Halloween Costume ideas 2015

तुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रपती - रज्जब तय्यब उर्दगान

तुर्कस्थानात मागच्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये रज्जब तय्यब उर्दगान आणि त्यांच्या पक्षाने 52 टक्के मते घेवून निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. या निवडणुकांवर अनेक देशांच्या नजरा खिळलेल्या होत्या. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच जगाच्या अनेक देशातून उर्दगान यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यात ब्लादिमीर पुतीन हे आघाडीवर होते. तुर्कस्थानात मात्र समर्थन आणि विरोध दोन्ही एकाच वेळी सुरू झाले आहे. उर्दगान एक अजब रसायनाचे नाव आहे. देशाची अर्धी जनता त्यांच्यावर प्रेम करते तर अर्धी दु:स्वास. अपेक्षा आणि उपेक्षा यांचे नाव म्हणजेच उर्दगान. म्हणूनच उर्दगान कसे आहेत, हे समजून घेणे गरजेचे ठरते. राष्ट्रीय निवडणुकीत त्यांच्या ताज्या विजयानिमित्त या आठवड्यात आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
उर्दगान
    रज्जब तय्यब उर्दगान यांच्या नावाचे तुर्की भाषेत उच्चारण रेसिप तय्यीब ऐरदोगान असे आहे. त्यांचा जन्म 26 फेब्रु्रवारी 1954 रोजी इस्तंबूल शहरा जवळच्या कासीम पाशा या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव टेन्जील (तंजील) तर वडिलाचे नाव अहेमट (अहेमद) होते. त्यांच्या जन्मानंतर लगेच उर्दगान परिवार जॉर्जियामध्ये स्थलांतरित झाला. त्यांना मुस्तफा नावाचा एक भाऊ असून, वेसाईल नावाची एक बहीण आहे. त्यांचे वडील तुर्की नेव्हीच्या तटरक्षक दलामध्ये कॅप्टन या पदावर होते. त्यांचे बालपन राईज नावाच्या गावात व्यतीत झाले. त्या ठिकाणी असलेल्या मस्जिदीमध्ये त्यांचा जास्त वेळ जात असे. बालपणापासूनच त्यांना इस्लाम विषयी आकर्षण होते. ते स्वत: कारी असून, व्याकरणाच्या बारकाव्यासह कुरआन पठण करणार्‍याला कारी म्हणतात. त्यांना
कुरआनचा बराच  भाग मुखोद्गत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कासीम पाशा पीआलेच्या या मदरशातून झाले असल्याने इस्लामचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले आहेत. ते 13 वर्षांचे असताना त्यांचा परिवार परत तुर्कस्तानात येवून इस्तंबूलमध्ये स्थायिक झाला. 1973 साली इमाम हैटिप हायस्कूलमधून त्यांनी धार्मिक शिक्षणाची पदविका पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आधुनिक शिक्षणाची कास धरली. अकसर हायस्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स सायन्सेस मधून त्याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांना फुटबॉलचे जबरदस्त आकर्षण होते व त्यांनी फुटबॉलच्या अनेक सामन्यांमध्ये भाग सुद्धा घेतला होता. 4 जुलै 1978 रोजी त्यांनी ऐमीन गुलबरन यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले असून, त्यांची नावे अहेमद बुरक आणि नेक्मीट बिलाल अशी आहेत.
    शालेय जीवनामध्ये असतांनाच राष्ट्रीय तुर्की छात्र संघात ते सामिल झाले व एका कम्युनिस्ट विरोधी कार्यक्रमात सामील होवून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. 1974 मध्ये त्यांनी मास्कोनिया नावाच्या नाटकात नायकाची भूमिका बजावली. या नाटकाचे लेखन व निर्देशन त्यांनी स्वत:च केले होते. या नाटकात फ्री मेसनरी, साम्यवाद आणि ज्यू लोकांविरोधात अनेक दृष्य सादर करण्यात आली होती. 1976 मध्ये इस्लामवादी नॅशनल सॉल्व्हेशन पक्षाच्या बेऊग्लू युवा शाखेचे ते प्रमुख झाले व लगेचच इस्तांबूल युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून पार्टीने त्यांची नियुक्ती केली. 1980 मध्ये नॅशनल सॉल्व्हेशन पार्टीच्या सत्तेविरूद्ध सैन्याने विद्रोह केल्याने त्यांनी दुसर्‍या पक्षाची स्थापना केली. ज्याचे नाव वेलफेअर पार्टी असे ठेवले. 1984 मध्ये या पक्षाने आपली पाळेमुळे जनतेमध्ये रूजवण्यास सुरूवात केली. 1985 मध्ये ते वेलफेअर पार्टीचे इस्तंबुल शहराध्यक्ष झाले. 1991 मध्ये संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले. मात्र इस्लामवादी असल्यामुळे त्यांना शपथग्रहण करण्यापासून रोखण्यात आले.
    27 मार्च 1994 रोजी झालेल्या इस्तांबूल मनपाच्या निवडणुकीमध्ये 25.19 टक्के मत घेवून ते इस्तांबूलचे महापौर म्हणून निवडून आले आणि आपल्या कार्यकाळात इस्तांबूलच्या पाणी टंचाई, वायू प्रदुषण, वाहतुकीमधील अनेक वर्षांपासूनच्या समस्या त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून सोडविल्या. महापालिकेत त्यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले. शेकडो किलोमीटरची पाईपलाईन टाकून त्यांनी इस्तांबूल शहराची पाण्याची समस्या कायमची दूर केली. त्यांच्यापूर्वी इस्तांबूलच्या रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग लागलेले असायचे. अत्याधुनिक रिसायक्लींग सुविधेची स्थापना करून त्यांंनी इस्तांबुलला कचरामुक्त केले. त्यांनी मनपाच्या निधीचा जनकल्याणासाठी असा कल्पक उपयोग केला की, महापालिकेवर असलेल्या दोन अब्ज डॉलर कर्जाची संपूर्ण परतफेड करून उलट 4 बिलियन डॉलरचा नफा मिळवून दिला. मात्र 1998 साली वेलफेअर पक्षाला तुर्कस्थानाच्या धर्मनिरपेक्षतेला आव्हान दिल्याच्या आरोपावरून असंवैधानिक घोषित करून सर्वोच्च न्यायालयाने या पक्षावर बंदी आणली. त्यामुळे त्यांनी 2001 साली एका नव्या न्याय आणि विकास नावाच्या (एकेपी) पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाने संसदेत 34.3 टक्के मत घेवून प्रवेश केला आणि त्यांनी नवीन सरकार स्थापित केले. मागच्या पिढीतील कथित धर्मनिरपेक्ष नेते इसीव्हीट, बहेसेली, इल्माज आणि शिल्लर यांना राजीनामे द्यावे लागले. आपल्या सरकारमध्ये त्यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देवून जनतेचा विश्‍वास हस्तगत केला व हळूहळू त्यांनी तुर्की प्रशासनामध्ये इस्लामी मुल्यांची स्थापना करण्यास सुरूवात केली. त्यामुळे युरोप धार्जीने व छद्मधर्मनिरपेक्ष राजकीय नेते, वरिष्ठ सैन्याधिकारी आणि न्यायाधिश यांनी उर्दगान यांना धर्मनिरपेक्षतेचा शत्रू म्हणून प्रचारित करण्यास सुरूवात केली. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांच्या पक्षाला 49.83 मतांनी विजयी केले. आणि 327 खासदारांसह तुर्कस्थानच्या इतिहासात एक शक्तीशाली पंतप्रधान म्हणून एरदोगान प्रस्थापित झाले. त्यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढील तीन सार्वजनिक निवडणुका त्यांनी लिलया जिंकल्या. इस्लामी विचारांची कास धरल्यामुळे युरोप आणि अमेरिकेला ते आवडेनासे झालेले आहेत. त्यातूनच जून 2016 मध्ये त्यांच्याविरूद्ध  सैनिकी उठाव करण्यात आला. मात्र 4 तासात जनतेने रस्त्यावर उतरून हा उठाव अयशस्वी केला. उर्दगान यांनी लगेच देशात आणिबाणी घोषित करून उठाव करणार्‍यांना तुरूगांत डांबले. गेल्या दोन वर्षांपासून 50 हजारांपेक्षा जास्त लोक सरकारविरूद्ध केलेल्या बंडाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रद्रोहाच्या खटल्यांना सामोरे जात असून, त्यात अनेक प्रशासकीय, सैनिक अधिकारी, न्यायाधिश आणि पत्रकारांचा समावेश आहे. त्यांचेच परिजन व समर्थक उर्दगानचा विरोधच नव्हे तर दु:स्वासही करतात. यानंतर झालेल्या मागच्या आठवड्याच्या निवडणुकीमध्ये उर्दगानचा उदय हा तुर्कस्थानला एक नवीन दिशा देणारा ठरेल, यात वाद नाही. तो कसा हे आता आपण पाहू.
उस्मानी खिलाफत
    तुर्कस्थान हे 1923 पर्यंत जागतिक इस्लामी जगताचे केंद्र होते.  त्या ठिकाणी उस्मानी खिलाफत (आटोमन साम्राज्य) सुरू होती. 1299 साली ज्याची स्थापना मुहम्मद (द्वितीय) यांनी केली होती. मात्र प्रथम विश्‍वयुद्धात तुर्की खिलाफतीने जर्मनीची साथ दिल्याने हिटलरच्या पराजयानंतर दोस्त राष्ट्रांनी तुर्की खिलाफतीचा अंत केला. 29 ऑक्टोबर 1923 रोजी तुर्की ही खिलाफत संपली आणि मुस्तफा कमाल पाशा यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष तुर्की गणराज्याची स्थापना झाली. येणेप्रमाणे तीन खंड आणि जवळ-जवळ 40 देश असलेल्या तुर्की खिलाफतीचे विघटन होवून अनेक नवीन राष्ट्र जन्माला आले. 624 वर्षे चाललेल्या या खिलाफतीमध्ये इस्लामी मुल्यांना फार महत्व दिले जात होते. किंबहुना जगातील इतर इस्लामी देश या खिलाफतीची मान्यता मिळविण्यात स्वत:चा सन्मान पाहत होते. या खिलाफतीमध्ये अबखाजीया, अल्बानिया, अल्जेरिया, आर्मेनिया, ऑस्ट्रिया, अजरबैजान, बहेरीन, बोस्नीया, बुलगारिया, क्रोएशिया, सायप्रस, इजिप्त, इरिट्रीया, जॉर्जिया, युनान, हंग्री, इराण, इराक, जॉर्डन, कोसोवो, कुवैत, लेबनान, लिबिया, मेसॅडोनिया, माल्डोआ, मॉन्टेनिग्रो, नागोरनो काराबाक, उत्तरी सायप्रस, ओमान, पॅलेस्टिन, कतर, रोमनिया, रूसचा काही भाग, सऊदी अरब, सरबिया, स्लोवाकिया, सोमालिया, दक्षिण ओसेतिया, सुडान, सीरिया, ट्युनिशिया, ट्रान्सनिस्ट्रीया, तुर्कस्थान, संयुक्त अरब अमिरात, युक्रेन आणि यमन इत्यादी देश येत होते. उस्मानी खिलाफत असे पर्यंत इस्लामी देश एकसंघ आणि शक्तीशाली होते. 1453 साली तुर्क सुलतान मुहम्मद फातेह ने कॉन्टेटिनोपल (इस्तांबुल) जिंकून ख्रिश्‍चन (बान्झेन्टाईन) सत्तेचा निर्णायक पराभव केल्यामुळे सर्व ख्रिश्‍चन सत्ताधार्‍यांनी आत्मपरिक्षण करून आपल्या पराजयाची व तुर्कांच्या विजयाची कारणे शोधण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची व मुस्लिमांची शारीरिक आणि सैन्यशक्ती सारखीच होती. मात्र मुस्लिम हे नैतिक शक्तीने ख्रिश्‍चनांपेक्षा उजवे होते. म्हणून त्यांना विजय प्राप्त झाला. ख्रिश्‍चन राजांनी चर्चच्या शक्तीला निष्प्रभ केले होते व धर्माचा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो, असे नवीन तत्व अमलात आणले होते. त्यामुळे ख्रिश्‍चन धर्मसत्ता कमकुवत झाली होती. राजा आणि त्यांच्या सैन्यामधून धार्मिक आचरण हद्दपार झाले होते. त्यातून त्यांची नैतिक शक्ती कमी झाली होती. ही बाब लक्षात येताच त्यांनी पहिल्या महायुद्धानंतर उस्मानी खिलाफतीचा पराभव झाल्यानंतर मुस्लिमांच्या नैतिक शक्तीवर प्रहार केला. त्याची सुरूवात त्यांनी तुर्की खिलाफतीचा एक सैनिक कमांडर कमाल अतातुर्क याला आपलेसे करून व त्याला तुर्कस्थानची सत्ता देण्याचे वचन देवून केली. त्यानुसार अमेरिका आणि युरोपच्या कच्छपी लागून मुस्तफा कमाल पाशा यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये इस्लामी मुल्यांचा नाश करून पाश्‍चिमात्य मुल्यांची प्रतिष्ठापणा केली. कमाल पाशा याची अशी धारणा होती की, जे-जे इस्लामी ते-ते वाईट आणि जे-जे युरोपीय ते-ते चांगले. यातूनच आधुनिकतेच्या नावाखाली सर्व इस्लामी मूल्य पायदळी तुडविण्यात आली. अरबी लिपीच्या जागी रोमण लिपी लागू करण्यात आली. पुरूषांना दाढी ठेवण्यावर तर महिलांना पर्दा करण्यावर प्रतिबंध लादण्यात आले.  पुरूषांना कोट पँट तर महिलांना शर्ट आणि स्कर्ट घालण्याची सक्ती करण्यात आली. व्याजविरहित अर्थव्यवस्थेचा त्याग करून व्याजाधारित अर्थव्यवस्था स्थापित करण्यात आली. दारूवरील प्रतिबंध उठविण्यात आले. जुगाराचे अड्डे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. मस्जिदीवरील लाऊड स्पिकर हटविण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्कार्फ सुद्धा घालण्याची परवानगी नाकारण्यात आली. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातून सहशिक्षा सुरू करण्यात आली. फॅशन, चित्रपटांना मंजूरी देण्यात आली. इस्लामवर आचरण करणार्‍यांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. मात्र इस्लामचा बाळकडू मिळालेल्या तुर्की जनतेने हे सगळे सहन करत आतल्या आत आपल्या इस्लामी विचारांना जपण्यास सुरूवात केली. जेव्हा वाईट प्रवृत्तींचा धुमाकूळ देशात सुरू झाला आणि क्राईम रेट वाढला तेव्हा पाश्‍चिमात्य जीवन पद्धतीला वैतागून जनतेनी रज्जब तय्यब उर्दगान यांना समर्थन देण्यास सुरूवात केली. आजमितीला जरी तुर्कस्थानामध्ये पूर्णपणे शरिया आधारित इस्लामी शासन पद्धती अस्तित्वात आलेली नसली तरी इस्लामी मुल्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात शासन, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनामध्ये झालेली आहे. हीच गोष्ट भांडवलदार राष्ट्रांना खटकत आहे. त्यातूनच रज्जब तय्यब उर्दगान यांचा विरोध होत आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget