’’धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत (सैतान) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन : सुरे अलबकरा आयत नं. :256).
मुळात इस्लाम हिंसक आहे व सर्वांना हिंसेद्वारे मुसलमान बनवू इच्छितो हा जो दावा अग्रलेखामध्ये केलेला आहे तो चुकीचा आणि जाणूनबुजून केलेला आहे, असे वाटते. जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि पावणे दोन अब्ज लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आधुनिक इस्लाम धर्माबाबत असे एकांगी विचार आपल्या अग्रलेखामध्ये मांडून लेखकांने इस्लामची नव्हे तर दैनिक लोकसत्ताच्या वैचारिक निष्पक्षपातीपणाच्या परंपरेचीच हानी केली आहे. अग्रलेख लिहिणाऱ्या लेखकाच्या इस्लाम विषयीच्या ज्ञानाची कीव करण्यासारखी परिस्थिती आहे.
15 नोव्हेंबर 2021 रोजी दैनिक लोकसत्ताच्या ’धर्म, विचार, विकास’ या शिर्षकाखाली प्रकाशित अग्रलेखामध्ये सलमान खुर्शिद यांच्या नव्याने बाजारात आलेल्या पुस्तकावर विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत. या पुस्तकाचे नाव ’सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहुड इन आवर टाईम्स’’ असे आहे. यावर टिका करतांना अग्रलेखामध्ये विनाकारण इस्लामविषयी चुकीची विधाने, ती ही आक्रमक आणि इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावतील अशा शैलीत केलेली आहेत. म्हणून त्याची दखल घेणे गरजेचे आहे. कारण लोकसत्ता हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य दैनिक असून, मराठी भाषिक जनतेची वैचारिक बांधणी करण्यामध्ये या दैनिकाच्या अग्रलेखांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. इस्लामबद्दल या दैनिकाच्या अग्रलेखामध्ये नोंदविलेले मत हे खरेच असणार अशी वाचकांची धारणा होणार आहे परंतु दुर्दैवाने इस्लाम संबंधीची चुकीची माहिती या अग्रलेखामध्ये दिली गेलेली आहे. हे सत्य वाचकांच्या लक्षात आणून देणे यासाठी गरजेचे आहे की असे न केल्यास चुकीची माहिती खरी समजून तशीच पुढे रेटली जाईल, यात शंका नाही. शिवाय ही माहिती चुकीची होती तर कोणी ती चुक असल्याचे का निदर्शनास आणून दिले नाही? असा वाजवी प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. म्हणून हा लेखन प्रपंच.
चुकीची माहिती मुद्दा क्रमांक 1 ’’मक्का-मदिनेत सातव्या शतकात प्रेषित मुहम्मदाकडून इस्लामची स्थापना झाली’’
- या ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे एवढेच नव्हे तर माहितीही चुकीची दिलेली आहे. इस्लामची स्थापना ही मुहम्मद सल्ल. यांनी केलेली नाही. तिन्ही इब्राहिमी धर्मग्रंथा (तौरात, बायबल आणि कुरआन) मध्ये असे नमूद आहे की, अॅडम/आदम अलै. आणि ईव्ह/हव्वा अलै. यांची रचना जेव्हा ईश्वराने पूर्ण केली व त्यांना पृथ्वीवर पाठविण्यात आले. ते जोडपे पृथ्वीवरले पहिले मुस्लिम जोडपे होते व हजरत आदम अलै. हे पहिले प्रेषित होते. या ठिकाणी ’मुस्लिम’ म्हणजे ’ईश्वराचे आज्ञाधारक’ या अर्थाने मुस्लिम हा शब्द वापरला आहे. कारण इस्लामचा अर्थच मुळी ईश्वरासमोर संपूर्ण समर्पण असा आहे. त्यांच्यानंतर त्यांची संतती वाढत गेली, पृथ्वीवर विखुरली गेली, त्यांचे कबिल्यात व कालांतराने राष्ट्रांत रूपांतरे झाली. ज्याची पुष्टी कुरआनने खालील शब्दात केलेली आहे.
’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे.’’ (सुरे अलहुजरात : आयत नं.13)
जेव्हा पृथ्वीवर पहिले जोडपे अवतरित झाले तेव्हा ते अतिशय पवित्र आणि ईश्वरीय आज्ञांचे पालन करणारे होते. मात्र त्यांची संतती जशी-जशी वाढत गेली त्यांच्यात ते पावित्र्य शिल्लक राहिले नाही आणि त्यांनी ईश्वरीय आज्ञांचे उल्लंघन करण्यास सुरूवात केली. तेव्हा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या या आदमच्या पुत्रांमधून 1 लाख 24 हजार प्रेषित हे वेळोवेळी निवडले गेले, ज्यांनी आदमच्या पुत्रांना पुन्हा आज्ञाधारक बनविण्याचा प्रयत्न केला. प्रेषित मुहम्मद सल्ल. याच वारंवारितेचे शेवटचे प्रेषित होत, ज्यांनी सातव्या शतकामध्ये मक्का शहरामधील मूर्तीपूजकांना एकेश्वरवादाच्या विसरलेल्या शिकवणीची पुन्हा आठवण करून दिली. पथभ्रष्ट झालेल्या लोकांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी इस्लामची स्थापना केली नाही तर जो एकेश्वरीय इस्लाम हजरत आदम अलै., मुसा अलै., ईसा अलै. आणि इब्राहीम अलै. यांच्यापासून चालत आलेला होता व कालौघात मागे पडला होता त्याची पुनर्स्थापना मक्का शहरात करण्याचा प्रयत्न केला, परंतु 13 वर्षे प्रयत्न करूनही मक्कावासियांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही उलट मदिनावासियांनी त्यांना प्रतिसाद दिला म्हणून त्यांनी मदिना येथे स्थलांतर करून पहिल्या इस्लामी राज्याची स्थापना केली धर्माची नव्हे. राज्य जरी नव्याने स्थापन केले गेले तरी धर्म तोच होता जो आदम अलैसलामपासून चालत आलेला होता. म्हणून अग्रलेखामध्ये जी माहिती दिली आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी इस्लामची स्थापना सातव्या शतकात केली ती चुकीची आहे. अग्रलेखात अज्ञानातून ती दिली गेली की जाणूनबुजून हे ठरविणे कठीण असले तरी ही जाणूनबुजून दिली असेल तर अशा लोकांविषयी कुरआन स्वतः खालीलप्रमाणे भाष्य करतेे.
’’तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (स.) यांना मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्यांना समस्त धर्मांवर प्रभुत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटेना.’’ (कुरआनःसुरह अस्सफ : आयत नं. 9)
चुकीची माहिती मुद्दा क्रमांक : 2 :
’’समस्तांस इस्लामी करणे हेच ध्येय असल्याने अंधइस्लामींनी मिळेल त्या मार्गानी धर्म प्रसाराचा प्रयत्न केला आणि त्यातून तो कमालीचा हिंसक बनला. संपूर्ण मानवजातीचे केवळ इस्लामीकरण केल्याने सर्व प्रश्न सुटतील असा विचार शुन्यतेतून या धर्मात एकाहून एक अतिरेकी संघटना निपजल्या. मुळातील उद्देशच इतके क्षुद्र असल्याने या संघटना चालविणारी माणसे त्याहून क्षुद्र निघाली आणि अमानुश अत्याचार करती झाली. ’आयसीस’ हे त्याचे ताजे उदाहरण. या सर्वास इस्लामी करून पुढेे करायचे काय याचा कोणताही विचार करण्याइतकी अक्कल त्यांच्याजवळ नव्हती आणि नाहीही. केवळ धर्माने प्रश्न सुटत असते तर आज इस्लामी जगात जन्नत नांदती. प्रत्यक्षात तेथे काय परिस्थिती आहे हे सांगण्याची गरज नाही.’’
- पहा ! वरील परिच्छेदामध्ये कुठल्या प्रकारची भाषा वापरलेली आहे. एवढेच नव्हे तर ’’समस्तास इस्लामी करणे’’ हेच इस्लामचे ध्येय आहे, असे अग्रलेखात अत्यंत आक्षेपार्ह आणि धादांत खोटे विधान केलेले आहे. या विधानाला कुठलाही आधार नाही. उलट कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की,
’’धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत (सैतान) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन : सुरे अलबकरा आयत नं. :256).
या आयातीवरून स्पष्ट आहे की इस्लाममध्ये धर्माच्या बाबतीत कोणावरही जबरदस्ती करण्याची मुदलातच परवानगी नाही. असे असतानाही इस्लाम हा तलवारीच्या बळावर जगभर पसरला असा समज मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. अग्रलेखामध्येही त्याच विचारांचे प्रतीबिंब पडलेले आहे. इस्लाम जर तलवारीच्या बळावर पसरला असेल तर आज तर लोकांकडे एके-47 आहेत. त्याचा उपयोग करून का कुठल्याही धर्माला पसरविले जात नाही? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नसणार हे उघड आहे. याउलट इस्लाममध्ये ’जिम्मी’ची संकल्पना अस्तित्वात आहे. इस्लामी राष्ट्रामध्ये जे अल्पसंख्यांक राहतात त्यांना जिम्मी (मुस्लिमांच्या जबाबदारीत असणारा जनसमूह) म्हणतात व त्यांच्या जीवाची, संपत्तीची आणि धर्मरक्षेची हमी मुस्लिम शासकांवर असते. म्हणूनच आज लाखो मुस्लिमेत्तर लोक खाडीच्या देशांमध्ये अतिशय सुरक्षित अशा वातावरणात राहतात, काम करतात, कोट्यावधी डॉलर आपापल्या देशात पाठवितात. विशेष म्हणजे त्यांच्यापैकी एकाचीही आजपर्यंत स्थानिक लोकांच्या झुंडीने त्यांच्या धर्माच्या कारणावरून हत्या केेल्याचे निदर्शनास आलेले नाही. यावरून इस्लाम हा समस्तांसाठी बळजबरी करतो, हे अग्रलेखातील विधान चुकीचेच नव्हे तर खोडासाळपणाचे आहे.
अग्रलेखामध्ये आयसीस या संघटनेचे उदाहरण अशा पद्धतीने दिलेले आहे की, जणू ती मुस्लिमांची प्रातिनिधीक संघटना आहे. आयसीस असो का अलकायदा अशा संघटना ह्या खाडीच्या देशांमध्ये का निर्माण झाल्या? नव्हे इजराईल आणि अमेरिकेने त्यांना का निर्माण केले? याचा उहापोह स्वतः लोकसत्तानेच आपल्या मागच्या अनेक अग्रलेखामध्ये केलेला आहे. आयसीसचा उल्लेख असा केलेला आहे जणू त्याला इस्लामी राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे. हे मत प्रदर्शन करताना किमान भारतीय मुस्लिमांचा तरी विचार केला गेला असता तर बरे झाले असते. भारताच्याच नव्हे तर जगातील सर्वात प्रतिष्ठित अशा देवबंद इस्लामी विद्यापीठाने कुठल्याही प्रकारच्या आतंकवादाला हराम ठरविल्याचा फतवा दिलेला आहे आणि तो आजही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संघटना जर मुस्लिमांच्या अधिकृत संघटना असत्या तर त्यांनी सर्वाधिक हत्या मुस्लिमांच्याच केल्या नसत्या. खाडीमध्ये असलेल्या अमाप तेलाच्या साठ्यांवर वर्चस्व मिळविण्याच्या उद्देशाने या संघटनांना इजराईलच्या साह्याने स्वतः अमेरिकेनेच जन्माला घातलेल्या आहेत. त्यांना पोसलेले आहे. त्यांना वित्तपुरवठा केलेला आहे व अत्याधुनिक हत्यारेही पुरविलेली आहेत. या सत्याकडे अग्रलेखांमध्ये सपशेल दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. अग्रलेखातील असे म्हणणे की, ’’केवळ धर्माने प्रश्न सुटते असते तर आज इस्लामी जगात जन्नत नांदती. प्रत्यक्षात तेथे काय परिस्थिती हे सांगण्याची गरज नाही.’’ याबाबतीत सुद्धा लेखामध्ये गफलत झालेली आहे. जगात असलेल्या 56 मुस्लिम देशांपैकी बोटावर मोजता येतील एवढ्या देशातच अशा हिंसक संघटनांचे अस्तित्व आहे. बाकीच्या देशात जीवन सामान्य आहे, याकडे अग्रेलखात दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
इस्लामी जीवन पद्धती हीच जगण्याची सर्वश्रेष्ठ पद्धती आहे व मुस्लिम हे जगात इस्लामच्या कल्याणकारी व्यवस्थेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, असा दावा करण्यास मला कुठलाही संकोच नाही. मुस्लिमांविषयी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,
’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’ (सुरे आलेइमरान : आयत नं.110)
मुळात झाले काय की, 1991 साली सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक ध्रुवीय भांडवलशाही लोकशाहीची पाळेमुळे प्रत्येक राष्ट्रात घट्टपणे रोवली गेलेली आहेत. व्याजाधारित अर्थव्यवस्था या लोकशाहीचा पाठीचा कणा आहे. यालाच इस्लामचा सक्त विरोध आहे. भांडवलशाही अर्थ आणि राज्य व्यवस्थेमध्ये मानवाचे कल्याण होतच नाही उलट शोषण मात्र होते. काही लोकांच्या हातात त्यांच्या गरजेपेक्षा अनेक पटीने अधिक संपत्ती गोळा होते तर बाकीच्या लोकांच्या हातात त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी कमी संपत्ती उरते. यातून विषमतेला खतपाणी मिळते आणि गुन्हेगारी वाढते. वैफल्यग्रस्त होऊन लोक आत्महत्या करतात. इस्लाम ही एकच अशी व्यवस्था आहे जीचे आव्हान आजही या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला मिळत आहे. अर्थव्यवस्थेला व्याजमुक्त केल्याशिवाय मानवकल्याण शक्य नाही, असा इस्लामचा दावा आहे. हा दावा प्रत्यक्षात एखाद्या देशात उतरला आणि चंगळवादी भांडवलशाही व्यवस्थेला पर्याय उभा राहिला तर कॉपी पेस्टच्या आजच्या काळात तो पर्याय सोव्हियत युनियनला संपुष्टात आणण्याएवढा सोपा कदापि नसेल, या भीतीपोटी अमेरिकेच्या नेतृत्वात इस्लाम हा हिंसेला प्रोत्साहन देतो, महिला विरोधी आहे, संकीर्ण आहे वगैरे वगैरे अशी चुकीची माहिती रात्रंदिवस लोकांच्या गळी उतरविली जाते. त्यासाठी मीडिया रात्रंदिवस राबतो. खरी अडचण ही आहे.
जगातील 56 मुस्लिम राष्ट्रांपैकी केवळ खाडी राष्ट्रांमध्येच आयसीस आणि अलकायदाचा जन्म का झाला? याचा विचार सुज्ञ वाचकांनी स्वतः करावा. राहता राहिला प्रश्न मुस्लिम राष्ट्रातील आपसातील कलहाचा तो वेगळा विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा करता येईल. मुळात इस्लाम हिंसक आहे व सर्वांना हिंसेद्वारे मुसलमान बनवू इच्छितो हा जो दावा अग्रलेखामध्ये केलेला आहे तो चुकीचा आणि जाणूनबुजून केलेला आहे, असे वाटते. जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि पावणे दोन अब्ज लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आधुनिक इस्लाम धर्माबाबत असे एकांगी विचार आपल्या अग्रलेखामध्ये मांडून लेखकांने इस्लामची नव्हे तर दैनिक लोकसत्ताच्या वैचारिक निष्पक्षपातीपणाच्या परंपरेचीच हानी केली आहे. अग्रलेख लिहिणाऱ्या लेखकाच्या इस्लाम विषयीच्या ज्ञानाची कीव करण्यासारखी परिस्थिती आहे. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’हे अल्लाह हा अग्रलेख लिहिणाऱ्या आणि असेच विचार असणाऱ्या लोकांना क्षमा कर त्यांना माहित नाही के ते किती मोठी चूक करीत आहेत. त्यांना सद्बुद्धी आणि धाडस दे की ते प्रामाणिकपणे विचार करू शकतील. तसेच आम्हा मुस्लिमांना शक्ती दे की आम्ही इस्लामची शिकवण आपल्या देशबांधवांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवू शकू.’’ आमीन.
- एम. आय. शेख
Post a Comment