराणातील जनतेचा वाली असणाऱ्या बळी राजाला लबाड वामन आता पुन्हा फसवून टाचेखाली घेणार की काय अशी चिंता वाटत असताना हा आधुनिक काळातील बळीराजा स्वाभिमानाने पेटून एकजुटीने असा काही झुंजला की त्याच्या नांगरापुढे राजाच्या अहंकाराला नांगी टाकावी लागली. या लढाईत बळी राजाने आपला नांगर शस्त्र म्हणून उगारला नाही, त्याने शस्त्र उगारले ते महात्मा गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाचे. ज्यांनी गांधीला मारले त्यांचा गांधी नावाच्या अहिंसक शस्त्रानेच पराभव केला.
नांगर जिंकला, शेतकरी जिंकला, गांधी जिंकला.
अहंकार हरला, वामन हरला, नथुराम हरला!
या लढाईत मोदी, त्यांचे नाममात्र सरकार, भाजपा, आर.एस.एस. आणि त्यांच्या विषारी फौजा यांच्या लबाडीचे, दुटप्पीपणाचे खरे दर्शन घडले. या सर्वांनी आंदोलकांसाठी आंदोलनजीवी, देशद्रोही, तुकडेतुकडे गँग, खलिस्तानवादी, नक्षलवादी, डावे अतिरेकी, हुल्लडबाज अशी एक ना अनेक अपमानास्पद विशेषणे वापरली. या आंदोलनास परकीय आर्थिक पाठबळ आहे असा आरोप करण्यात आला. या आंदोलनातील आंदोलनकर्ते हे शेतकरी नसून भाडोत्री लोक असून ते बिर्याणी आणि पिझ्झा खाण्यासाठी आले आहेत असे म्हटले गेले. हे आंदोलन हिंदू धर्मविरोधी असल्याने ते चिरडले पाहिजे अशीही भाषा वापरली गेली. धर्म आणि ब्राम्हण्यवादाचाच शेवटी विजय होईल असेही म्हटले गेले. आंदोलकांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला, अभेद्य अडथळे उभारण्यात आले, जमिनींवर खिळे ठोकण्यात आले, लाठीमार, गोळीबार करण्यात आला. आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा डाव रचण्यात आला. लाल किल्लयावर शीख धर्माचा झेंडा, ‘निशाण साहेब’ फडकवला गेल्यावर ज्या आर.एस.एस.ने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला, ब्रिटिशांना मदत करण्यात धन्यता मानली, स्वातंत्र्य मिळाल्यावर तिरंगा नाकारला, भारताचे संविधान नाकारले आणि आज सात दशकांनंतर मनोरुग्ण कंगणा आणि दारुडा गोखले यांच्या मुखातून स्वातंत्र्यच नाकारले, त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचा आणि तिरंग्याचा अवमान झाला म्हणून नक्राश्रू ढाळले. भाजपा केंद्रीय मंत्र्याच्या मानसिक तोल ढळलेल्या चिरंजीवांनी लखीमपुर खेरा येथे आपल्या भरधाव जीपखाली आंदोलक शेतकरी चिरडले. वास्तवात संघ परिवार हा हिंसेचा छुपा समर्थक आणि अहिंसेची उघड खिल्ली उडवणारा आहे. हे सगळे घडूनही शेतकऱ्यांनी आपले मानसिक संतुलन ढळू दिले नाही आणि हिंसेचा आधार घेतला नाही. शेवटी तब्बल 1 वर्ष 2 महिन्यानंतर ‘निवडणूकजीवी’ मोदींनी ‘आंदोलनजीवीं’ पुढे माघार घेतली.
दुराग्रही मोदींनी ही माघार का घेतली असावी याचा विचार केला पाहिजे. मोदी-शहा हे कोणतेही सोयरसुतक नसणारे एक ‘निवडणूक यंत्र’ आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. माध्यमांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकरी आंदोलनाला लक्षावधी शेतकऱ्यांचा आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यावधी सुजाण लोकांचा पाठिंबा आहे, हे सत्य समांतर माध्यमांमधून जगापुढे आले होते. या आंदोलनात स्त्रिया, सुशिक्षित युवक-युवती आणि शाळकरी मुलेही प्रचंड प्रमाणावर सहभागी झाले होते.आंदोलनाचे व्यवस्थापन अभूतपूर्व असे होते. आंदोलकांसाठी तंबू, तंबूतील लंगर, शाळा, ग्रंथालये, रुग्णालये, शौचालये उभारण्यात आली. तंत्रज्ञ, इले्निट्रशियन्स, प्लंबर्स, गवंडी, शिक्षक, स्वयंपाकी, वैद्यकीय साहाय्यक यांच्या फौजा उभ्या राहिल्या. उबदार पांघरुणे, पंखे, जनरेटर्स, ट्रॅक्टर्स पुरवण्यात आले. थोडक्यात हे आंदोलन अमर्यादित काळ यशस्वीपणे पुढे जाईल हा निर्धार आंदोलकांनी प्रथम पासूनच ठेवला. आंदोलनातील आंदोलकांची संख्या सातत्याने राहील यासाठी आंदोलक शेतीची कामे आलटून पालटून करीत राहिले. आधुनिक समाजमाध्यमे आणि समांतर प्रसार यंत्रणा कल्पकतेने वापरण्यात आली. साहित्यिक, विचारवंत, कवी, कलाकार, गायक, चित्रकार पाठींबा देण्यासाठी उतरले.
राकेश सिंग टिकैत सारखे नवे पोलादी नेतृत्व उभे राहिले. शेतकऱ्यांचे आंदोलन निर्घृणपणे चिरडणे शक्य नाही आणि तसे करीत या निवडणुका जिंकणे तर अजिबात शक्य नाही हे सरकारच्या लक्षात आले. उत्तर प्रदेश निवडणूक ही 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाची आहे हे निर्विवाद. शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी 19 नोव्हेंबर 2021 या गुरु नानक जयंतीच्या दिवशी पंजाबमधील डेरा नानक साहेब येथे केली. त्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील गुरुद्वाराला भेट दिली. या दोघांना आपला परिवार ज्यांना ‘खालिस्तानवादी राष्ट्रद्रोही अतिरेकी’ आणि ‘शिखडे’ म्हणतो तो शीख समाज हा हिंदुत्वाचा एक महत्त्वाचा हिस्सा असल्याच्या सावरकरांच्या मांडणीचा अचानक साक्षात्कार झाला. पण सावरकरांनी ज्या मुस्लिमांना दानव आणि गोळवलकरांनी शत्रू क्रमांक एक मानले त्या मुस्लीम समाजातील अनेकांना अखिल भारतीय किसान सभेने नेतृत्वात सामावून घेऊन आपण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहोत आणि हे आंदोलन फक्त शीख समाजाचे वा हिंदू जाटांचे नाही हे आधीच दाखवून दिले होते. हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचेच होते आणि शेतकऱ्यांना हे पटवून देण्यात आम्ही कमी पडलो असा लबाडीचा सूर भाजपा लावत आहे. भाजपाने कोणताही सूर लावला तरी भारतीय शेतकऱ्यांनी एका मस्तवाल आणि मस्तवाल राजकीय शक्तीला अहिंसक मार्गाने ‘नमवले’ याची इतिहासात नोंद होईल. हे आंदोलन हा अहिंसक सत्याग्रह असल्याने कंगणा वा गोखले हा शेतकऱ्यांच्या शक्तीचा खरा विजय नसून मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली ही ‘भीक’ आहे असे म्हणू शकतात, किंबहुना असे म्हणण्याचे त्यांनी धाडस दाखवावे. प्रत्यक्षात मोदी-शहा या जोडीने शेतकरी कायद्यांना मागे घेऊन शेतकऱ्यांकडे येणाऱ्या निवडणुकीतील विजयासाठी भीख मागितली आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल. हे कायदे मागे घेतल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकरी भाजपाला मतदान करतील का या प्रश्नावर टिकैत यांनी दिलेले ‘हा प्रश्न म्हणजे जसोदाबेन मोदींशी पुन्हा लग्न करतील का असे विचारण्यासारखे आहे’ हे उत्तर पुरेसे आहे.
निवडणुकांनंतर मोदी काय करतील हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कदाचित 2024 लोकसभा जिंकण्याची ते वाट पाहतील आणि जिंकल्यास वेगळ्या पद्धतीने हे कायदे पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतील. शेतमालाला किमान आधारभूत किंमत हा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. त्याचा ठोस निर्णय लागे पर्यंत शेतकऱ्यांनी मागे हटून चालणार नाही. हे संपादकीय लिहीत असताना लोकसभा आणि राज्यसभेने ही कृषिविधेयकेमागे घेण्याचा निर्णय घेतला. पण हे करतानाही सत्ताधारी पक्षाने कोणतीही चर्चा होऊन दिली नाही. विरोधकांना गोंधळ करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
12 विरोधी खासदारांना गोंधळ घातला म्हणून निलंबित करण्यात आले. खरे तर देशाच्या पंतप्रधानांनी या विधेयकांबद्दल देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागायला हवी होती. देशाच्या पंतप्रधानाची निष्ठा जनतेपेक्षा अदानी आणि अंबानी यांच्या प्रति अधिक आहे. अर्थात अदानी आणि अंबानी ही त्यांच्या निवडणूक यंत्राची दोन इंजिने आहेत हे विसरून चालणार नाही.
या आंदोलनाच्या काळात सुमारे 700 शेतकऱ्यांनी प्राण गमावले. जनरल डायरची आठवण करून देणारे हे वर्तन आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने यासाठी नुकसान भरपाई दिली पाहिजे. मोदींच्या आणि त्यांच्या परिवाराच्या निर्णयांमुळे आणि कृतींमुळे आजवर देशातील हजारो निष्पाप लोकांनी प्राण गमावले आहेत. या घातक परिवाराला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
Post a Comment