हजरत अनस बिन मलिक म्हणतात की मी प्रेषितांना असे सांगताना ऐकले आहे,
‘‘अल्लाह म्हणतो, हे आदमच्या संतती, जोवर तुम्ही मला हाक देत राहाल आणि माझ्याकडून तुम्ही अपेक्षा करत राहाल तोपर्यंत मी तुम्हाला क्षमा करत राहीन. मुळीच पर्वा करणार नाही. हे आदमची संतती! तुम्ही केलेले पाप जर आकाशापर्यंतही जाऊन भिडले आणि धरतीभर जरी पापं केली आणि तुम्ही माझ्याकडे क्षमायाचना केली तर मी तुम्हाला माफ करून टाकीन. पण तुम्ही माझी क्षमा मागताना कुणालाही आणि कशालाही माझे भागीदार बनवू नका.’’ (तिर्मिजी)
पण अल्लाहची क्षमा मागण्यासाठी प्रार्थना (दुआ) करणे गरजेचे आहे. अल्लाह म्हणतो,
‘‘तुम्ही मला हाक द्या, मी तुमचा विधाता आहे. मी तुमची प्रार्थना मान्य करतो.’’ (पवित्र कुरआन, अलमोमिन-६०)
दुआ करताना याचे भान ठेवायला हवे की अल्लाह निश्चितच तुमचे ऐकणार आहे.
दुआ करताना असा दृढविश्ऱास असायला हवा की अल्लाह खरोखरच आपण मागतो ते देणारा आहे. उदास मनाने अल्लाहपाशी काही मागू नये. ‘तुझी इच्छा असेल तर मला क्षमा कर’ असे न म्हणता संपूर्ण विश्वासाने माफी मागायला हवी.
एखादा भक्त जेव्हा अल्लाहकडे काही मागतो तेव्हा, अल्लाह आपले दूत जब्रईल यांना म्हणतो,
‘‘त्याचे मागणे इतक्यात पूर्ण करू नका. मला त्यास ऐकायचे आहे.’’
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘एका व्यक्तीने गुन्हा केला आणि त्यासाठी अल्लाहची क्षमा मागितली, तेव्हा अल्लाह म्हणतो की, ‘‘माझ्या भक्ताला हे माहीत आहे की च्याचा एक विधाता आहे आणि तो क्षमा करू शकतो. म्हणून मी त्यास माफ करून टाकले.’’ परत काही दिवसांनी त्याने क्षमा मागितली, अल्लाहने त्यास पुन्हा माफ केले. म्हणजे जोपर्यंत कुणी आपल्या गुन्ह्यासाठी क्षमा मागत राहील तोपर्यंत अल्लाह त्याला निरंतर क्षमा करत राहील.’’
गुन्हा घडल्यावर त्याचा पश्चात्ताप करणारा असा आहे जणू त्याने काही गुन्हा केलेलाच नाही. पण कुणी जर आपल्या पापांवर अडून पसत असेल तर त्याने जणू आपल्या विधात्याची चेष्टा केली. प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी अशी प्रार्थना करीत असत,
‘‘हे अल्लाह, तूच माझा पालनहार आहे. तुझ्या व्यतिरिक्त कुणीच उपासनेस पात्र नाही. मी तुझा बंदा आहे. माझ्या क्षमतेनुसार मी या वचनावर कायम राहीन. मी जे काही केले असेल त्यात वाईट असेल तर त्यासाठी माफी मागतो. तू मला ज्या देणग्या दिल्यास त्या मी मान्य करतो. तूच मला क्षमा कर. दुसरा कुणी क्षमा करणारा नाही.’’
माननीय अबू उमामा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
''ज्याने अल्लाहसाठी मित्रत्व आणि अल्लाहसाठी शत्रुत्व केले आणि अल्लाहसाठी दिले आणि अल्लाहसाठी रोखून ठेवले त्याने आपले ईमान परिपूर्ण केले.'' (बुखारी)
मनुष्य स्वत:चा सुधार करता करता या स्थितीतला पोहोचतो की तो ज्या कोणाशी जुळतो आणि ज्या कोणाशी अलिप्त होतो, अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी त्यास जुळतो आणि त्याच्यापासून अलिप्त होतो जीवनधर्मासाठी. कोणाशी प्रेम करतो आणि कोणाशी द्वेष; त्याचे प्रेम आणि द्वेष आपल्या एखाद्या वैयक्तिक गरज आणि भौतिक लाभासाठी नसतो तर फक्त अल्लाह आणि त्याच्या जीवनधर्मासाठी असतो. जेव्हा मनुष्य या स्थितीला पोहोचतो तेव्हा समजा त्याचे ईमान परिपूर्ण झाले.
Post a Comment