(१००) कोणताही जीव अल्लाहच्या आज्ञेविना श्रद्धा ठेवू शकत नाही,१०३ आणि अल्लाहचा प्रघात असा आहे की जे लोक बुद्धीचा उपयोग करीत नाहीत, तो त्यांच्यावर (मार्गभ्रष्टतेची) घाण टाकून देतो.१०४
(१०१) यांना सांगा, ‘‘पृथ्वी आणि आकाशांत जे काही आहे ते डोळे उघडून पाहा.’’ आणि जे लोक श्रद्धा ठेवूच इच्छित नाहीत त्यांच्याकरिता संकेत आणि सूचना काय लाभदायक होऊ शकतात?१०५
(१०२) आता हे लोक याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की तेच वाईट दिवस पाहावेत जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी पाहिले आहेत? यांना सांगा, ‘‘बरे तर प्रतीक्षा करा, मीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो.’’
(१०३) मग (जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा) आम्ही आपल्या पैगंबरांना व त्या लोकांना वाचवितो ज्यांनी श्रद्धा ठेवली असेल, आमचा असाच प्रघात आहे. आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही श्रद्धावंतांना वाचवावे.
(१०४) हे पैगंबर (स.)! सांगून टाका,१०६ ‘‘लोकहो, जर अद्यापही माझ्या धर्मासंबंधी तुम्ही एखाद्या शंकेत असाल तर ऐकून घ्या की तुम्ही अल्लाहशिवाय ज्यांची बंदगी (भक्ती) करता मी त्यांची बंदगी (भक्ती) करीत नाही तर केवळ त्याच अल्लाहची बंदगी करतो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे.१०७ मला आज्ञा दिली गेली आहे की मी श्रद्धावंतांपैकी व्हावे.
(१०५) आणि मला फर्माविले गेले आहे की एकाग्र बनून आपल्या स्वत:ला ठीक ठीक या धर्मावर कायम करावे१०८
१०३) म्हणजे जगातील इतर मोबदले प्राप्त् करण्यासारखेच ईमानचा मोबदला (देणगी) प्राप्त् करणे अल्लाहच्या आदेशांवर अवलंबून आहे. कोणी अल्लाहच्या आदेशाशिवाय यास स्वत: प्राप्त् करू शकत नाही, किंवा इतर कुणाला तो देऊ शकत नाही. परंतु पैगंबरांनी ठरविले की, लोकांना ईमानधारक बनवावे तर ते बनवू शकत नाहीत. यासाठी अल्लाहचा आदेश आणि सौभाग्य प्राप्त् करणे अपेक्षित आहे.
१०४) येथे स्पष्ट दाखविले आहे की अल्लाहचे आदेश आणि त्याचे सौभाग्य काही खिरापत नाही की विवेकाविना आणि उचित नियमांविना ज्याला वाटेल त्याला ईमानधारक बनवून टाकले आणि ज्याला वाटले त्याला त्यापासून वंचित ठेवले. परंतु याचे एक विवेकपूर्ण नियम आहे. तो नियम म्हणजे जो मनुष्य वास्तविकतेच्या शोधात आपल्या बुध्दीचा योग्य वापर करतो. त्याच्यासाठी वास्तविकतेपर्यंत पोहचण्याचे साधन त्याच्या प्रयत्नानुरूप उपलब्ध केले जाते आणि अशाच माणसाला सत्यज्ञान व ईमान धारण करण्याचे सौभाग्य प्रदान केले जाते. ते लोक जे सत्याची चाड ठेवत नाहीत आणि जे आपल्या बुद्धीला दुराग्रहाच्या फंद्यात फसवून ठेवतात किंवा सत्यशोध कार्यात बुद्धीचा उपयोग करतच नाही, अशा लोकांच्या भाग्यात अज्ञानता, पथभ्रष्टता तसेच चुकीचे पाहाणे आणि चुकीचे करत राहाण्याशिवाय काहीच नसते. असे लोक स्वत:ला त्याच घाणीत पडून राहण्यास पात्र बनवितात. त्यांच्या भाग्यात हेच लिहिलेले असते.
१०५) हे त्यांच्या मागणीचे अंतिम आणि अटळ उत्तर आहे. ते ईमान धारण करण्याच्या अटीच्या रूपात प्रस्तुत करत होते. त्यांची मागणी होती की त्यांना असा चमत्कार दाखवा ज्यामुळे तुम्ही खरे पैगंबर आहात याची खात्री पटेल. याच्या उत्तरादाखल सांगितले जात आहे की जर तुमच्यात सत्याची चाड असेल आणि सत्य स्वीकारण्याची ओढ असेल तर पृथ्वी आणि आकाशांत अनेकानेक निशाण्या आहेत. या निशाण्या तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांचा स्वीकार करण्यासाठी समाधानकारक आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून त्यांना पाहण्याची गरज आहे. जर ही ओढ तुमच्यात नाही तर कोणताच चमत्कार व निशाणी तुम्हाला ईमानधारक बनवू शकत नाही. प्रत्येक चमत्काराला तुम्ही फिरऔन आणि त्याच्या सरदारांसारखे म्हणू लागाल की ही तर जादू आहे. या रोगाने जे रोगग्रस्त होतात, त्यांचे डोळे तेव्हाच उघडतात जेव्हा अल्लाहचा प्रकोप आपल्या महाभयानक पकडीने त्यांच्यावर कोसळतो. फिरऔनचे डोळे पाण्यात बुडतानाच उघडले होते. परंतु शेवटच्या क्षणी पश्चात्ताप व्यक्त करणे निरर्थक आहे.
१०६) ज्या विषयाने भाषणाची सुरवात केली होती त्यावरच भाषणाला समाप्त् केले जात आहे. तुलनेसाठी सुरवातीच्या आयतींमध्ये वर्णन केलेल्या विषयावर पुन्हा दृष्टी टाकून पाहावे.
१०७) अरबीत `यतवफ्फाकुम' शब्द आहे. ज्याचा शाब्दिक अर्थ जो तुम्हाला मृत्यू देतो असा आहे. परंतु या शाब्दिक अनुवादाने मूळ भाव स्पष्ट होत नाही. या कथनाचा मूळ भाव आहे, ``तो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे तो तुमच्यावर पूर्ण सत्ता राखून आहे. त्याच्याच मर्जीवर तुमचे जीवन पुर्णत: आश्रित आहे आणि तुमचा मृत्यूसुद्धा. मी फक्त अल्लाहची उपासना आणि भक्ती, आणि आज्ञाधारकता आणि गुलामीस मान्य करतो.'' येथे हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की मक्का येथील अनेकेश्वरवादीसुद्धा या वास्तवतेला मानत होते. त्यांचा विश्वास होता की मृत्यू केवळ सर्व जगताच्या पालनकर्त्याच्या हातात आहे. म्हणून ``जो तुम्हाला मृत्यू देतो'' हे त्याच्या अगणित गुणांपैकी एक प्रमुख गुण आहे. येथे आपले मत व्यक्त करताना ते सत्य असण्याचा तर्क दिला आहे. अलंकारिक भाषेचे सौंदर्य पाहा! `जो मला मृत्यू देणारा आहे.' म्हणण्याऐवजी `जो तुम्हाला मृत्यू देतो' असे म्हटले आहे. (म्हणजे मलाच नव्हे तर तुम्हालासुद्धा त्याचीच भक्ती केली पाहिजे. तुम्ही ही घोडचुक करीत आहात की अल्लाहशिवाय इतर अनेकानेकांची भक्ती करीत आहात) अशाप्रकारे एकाच शब्दात अभिप्राय देणे, त्याचे प्रमाण देणे आणि आवाहन करणे, हे तिन्ही भाव एकत्रित आले आहेत.
१०८) या मागणीच्या तीव्रतेकडे लक्ष देणे योग्य आहे. अरबीत `अक़िम वजहक लिद्दीनी हनीफा' हे मूळ शब्द आले आहेत. `अकिम वजहक' चा शाब्दिक अर्थ होतो `आपले मुख निश्चित कर' म्हणजे तुमचे मुख एकच आणि स्थिर असावे. अस्थिर आणि डगमग करणारे नसावे. कधी मागे तर कधी पुढे आणि कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वळलेले नसावे. नाकासमोर सरळ चालावे हे बंधन अगदी योग्य होते परंतु यावर थांबले गेले नाही. यावर आणखी एक अट घातली गेली होती ती म्हणजे `हनीफा' आहे. `हनीफ' म्हणजे सर्व बाजूने वळून फक्त एकाच बाजूचे होऊन जावे. निकड ही आहे की या जीवनव्यवस्थेला, अल्लाहच्या भक्तीला, जीवन व्यवहाराला, उपासना, भक्ती, गुलामी, आज्ञापालन इ. सर्व फक्त आणि फक्त सृष्टी निर्माणकर्ता अल्लाहसाठीच आहे, अशाप्रकारची एकाग्रता स्वीकारून दुसऱ्या एखाद्या जीवनव्यवस्थेकडे कणभरसुद्धा झुकू नये.
Post a Comment