Halloween Costume ideas 2015

कायदा तुडविणारी असहिष्णुता

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मॉब लिंचिंगचे थैमान माजले आहे. त्यातून आता निष्पाप नागरिकांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्तेदेखील बळी पडत आहेत. जमावाच्या हातून  सातत्याने होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी  १७ जुलै २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. तसेच अशा प्रकारची झुंडशाही थांबविण्यासाठी  संसदेत कायदा करण्याचा विचार करण्याचीही सूचना केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने स्पष्ट केले की, ‘या झुंडशाहीला देशातील  कायदा तुडवू देण्याची परवानगी देता येऊ शकत नाही. खटला आणि न्याय रस्त्यावर केला जाऊ शकत नाही. असे कुणी करत असेल तर त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारी  संस्थांवर आहे. झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांचे पिशाच्च रूप होऊ शकते. अफवांतून जन्मलेली असहिष्णुता उलथापालथ घडवू शकते. आज जमावाच्या हिंसाचाराने देशावर परिणाम होत  आहे. सन्मानाने जगण्याच्या अधिकारापेक्षा दुसरा उच्च अधिकार नाही. असहिष्णुता आणि खोट्या बातम्या-अफवा वाढल्या तर जमाव भडकतो. म्हणूनच लोकशाही आणि कायदा- सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे.’ दरम्यान, याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी  पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे. १७ जुलै याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भाजयुमो, अभाविपच्या कार्यकत्र्यांनी मारहाण केली. झारखंडच्या पाकुड येथे  अग्निवेश पत्रकार परिषद घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताच जमावाने काळे झेंडे दाखवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांच्यावर हल्ला केला. अग्निवेश यांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी  मारहाण करण्यात आली. यात अग्निवेश गंभीर जखमी झाले आहेत. येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मंगळवारी अग्निवेश येथे आले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच आता अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले जाते. आता तर मारेकऱ्यांनी उघडपणे, व्हिडिओ शुटिंग करत हल्ला  केल्याचे दिसून येते. समाजातील वाईट रुढी, परंपरा याविरोधात आवाज उठवण्याचे कार्य स्वामी अग्निवेश करीत असतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न  करणाऱ्यांना सध्या झुंडशाहीच्या माध्यमातून लक्ष्य बनविले जात आहे. मागील साठ वर्षांपासून आपल्या सामाजिक जीवनात अग्निवेश यांनी प्रत्येक प्रकारची देशसेवा केली आहे. यापूर्वी  दलित व आदिवासींचे प्रश्न मांडणारे डॉ. विनायक सेन, प्रा. शोमा सेन, सीमा आझाद, चंद्रशेखर यांना कारागृहात पाठविण्यात आले. सोनी सोरी यांना विजेचा शॉक देण्यात आल्याचा  घटना घडल्या आहेत. स्वामी अग्निवेश यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. त्यांच्यावर पहिला हल्ला त्यांच्या ‘अंमरनाथ येथील बर्फाचे पिंड हे एक नैसर्गिक घटना आहे’ या  वक्तव्यावरून झाला होता. त्या वेळी अग्निवेश यांचे मुंडके उडविणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यांच्यावर दुसरा हल्ला छत्तीसगढमधील सुकमा येथे झाला  होता. तेव्हा आदिवासींची तीन गावे जाळली होती आणि पाच महिलांवर बलात्कार करण्यात आला होता तेव्हा त्या गावांत जाऊन मदतकार्य करताना अग्निवेश यांच्यावर हल्ला करण्यात  आला होता आणि त्यांना जखमी करण्यात आले होते. झुंडशाहीचा हल्ला रोखण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थानी असलेल्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु तसे काही  होताना सध्या तरी दिसत नाही. सरकार आणि शासनाच्या माध्यमातून त्यांचा एक भाग अराजकता माजविणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आढळून येते. उर्वरित भाग जाणूनबुजून अशा  घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे. सुप्रीम कोर्टाने मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली तरी सरकारतर्फे तातडीची योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही.  त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केराची टोपली दाखविण्यात आली आणि स्वामी अग्निवेश यांच्यासारख्या सामाजिक कार्यकत्र्यावर हल्ला करण्यात आला. देशभर  असहिष्णुतेचे वातावरण, झुंडशाहीचा धिंगाना सुरू असताना विरोधी पक्ष काय करीत आहेत? आज स्वामी अग्निवेश यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे उद्या आपला नंबर लागणार आहे हे त्यांना समजले पाहिजे. खरे तर सध्या विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्यांच्याकडे कसलेही खंबीर नेतृत्व उरलेले नाही. आता त्यांच्यात  संघर्ष करण्यासाठी त्राणच उरलेला नाही. मात्र यामुळे हताश व निराश होण्याची गरज नाही. भारतीय जनता आता जागृत होत आहे. समाज लढण्यासाठी तयार असेल आणि ती त्याची  आवश्यकता असेल तर तो आपले नेतृत्व स्वत: निर्माण करील. नेभळट विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करून समाजातील सामान्य लोकांनी उभारी घेण्याची गरज आहे. 
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget