(४८) (ईशदूतांनी पुन्हा आपल्या संभाषणाच्या ओघात म्हटले) ‘‘आणि अल्लाह त्याला ग्रंथ व विवेकाची शिकवण देईल, तौरात व इंजिलचे शिक्षण देईल.
(४९) आणि त्याला बनीइस्राईलसाठी आपला पैगंबर नियुक्त करील.’’ (आणि जेव्हा तो पैगंबर म्हणून बनीइस्राईलपाशी आला तेव्हा त्याने सांगितले) ‘‘मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेतचिन्ह घेऊन आलो आहे. मी तुमच्यासमोर मातीपासून पक्ष्याच्या आकाराचा एक पुतळा तयार करतो आणि त्याला फुंकर मारतो. तो अल्लाहच्या आदेशाने पक्षी बनतो. मी अल्लाहच्या आज्ञेने जन्मजात आंधळ्याला व महारोग्याला बरे करतो आणि त्याच्या आज्ञेने मृताला जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय खाता आणि आपल्या घरांत काय साठा करून ठेवता. यात तुमच्यासाठी पुरेशी निशाणी आहे जर तुम्ही ईमानधारक असाल.४५
(५०) आणि मी ती शिकवण व त्या मार्गदर्शनाचे समर्थन करण्यासाठी आलो आहे जे यापूर्वीच्या तौरातमध्ये विद्यमान आहे,४६ आणि यासाठी आलो आहे की तुम्हासाठी काही अशा वस्तूंना मी वैध करावे ज्या तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आल्या आहेत.४७ पाहा, मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेत घेऊन आलो आहे, म्हणून अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा.
४५) म्हणजे या निशाण्या तुम्हाला याचा विश्वास ठेवण्यास पुरेशा आहेत की मी त्या अल्लाहचा पाठविलेला पैगंबर आहे जो या सृष्टीचा निर्माणकर्ता व प्रभुत्वशाली शासक आहे. अट ही आहे की तुम्ही सत्य मान्य करण्यास तयार असावे व हटधर्मी असू नये.
४६) म्हणजेच मी अल्लाहकडून पाठवीला गेलो असल्याचे एक आणखी प्रमाण आहे. मी त्याच्याकडून पाठविला गेलो नसतो आणि एक खोटा दावेदार असतो तर स्वत:च एक नवीन धर्म स्थापन केला असता. माझ्या या चमत्कारांनी तुम्हा लोकांना मूळ धर्मापासून (जीवनपद्धती) हटवून माझ्या स्वनिर्मित धर्माकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु मी तर केवळ त्याच मूळ धर्माला (जीवनपद्धतीला) मान्य करतो आणि त्याच शिकवणीनुसार चालतो जी शिकवण माझ्यापूर्वीं अल्लाहच्या पैगंबरांनी दिलेली आहे. आदरणीय पैगंबर इसा (अ.) तोच धर्म (दीन) घेऊन आले होते जे आदरणीय पैगंबर मूसा (अ.) आणि इतर पैगंबरांनी सांगितले होता, ही गोष्ट सद्य इंजिलमध्ये (बायबल)सुद्धा स्पष्टपणे आठवते. मत्तीच्या उल्लेखानुसार पर्वतावरील प्रवचनात पैगंबर इसा (अ.) सांगतात, ``लोकहो, तुम्ही हे समजू नका की मी तौरात व इतर पैगंबरांच्या ग्रंथांना रद्दबातल ठरविण्यासाठी आलो आहे. रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे.'' (५:१७) एका यहुदी (ज्यू) विद्वानाने आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांना प्रश्न विचारला की धर्माच्या आदेशांपैकी सर्वप्रथम आदेश कोणता आहे? उत्तर देताना इसा (अ.) यांनी सांगितले, ``तुम्ही आपल्या निर्माणकर्त्या प्रभुशी आपले मन, प्राण आणि बुद्धीने प्रेम करा. श्रेष्ठ आणि सर्वप्रथम आदेश हाच आहे आणि याचसमान दुसरा आदेश आहे की आपल्या शेजाNयावर आपल्यासारखे प्रेम कर. हेच दोन आदेश संपूर्ण तौरात आणि इतर ईशग्रंथांचे मूळाधार आहेत.'' (मत्ती २२ : ३७-४०) आदरणीय पैगंबर इसा (अ.) आपल्या अनुयायांना उपदेश करतात, ``धर्मशास्त्री आणि धार्मिक विद्वान मूसा (अ.) यांच्या गादीवर बसलेले आहेत. म्हणून ते जे सांगतील ते करा आणि मान्य करा. परंतु त्यांच्याप्रमाणे बनू नका कारण ते सांगतात परंतु करत नाहीत.'' (मत्ती २३ : २-३)
४७) म्हणजेच तुमच्या अज्ञानी लोकांचे अंधविश्वास, तुमच्या धर्ममार्तंडाचे धर्मविधी (कायदा) विषयी किस काढणे तसेच तुमच्या संन्याशी लोकांचा अतिरेक आणि मुस्लिमेतर लोकांचे वर्चस्वशाली बनणे यामुळे मूळ अल्लाहरचित धर्मविधान (शरीयत) मधील प्रतिबंधात जी वृद्धी झाली आहे, मी तिला मोडून काढीन आणि तुमच्यासाठी त्याच वस्तू वैध आणि अवैध ठरविन जे अल्लाहने तुमच्यासाठी वैध व अवैध ठरविल्या आहेत.
Post a Comment