Halloween Costume ideas 2015

ईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणते गुण असायला हवेत? - भाग १

सीमा देशपांडे
7798981535


परोक्षावर श्रद्धा ठेवणे -
आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्‍वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु, त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया दुसरी गुणवत्ता ‘परोक्षावर  श्रद्धा’ म्हणजे अदृश्य ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणे. शब्दश:, अदृश्याचा संदर्भ असा होतो की अश्या गोष्टी ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित (अनुपस्थित) आहेत. ’अल्लाहने त्याचे मार्गदर्शन व संरक्षण प्राप्त करण्यासाठी याला प्रमुख अट का बरे ठरविले आहे? अदृश्य काय आहे? जसे मनुष्यात प्रामुख्याने, पाच मुख्य इंद्रिय असतात   (ऐकणे, दृष्टी, गंध, चव आणि स्पर्श ) ज्या  गोष्टी  आपल्या या इंद्रियांपासून कळतात, अश्या गोष्टीं बद्दल कोणतेही वाद नाही, कारण आपण त्या वस्तू पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, स्वाद घेऊ शकतो आणि गंध करू शकतो. अगदी तसेच आपण अदृश्य भावनांना सामोरे जाऊ शकत नाही व त्याची अनुभुती करु शकत नाहीत.
    याव्यतिरिक्त आपल्याकडे  ज्ञानेंद्रियांच्या  क्षमतेशिवाय  अनेक अशा क्षमता आहेत ज्या आपल्याला गोष्टी समजून घेण्यास, अनुभुती करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,जेंव्हा तुम्हाला भूक लागते तेंव्हा तुम्ही भुकेले आहात हे तुम्हांला कोणते इंद्रीय  सांगत आहे? कोणता इंद्रीय आपल्याला झोपेतून जाग आणतो? तसेच, स्त्रीला गर्भ राहिल्यास तो गर्भ तिच्या शरिराचा भाग असूनदेखील ती जाणू शकत नाही की तिच्या गर्भात काय वाढत आहे? म्हणून एक अदृश्य शक्ती जी आपल्या पाच इंद्रीयांना समजत नाही व दिसत नाही म्हणून ती उद्भवत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून या (आयात) वचनात ज्या अदृश्य शब्दांचा उल्लेख आहे ते सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमते पलीकडचे आहे.
    चला एक पाऊल पुढे जाऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितचे समीकरण सोडवण्यासाठी दिले गेले, आणि नंतर तो किंवा तीने सोडवून उत्तर काढले, तर आपण म्हणतो की या विद्यार्थ्याने अदृश्य शोधून काढले आहे? अजीबात नाही, कारण विद्यार्थ्यांनी ठराविक नियम आणि तत्त्वे यावर आधारित उपाय योजले व उत्तर काढले. त्याचप्रमाणे, हवामानशास्त्राच्या केंद्राने उद्या पावसाळा घोषित केला असेल, तर हवामानशास्त्रज्ञांनी अनदेखीचा खुलासा केला आहे का? पुन्हा, उत्तर नाही असेच आहे, कारण त्यांनी ज्ञान आणि संशोधनावर त्यांचे निष्कर्ष काढले आहेत. तसे नसल्यास कुठल्या मनुष्य /प्रेषित /अवताराने सूर्य पूर्वेकडुन पश्‍चिमेकडे उगविन्याचे धाडस दाखविले?  पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर मनुष्य समुद्र, विहीर, तलाव, नदी याची निर्मिती करु शकतो का? हे प्रश्‍न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की मनुष्य यासाठी असमर्थ आहे. म्हणून या कुरआनच्या (आयात) वचनात उल्लेख केलेल्या अदृश्य शब्दांचे अर्थ निष्कर्ष आणि संशोधन या ज्ञानाने काढता येत नाही.
    आणि अखेरीस, जर एखाद्या मित्राने आपल्याला सूचित केले की आपला चोरीस गेलेला मोबाईल फोन अमक्याकडे  आणि अमूक ठिकाणी आहे, याचा अर्थ आपल्या मित्राला अदृश्य गोष्टीची माहिती आहे का? उत्तर नाही असेच आहे. तसे नसल्यास मनुष्य स्वत: व इतरांचे जन्म-मृत्यू सांगू शकतो का? अर्थातच नाही. कारण अदृश्य तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या कोणालाही ज्ञात नाही. म्हणून या आयात (वचनात)मधील उल्लेखित ‘ अदृश्य’ शब्द आपल्यासाठी ज्ञात नाही. या अर्थानेच घ्यावा लागेल.
    त्याचप्रमाणे, अगदी संदेष्टे (प्रेषित) आणि दूत यांना देखील अदृश्याबद्दल  ज्ञान व जाणिव नसते. खरं तर, अदृश्याचे ज्ञान अल्लाह  सर्वशक्तिमान वगळता कोणालाही नाही. आणि फक्त अल्लाहच स्वत: निवडतो ज्यास त्याला याचे ज्ञान द्यायचे आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,”तो परोक्षाचा(अदृश्य) ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही” (72:26).
    ’त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो’ (72:27)
    ईश्‍वर त्याच्या ज्ञानापैकी काही  अंश आपल्या प्रेषितांना  सामायिक (शेअर) करतो आणि ते त्यांच्यासाठी पाठोपाठ जगात एक चमत्कार बनते. याचा अर्थ असा होत नाही एखाद्या प्रेषितांना परोक्षाचे पूर्ण ज्ञान आहे व आपण त्यांची उपासना करावी. कदापि नाही! !! ईश्‍वर पैगंबर मुहम्मद (स.) यांना कुरआनात म्हणतो, ”हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा.” ”त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.” हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणू काही तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, ”त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.” ( कुरआन 7:187)
    ”हे पैगंबर (सल्ल.), यांना सांगा की, मी (अर्थात पैगंबर सल्ल.) स्वत:करिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वत:साठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे, त्या लोकांसाठी  जे  माझे  म्हणणे  मान्य  करतील.”(कुरआन 7:188)
    अल्लाहवर विश्‍वास म्हणजे अदृश्य गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचे सर्वात उच्च स्वरूप, म्हणजे त्याचे स्वर्गदूत, ग्रंथ आणि न्यायाचा दिवस ह्यांवर विश्‍वास. जरी या सर्व गोष्टी आपल्यापासून पड्द्याआड ठेवल्या आहेत. तरी, आपण देवदूतांच्या उपस्थितीवर विश्‍वास करतो कारण अल्लाहने  त्यांच्या अस्तित्वाविषयी आपणास प्रेषित व ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसावरही(स्वर्ग-नर्क) विश्‍वास करतो कारण अल्लाहने याची पण माहिती आपणास दिलेली आहे.
    आता आणखी एका जिव्हाळ्याच्या गोष्टीचे उदाहरण बघूया. जे तुम्हाला अदृश्य ईश्‍वर कळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील  आत्मा तुम्हाला जीवन प्रदान करतो. मग विचार करा तुम्ही तुमचे प्राण पाहीलेले आहे का? किंवा आपण त्याची चव घेउन पाहिली किंवा सुगंध घेतला किंवा त्याला स्पर्श करुन पाहिले आहे का? नक्कीच नाही! परंतु ईश्‍वराने आपल्या शरीराला जीवन देण्याच्या त्याच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल कळणे शक्य झाले. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या  शरीरातल्या काही गोष्टी शोधणे आणि समजून घेणे कठीण व अशक्य  आहे, तर तुम्ही  तुमच्या इंद्रीयांमार्फत ईश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव कशा प्रकारे करू शकता? विचारात पडलात ना! परंतु, अल्लाहने आपण सर्वाना  असेच सोडून दिलेले नाही. आपणास विवेकशील मन  दिले आणी अनेक संकेत दिलेत जेणेकरून आपण त्यावर विचार करावा. अल्लाहने आपल्यासाठी (परिसरात) आजूबाजूला अशी चिन्हे मांडली व दर्शविली आहेत. त्यांचे बारकाईने निरक्षण करा, जाणीव करा आणी निष्कर्षावर पोहोचा. या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे. इतके तंतोतंत व काटेकोरपणे निर्माण केलेली  निर्मिती योगायोगाने स्वत:हून निर्माण होऊ शकली असती का? उलट योगायोगाने स्वत:हून तयार झालेल्या  गोष्टी यादृच्छिक असंगठित अल्पायुषी असतात. जर विश्‍वाची निर्मिती आणि परिरक्षणामागे ब्रह्मरुप शक्ती नसली असती तर सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी एकमेकांपासून दुभंगले असते आणि एक निर्मात्या विना, जीवन आणि संपूर्ण प्रणाली नष्ट झाली असती.
    वरील उदाहरणांवर विचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि मी या निष्कर्षावर पोहचले आहे की या विश्‍वाची तंतोतंत व काटेकोर निर्मिती, त्यातले जीवन आणि सौंदर्य फक्त आणि फक्त अल्लाह/परमेश्‍वर  मुळेच आहे व फक्त तोच या विश्‍वाचा निर्माता आहे. म्हणून जर प्रेषित सल्ल. यांनी  आपल्याला सांगितले की अल्लाह (एकेश्‍वरत्व) हाच विश्‍व निर्माण करणारा आहे आणि  चमत्कारांचा दावा करीत आहे तर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनात ही निश्‍चितता कायम होते तेव्हा तुमची श्रद्धा, तुमचे आचार-विचार सुद्धा हाच दावा करतात की अल्लाहकडून मिळणारे सर्वस्व हेच अंतिम सत्य आहे, आणि मी त्याच्याच नियमावलीच्या मार्गानुसार जीवन व्यतीत करेन. मग मला पर्वा नाही आपल्या संवेदनांना (नफ्स) ते समजून घेऊ शकते किंवा नाही. पण आज मनुष्य त्याच्या हृदयावर  आपल्या संवेदनांचे आपल्या वाडवडिलांच्या विचारांचे व या दुनियावी आकर्षकतेचे आवरण घातले आहे व तो कळतनकळत पणे आपल्या अदृश्य ईश्‍वराला विसरून गेला आहे. कारण तो आज सर्वात जास्त भीती बाळगतो त्याच्या मृत्यूची. त्यामुळे तो याच संभ्रमात पडलाय की हेच अंतीम जीवन आहे. पण हे जीवन तर क्षणभंगुर आहे. ईश्‍वर म्हणतो ’आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते (कुरआन 29:64.)
    जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहतो तेव्हा आपल्याला पदोपदी त्याना भेटण्याची आस लागते व त्यांच्या गैरहजेरीत आपण त्यांची आठवण व त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नियमांचे पालन करतो. हेच प्रेमाचे आवरण आपण आपल्या पालनकर्त्याविषयी का बाळगत नाही? का आपण मृत्युला घाबरतो? आपण का बरे विचार करत नाही की माझा मृत्यु हा शेवट नसून त्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात आहे आणि तिथे मला माझ्या ईश्‍वराला भेटायचे आहे. ही विचारसरणी आपणास मृत्युची भीती बाळगू देत नाही तर ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करते व त्याच्या नियमाचे पालन करण्यास भाग पाडते. ईश्‍वराची सदैव इच्छा हीच आहे की त्याचे भक्त श्रद्धा-विचार-आचारणाने चांगले बनावेत व मृत्युनंतर स्वर्गात जावेत.
    अशाप्रकारे, जोपर्यंत कुठलाही मनुष्य परोक्षावर श्रद्धा ठेवत नाही व न्यायाच्या दिवसाचे भय बाळगत नाही तोपर्यंत तो मोमीन बनू शकत नाही. ईश्‍वर म्हणतो, ’त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.’  (कुरआन 2:281)
    उर्वरित गुण पाहूया पुढील लेखात.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget