Halloween Costume ideas 2015

मानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय इब्ने अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापाशी सकाळच्या प्रहरी बसलो होतो. इतक्यात काही लोक अंगावर कांबळें लपेटून हातात तलवार घेऊन आले. त्यांच्या शरीराचा बहुतांश भाग विवस्त्र होता आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक मुजर कबिल्याचे होते, म्हणजे जवळपास सगळेच मुजरी होते. त्यांचे दारिद्र्य आणि  गरिबी पाहून पैगंबरांचा चेहरा चिंतेमुळे पिवळा पडला. मग पैगंबर घरात गेले आणि बाहेर येऊन बिलाल (रजि.) यांना अजान देण्याचा आदेश दिला. (नमाजची वेळ झाली होती.) तेव्हा  बिलाल (रजि.) यांनी ‘अजान’ आणि ‘तकबीर’ (नमाज सुरू होण्यापूर्वी ‘अल्लाहु अकबर’ म्हणणे) चे पठण केले. पैगंबरांनी नमाजचे नेतृत्व केले आणि नमाजनंतर भाषण दिले, त्यात  पैगंबरांनी ‘सूरह निसा’ची पहिली आयत आणि ‘सूरह हश्र’च्या शेवटच्या ‘रुकूअ’मधील (चरणातील) पहिली आयत पठण केली. त्यानंतर म्हणाले, ‘‘लोकांनी अल्लाहच्या मार्गात सदका  (दान) द्यावे, दीन द्यावे, दिरहम द्यावे, कपडे द्यावेत, दोन शेर गहू द्यावेत, दोन शेर खजूर द्यावेत.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘इतकेच नव्हे तर एखाद्याकडे खजुराचा अर्धा तुकडा जरी  असेल तरी तो द्यावा.’’ भाषण ऐकल्यानंतर अन्सारांपैकी एक मनुष्य आपल्या हातात एक पिशवी घेऊन आला जी त्याच्या हातात मावतही नव्हती. मग लोकांनी एकापाठोपाठ एक  सदका (दान) देण्यास प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर मी धान्य आणि कपड्यांचे दोन ढीग पाहिले. लोकांनी अशा पद्धतीने सदका दिल्याचे पाहून पैगंबरांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा  दिसू लागल्या, जणू चेहऱ्यावर सोन्याचे पाणीच लावण्यात आले आहे. मग पैगंबरांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाममध्ये एखादी चांगली पद्धत सुरू करील त्याला त्याचा बदला मिळेल  आणि जे लोक या चांगल्या पद्धतीचा नंतर अवलंब करतील त्यांनाही त्याचे पुण्य मिळेल आणि काम करणाऱ्यांच्या बदल्यामध्ये घट केली जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्याने इस्लाममध्ये  एखाद्या वाईट पद्धतीची सुरूवात केली त्याला त्या पापाची शिक्षा मिळेल आणि नंतर त्याचे अनुकरण करणाऱ्यांचे पापदेखील त्याच्याच कर्मपत्रात लिहिले जाईल. तसेच अनुकरण  करणाऱ्यांचे पापांमध्ये काहीही घट केली जाणार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : इस्लामच्या दोन मूलभूत शिकवणी आहेत- पहिले एकेश्वरत्व आणि दुसरे अल्लाहच्या भक्तांपैकी गरीब व गरजवंतांवर कृपा व दया करणे. याच कारणास्तव पैगंबर  मुहम्मद (स.) यांचा चेहरा चिंतेने पिवळा पडला आणि जेव्हा त्यांच्यासाठी (गरीब व गरजवंतांसाठी) कपडे व अन्नधान्याची व्यवस्था झाली तेव्हा पैगंबरांचे मुखकमल सोन्यासारखे चमकू  लागले. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या भाषणात ‘सूरह निसा’ची पहिल्या आयतीचे पठण केले, त्याचा अर्थ असा आहे- ‘‘लोकहो, आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला  एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’  (कुरआन,४:१)
या आयतमध्ये अल्लाहने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक ‘वहदत-ए-इलाह’ आणि दुसरी ‘वहदत-ए-बनी आदम’. ‘वहदत-ए-इलाह’चा अर्थ आहे फक्त अल्लाह उपासना व  आज्ञाधारकतेचा हक्कदार आहे, यालाच ‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणतात. ‘वहदत-ए-बनी आदम’चा अर्थ आहे सर्व मानव एकाच माता-पित्याची लेकरे आहेत, म्हणून त्यांच्यादरम्यान कृपा  व दयेवर आधारित वर्तणूक व्हायला हवी. त्या गरिबांना पाहून सदका (दान) देण्यासाठी आवाहन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे या आयतीचे पठण स्पष्टपणे या गोष्टीकडे निर्देश  करते की समाजातील गरिबांची मदत न करणे अल्लाहचा क्रोध व रागाचे कारण बनते. 
तसेच ‘सूरह हश्र’ची जी आयत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पठण केली आहे त्याचा अनुवाद असा आहे, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि  प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत राहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी  तुम्ही करता.’’ (कुरआन,५९:१८) या आयतीचे पठण करून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या गोष्टीकडे इशारा केला आहे की गरिबांवर जी संपत्ती खर्च केली जाते ती मनुष्यासाठी  परलोकात संचय होतो, ती नष्ट होत नाही. ज्या मनुष्याने सर्वांत अगोदर सदका (दान) केले होते त्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्तुती केली आहे आणि म्हणाले, ‘‘त्याला त्याच्या  ‘सदका’चेही पुण्य लाभेल आणि त्याला पाहून इतर लोकांमध्येही सदका देण्याची भावना जागृत झाली त्याचाही बदला त्याला मिळेल.’’ 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget