Halloween Costume ideas 2015

पेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा

औरंगाबाद (शोधन सेवा) 
लोकांना जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म आहे. सर्व माणसे एकाच आई-बापाची लेकरे आहेत. त्यामुळे समाजासमाजात वाद पेटवू नका. पेटवायची फारच हौस असेल, तर गरिबांच्या चुली पेटवा, असा रोखठोक संदेश ’जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी दिला. देशात बंधुभाव, शांतता, न्याय, नीती प्रस्थापित होओ, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 
‘सकाळ’ आणि ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ यांच्या वतीने शनिवारी (ता. 14) ईद मिलन कार्यक्रम झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, ठसकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, काझी मकदूम मोहियोद्दीन, वाजेद कादरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा ऑडिओ संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला. 
‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे मराठी प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांचे मुख्य व्याख्यान झाले. ते म्हणाले, की आज समाजात अनेक दुखणी आहेत. मुले आई-बापाला विचारत नाहीत. सर्वत्र भ्रष्टाचार आहे. गरिबांची काळजी कुणाला नाही. बेईमान लोकांचा सुळसुळाट झाला आहे. असे एखादे अँटिकरप्शन व्हॅक्सीन निघावे, की ज्याची लस लहानपणीच टोचली, तर तो आयुष्यात कधी भ्रष्टाचार करणार नाही; परंतु असे इंजेक्शन अस्तित्वात येणे शक्य नसले, तरी असे ईद मिलनसारखे कार्यक्रम समाजाला चांगला संदेश देऊन लसीकरणाचेच काम करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शहरातील अस्वस्थ वातावरणात समाजासमाजांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी ’सकाळ’ दरवर्षी असे उपक्रम राबवीत असल्याचे सांगत संजय वरकड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण यांनी केले. यावेळी यावेळी माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, उपमहापौर विजय औताडे, निवृत्ती महाराज घोडके गांधेलीकर, माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक राजू शिंदे, भाऊसाहेब जगताप, शेख सोहेल, सरदार मानधारी, गांधेलीचे सरपंच राहुल सावंत, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, आदींसह सर्वधर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
अण्णा हजारे यांचा ध्वनिसंदेश 
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला संदेश ऑडिओ क्लिपद्वारे पाठविला. तो ध्नविक्षेपकातून उपस्थितांना ऐकविण्यात आला. ते म्हणाले, “आपला देश हा रंग, रूप, वेश, भाषा आणि धर्मांचे वैविध्य बाळगून आहे; मात्र, सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता हेच तत्त्व आहे. आपण शेजार्यांच्या सुख दुःखात सहभागी होत नाही, तोवर धर्माची तत्त्वे कितीही उदात्त असली तरी गौण ठरतात. त्यामुळे सर्वांशी सौहार्दाने वागावे.” ---------------
“वैचारिक भूमिकेने मन पक्के होते. धर्म, संस्कार आणि संतांच्या सान्निध्यात भूमिका तयार होते. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमधून आपण परस्परांशी सौहार्दाने वागण्याचे संस्कार करून घेत असतो. मन घडविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. ’सकाळ’ अशा कार्यक्रमांद्वारे नागरिकांचे मन घडविण्याचे काम करतो.
       - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष 
---------------
“मुंबईत मोठा इज्तेमा झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली होती. आम्हाला सर्व धर्माच्या माणसांना समान वागणूक देण्याची शिकवण त्यांनी दिली. ’सकाळ’ लेखणीच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याचेच काम करतो.” 
- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद. 
---------------
“फारच प्रभावी कार्यक्रम झाला. मुख्य वक्त्यांनी संत तुकाराम, संत कबीर आणि इस्लामच्या शिकवणीतील साधर्म्य उलगडून सांगितले. माणसाला माणसाशी जोडणारे असे कार्यक्रम होत राहणे समाजाच्या आरोग्यासाठी हितकारक असते.” - चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद. 
---------------
“ईद मिलन कार्यक्रम स्तुत्य आहे. सध्या आपल्या परिसरासह देशभरात अराजकता निर्माण झाली आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील तेढ कमी होईल. माणसातले माणूसपण जागे करून सर्वांना सद्बुद्धी मिळावी, असा संदेश आजच्या कार्यक्रमातून मिळाला.” - कल्याण काळे, माजी आमदार. 
---------------
“संत तुकाराम महाराजांसह सर्वच संतांच्या साहित्याचे अध्ययन करा. पैगंबरांनी न्यायाचा संदेश दिला आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हे शेवटचे पैगंबर आहेत. कुराण फक्त मुसलमानांसाठी नाही. त्यामुळे कुरआनचा अभ्यास करा. अठरापगड जातींच्या शेकडो लोकांना जोडण्याचे काम ’सकाळ’ने केले आहे.“ - डॉ. सय्यद रफिक, पारनेर. 
---------------
“प्रत्येक धर्माची शिकवण मानव कल्याणाचीच आहे. संत तुकाराम महाराजांनी अल्लाहला उद्देशून अभंग लिहिले आहेत. हा विश्वास त्यांनी चारशे वर्षांपूर्वी दाखविला असेल, तर आपण एकमेकांना विश्वासाने का वागवू शकत नाही? एकमेकांची भाषा, आचारविचार समजून घेतले पाहिजेत.”- भास्करराव पेरे, उपसरपंच, आदर्श गाव पाटोदा. 
---------------
“अशा कार्यक्रमांमुळे समाजासमाजांतील गैरसमज दूर होऊन सद्भाव निर्माण होतो. सर्वांची प्रगती होऊन शांतता नांदावी, याच देशहिताच्या हेतूने जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्य करते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे.“ 
- काझी मकदूम मोहियोद्दीन, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद, औरंगाबाद. 
--------------- 
“सर्व माणसे एकाच ईश्वराची पूजा करतात. ही धरती शांतता आणि समाधानात राहावी, सगळी भांडणे मिटावीत, अशी ईश्वराची इच्छा असते. माणसाने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवावे, यासाठी रोजा पाळण्याचा संदेश आहे.” - मौलाना इलियास खान फलाही, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget