आज 21 व्या शतकात अत्याधुनिक सुखसोयी द्वारे मानव जीवन सज्ज झाले आहेत. आपल्याला हवी-हवीशी वाटणारी काँक्रीटची जंगल, वाहन, मोबाईल क्रांती, टॉवर, रसायनांचा वापर, खनिजांचा अतिवापर, जंक फूड, फैशन, यांत्रिक संसाधने, प्लास्टिकचा वाढता वापर, प्राणघातक कचऱ्यात सातत्याने होणारी वाढ, वाढते प्रदूषण, अन्न भेसळ, भ्रष्टाचार, प्राण्यांची शिकार, जंगलतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, ही सर्व काही धोका निर्माण करून निसर्गाला संपवत आहेतच सोबत आपल्या मानवी आयुष्याला देखील कमकुवत करीत आहेत. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे तो शून्य आहे. आपण कितीही प्रगत असलो तरी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक म्हणजे अन्न, ऑक्सिजन, पाणी, सूर्यप्रकाश हे मानव स्वतः बनवू शकत नाही, ते निसर्ग आपल्याला मोफत देतो. मानव विज्ञानाशिवाय हजारो वर्षापासून जगत आला आहे पण निसर्गाशिवाय एकही क्षण जगू शकत नाही. आजचा आधुनिक काळात स्वार्थी मानव स्वत:चा लोभामुळे निसर्गाचा विनाशावर उठलाय.
एकेकाळी पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून जाग येत असे, पण आता वाहनांच्या ध्वनि प्रदूषणामुळे जाग येते. आवश्यकतेपेक्षा अधिक स्टेटस सिम्बॉलसाठी संसाधनांचा वापर केला जातो. लोकांपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. पूर्वी खूप हिरवळ असायची, आपल्या अंगणात पक्षी स्वच्छंदपणे बागळायचे. सगळीकडे घनदाट वने होती, नंतर तिथे शेती सुरू झाली, नवे गांव व वस्त्या स्थापन झाल्या, वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमीनीवर आता नवीन लेआऊट तयार झालेत, वनक्षेत्र कमी होत-होत काँक्रीटचे जंगल उभी झालीत. वनक्षेत्र कमी होत असल्यास तेथील पक्षी, प्राणी, वनौषधी सुद्धा कमी होवू लागली. वन्यप्राणी व मानव यातील संघर्ष वाढत चालला आहे. मौल्यवान खनिज साठे, दुर्मिळ वन्यजीव आणि औषधीय वनस्पती पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होत आहेत. शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे स्वरूप तर आपल्या सगळ्यांना ठावूकच आहे. निसर्गाचा संगोपनासाठी स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रशासनाने नियम लावले आहेत पण मोठ्याप्रमाणावर नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे.
“भारतीय वन सर्वेक्षण” च्या नोंदीनुसार, 2009 ते 2011 या कालावधीत देशात एकंदर 367 चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी 1.5 ते 2.7 टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसऱ्या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. वर्ष 2000 पासून जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी 65 टक्के मृत्यू आशिया खंडात होत आहेत. वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, ग्लोबल वार्मींग यामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे “इंटरगव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस” च्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील कायदेशीर वन्यजीव व्यापार अहवालानुसार, 2005 पासून आंतरराष्ट्रीय कायदेशीर वन्यजीव व्यापाराचे मूल्य 500 टक्क्यांनी आणि 1980 पासून 2,000 टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे, वन्यजीवांच्या जागतिक अवैध व्यापाराचे अंदाजे मूल्य दरवर्षी सुमारे 7-23 अब्ज डॉलर्स आहे, जे कायदेशीर बाजाराच्या मूल्याच्या जवळजवळ 25 टक्के आहे.
जगात सर्वात घातक प्राणी म्हणजे मानव आहे, आपल्या स्वार्थवृत्ति व लोभापोटी तो कुणाचेही अहित करायला घाबरत नाही. निसर्ग पूर्वीपासूनच मानवाला भरभरून आयुष्य आणि जीवनउपयोगी वस्तु देत आहे, प्रत्येक वस्तूच्या उत्पादनाकरीता लागणारा कच्चा माल देखील निसर्गाद्वारे प्राप्त होतो पण मानव आपल्या अधिकार व अपेक्षेपेक्षाही अधिक निसर्गाला लुटायला लागला आहे. मानव कल्याण व विकासासाठी प्रशासन, शिक्षण, कायदा, आयोग, संस्था, मतदान, पैसा, नाते व अनेक अत्याधुनिक सुखसोयीची साधने आहेत, तरीही मानव कसल्यातरी समस्येने ग्रस्त होवून समाधानासाठी भटकत असतो. शहरात नळाला एक दिवस देखील पाणी नाही आले तर मानवाचा दैनंदिन जीवन विस्कळीत होते. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी मानवच पाण्याचा सोयीसाठी दूर-दूरपर्यंत फेऱ्या मारतो, मग अशा परिस्थितीत वन्यजीवांची काय स्थिती होत असेल? विचार करून बघा की वन्यप्राण्यांना समस्या असल्यास त्यांनी न्यायासाठी जायचे कुठे?
जागतिक बँकेचा अंदाज आहे की 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुमारे 3.9 दशलक्ष चौरस मैल (10 दशलक्ष चौरस किमी) जंगल नष्ट झाले आहे. गेल्या 25 वर्षांत, जंगले 5,02,000 चौरस मैल (1.3 दशलक्ष चौरस किमी) कमी झाली - दक्षिण आफ्रिकेच्या आकारापेक्षा मोठे क्षेत्र. 2018 मध्ये, द गार्डियनने नोंदवले की प्रत्येक सेकंदाला, सॉकर मैदानाच्या आकाराच्या जंगलाचा एक भाग गमावला जातो. विकासाच्या नावावर हिरवळ भागातून झाडे कापून महामार्ग, कंपन्या, फार्महाऊस, हॉटेल्स तयार केली जात आहेत, यामुळे तेथील प्राणी अन्यत्र हलविण्यात येतात. परिणामी, प्राण्यांची हालचाल रोखली जाते, त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या भोवती फिरायला सर्वांनाच आवडते, पण त्याचे संवर्धन करायला कोणालाच वेळ नाही.
दर काही दिवसांनी वर्तमानपत्रातून वन्यप्राण्यांची शिकार, मृत वन्यप्राणी, संबंधित दुर्घटना, व वन्यप्राण्यांद्वारे होणारे हल्ले संबंधी बातमी छापून येतच असतात. “कॉन्सर्वेशन लेन्सेस एंड वाइल्ड लाइफ” च्या अहवालातून असे सूचित होते की 2021 च्या पहिल्या 81 दिवसांमध्ये 39 बंगाल वाघांनी आपला जीव गमावला तर अधिकृत सूत्रांनी 16 वाघांच्या मृत्यूची नोंद केली. कारणे - शारीरिक जखम, भूकेने, शिकार, निवासस्थान कमी होणे किंवा वेगवान वाहनांच्या धडकेने असे परिणाम आहे. या यादीत महाराष्ट्र प्रमुख आहे आणि त्यानंतर मध्यप्रदेश राज्य आहे. 2019 मध्ये, ब्राझीलमध्ये मानवाने पेटवलेल्या आगीची संख्या गगनाला भिडली. ऑगस्ट 2019 पर्यंत, अमेझॉनमध्ये 80,000 पेक्षा जास्त आगी पेटल्या, 2018 च्या तुलनेत जवळपास 80% वाढ झाल्याचे नॅशनल जिओग्राफिकने म्हटले आहे. “जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2020” पॅंगोलिन, पक्षी, कासव, वाघ, अस्वल आणि इतर वन्य प्रजातींच्या तस्करीच्या समस्येकडे लक्ष वेधतो. वन्यजीवांच्या अवैध तस्करीमुळे जगातील अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अन्नसाखळीत एक अनन्य स्थान आहे, जे पर्यावरणात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी स्वतःच्या खास पद्धतीने योगदान देण्यासाठी उपयुक्त ठरतात. परंतु, दुर्दैवाने आज अनेक प्राणी आणि पक्षी धोक्यात आले आहेत. मानवांनी भूमि विकास आणि शेतीसाठी, प्राणी आणि वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास नष्ट केले आहेत. ग्लोबल फॉरेस्ट टार्गेट्स रिपोर्ट -2021 मध्ये जागतिक स्तरावर जैवविविधतेच्या नुकसानीचाही उल्लेख आहे. जगभरातील सुमारे 1.6 अब्ज लोक त्यांच्या उपजीविकेसाठी आणि दैनंदिन उदरनिर्वाहाच्या गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. वनक्षेत्रातील शीर्ष पाच देशांकडे (रशिया, ब्राझील, कॅनडा, यूएसए आणि चीन) जगातील 54 टक्क्यांहून अधिक जंगले आहेत.
आपण वापरत असलेल्या औषधांपैकी 25 टक्क्यांहून अधिक औषधे रेनफॉरेस्ट वनस्पतींद्वारे तयार होतात. तरीही केवळ 1 टक्के रेनफोरेस्ट वनस्पतींचा औषधी गुणधर्मांसाठी अभ्यास केला गेला आहे. जमिनीवर सरासरी 40 टक्के पाऊस हा वनस्पतींमधून बाष्पीभवनाने उद्भवतो. 2018 च्या एफएओ च्या अहवालानुसार, पृथ्वीच्या गोड्या पाण्यातील तीन चतुर्थांश पाणी जंगलातील पाणलोटातून येते आणि झाडांचे नुकसान पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतो. संयुक्त राष्ट्रांच्या 2018 च्या “स्टेट ऑफ द वर्ल्ड फॉरेस्ट्सच्या” अहवालात असे आढळून आले आहे की, अर्ध्याहून अधिक जागतिक लोकसंख्या त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेती आणि उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याकरीता जंगलातील पाणलोटांवर अवलंबून आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रवासी पक्षी व इतर वन्यप्राणी जगभरात फिरतात पण कधीही मार्ग विसरत नाहीत. पक्षी, सुंदर नक्षीकाम केल्याप्रमाणे घरटी तयार करतात, प्रत्येक ऋतु चा अचूक अंदाज बांधतात. पक्षी, प्राण्यांना प्रशिक्षण दिले तर ते मानवापेक्षाही जास्त निष्ठावंत असतात. जास्त तर वन्यप्राणी समूह बनवून राहतात आणि समूह प्रमुखाचा आज्ञेप्रमाणे वागतात आणि निसर्गाचे संगोपन करतात. वन्यजीव व पक्ष्यांद्वारे केलेली घाण सुद्धा निसर्गाकरीता वरदान सिद्ध होते. वन्यजीव आपसात संवाद साधतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात, त्यांच्यातही कुटुंबाकरीता खूप आपुलकी असते जे मानवात कमी होत चालली आहे. खरं बघीतले तर वन्यप्राणी आणि पक्षीमुळेच जंगल, निसर्ग समृद्ध होतात आणि मानवी जीवनाला चालना मिळते. जिथे निसर्ग समृद्ध असतो तिथे शुद्ध पाण्याचे व शुद्ध प्राणवायूचे स्त्रोत समृद्ध असतात, जीवजंतू, वनौषधी, वने समृद्ध असतात. मातीची सुपीकता टिकून राहते, गुणवत्तापुर्ण पीक तयार होते, अश्या ठिकाणी रोगराई कमी आणि मानवाचे आयुष्मान मोठे असते. आनंददायी वातावरण व पौष्टिक अन्न मिळते, ग्लोबल वार्मिंगची समस्या कमी होवून ओझोन थराचे संरक्षण वाढते. हवामानाचे चक्र सुरळीत चालते. मानव निसर्गाला न संपविता स्वतःचा अस्तित्वाला संपवत आहे, हे वास्तववादी सत्य समजणे खूप गरजेचे आहे. निसर्ग वाचेल, पृथ्वी टिकेल तर मानव जगेल.
- डॉ. प्रितम भी. गेडाम
भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041
(जागतिक पर्यावरण संरक्षण दिवस - २६ नोव्हेंबर)
Post a Comment