Halloween Costume ideas 2015

अफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र

द्वेषपूर्ण अफवा...जहरी प्रचार-प्रसाराच्या सक्षम यंत्रणा, यामुळे जगण्याचा विचार करणाऱ्यांची निष्ठाच ढवळून रसातळाला नेण्याची ही पूर्वापार छुपी चाल आहे. सामान्य नागरिकांची सूजाण बुद्धी गहाण पडण्याची मालिका अखंडपणे भारतात आजही सुरु आहे. निसर्गचमत्कारातून आलेल्या देवांची रूपे पासून महिलांचे केशकर्तन करणाऱ्या माकडमाणूस पर्यंत... हा मंकीमॅन सापडला नाही तरी नंतर मनकीबात ची जाहिरात वाढलीच ! गोशाला-गोभक्ती, गोमांस यावर अक्कलचे वांदे करुन, संशयावरून माणसे माणसांचे मुडदे पाडू लागले. गाईला माता आणि बाईला भाजता अशी विचित्रता सरेआम झालीय. आणि आत्ता पोरंचौर्य टोळी...मग पुन्हा मरणं...  पुन्हा तेच. समाज सातत्याने दाबलेला, वंचित,पीड़ित भयप्रदच राहून विकास कुठे हरवला हा प्रश्‍न विचारू नये म्हणून अशा जीवघेण्या अफवांची द्युतक्रीडा सुरुय.
    पावसाळा सुपिकतेची नांदी घेउन येतो. शेतशिवारात, रानावनांत, मनातही सृजन, सर्जनाचा खेळ सुरू होतो... पण या पावसाच्या सुरूवातीलाच अफवांच्या भरतीला ऊधाण आले. राईपाडा, धुळे येथल्या डवरीगोसावी समाजातील 5 जणांची जमावानं निर्घृण हत्या केली. ’मुलं चोरणारी, पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे’ अशा अफवेचा हा वाईट पडसाद. मानवी मन, बुद्धी, समज, संवेदनशीलता या साऱ्या गोष्टी कोसो दूर ठेवत केवळ अफवांवरचा तत्कालीक धादांत खोटा पण पक्का विश्वास, त्याचबरोबर 
जोडीला व्यवस्थेची अल्पसंख्यांकाविरूद्धची द्वेषपूर्ण पेरणी हीच या हत्याकांडाची सरळ सोपी कारणे. अशा हत्या होताना फोटो, व्हीडीओज, पुरावे व्हायरल असताना जीव घेणाऱ्यांना जराशी भिती वाटू नये? या घटनेच्या भोवती उभ्या समुहाने मुकपणे हे सर्वमान्य करावे... म्हणजे हा पावसाळा नव्या भयप्रद घटनांची बीजे सुपिक करतोय हेच खरे! आपण सातत्याने कुणाला तरी मारलं पाहिजे ही खुनशी वृत्ती, अमानवीय मानसिकता जोमाने घट्ट रूजते आहे. गोमांसाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला हा भयप्रद प्रवाह अख्लाक, पहलू, मोहसीन पासून केवळ घोड्यावर बसला म्हणून, आंबेडकरांचे गाणे वाजवले म्हणून किंवा विहीरीत आंघोळ केली म्हणून हत्या होण्यापर्यंत सुरूच आहे. माध्यमे आणि व्यवस्था यांच्यातील तीव्र समरसता, अल्पसंख्यांक, शोषीत सर्वहारा वर्गाला अधिकाधिक वंचित करत आता जगण्यापासूनही वंचित करताहेत. मारेकऱ्यांना पाठीशी घालणारे बहुमत, समुहा-समुहात अधिक तिखटपणे वाढलेला दुरावा दिवसेंदिवस अशा घटनांना सुफल वातावरण देत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली देशाच्या राजधानीत अकराजणांची आत्महत्या आणि धर्माचा रंग लावत रंगवलेली मंदसौर मधली चिमुरडीच्या बलात्काराची घटना, अस्वस्थपणाच्याही चिंधड्या होतील असा विखारी-विषारी प्रचार अफवांनी सुरूच ठेवला आहे. मंदसौर घटनेचे अपराधी नावासकट सापडतात. पण त्यापूर्वी जुन्या फोटो पेस्टींगच्या व्हायरल अफवांनी निष्पाप तरूणांना केवळ मुस्लिम म्हणून अपराधीत्व सहन करून, देशभरातल्या धार्मिक उन्मादाची भूक भागविली जाते. या सगळ्यांना तुकड्यांना जोडत लोकलशी मुंबैकरांच नातं जीवनमरणाचं नातं यात ब्रीज कोसळून मरणं येत. कधी खड्ड्यात पडून!
    उरली संवेदना जपून कुठल्या मयतांना श्रद्धांजली द्यायची? मारले गेले ते सगळे भारतीय. मग् अफवेने असो की ब्रीज अपघाताने... उरली संवेदना जपून यांना श्रद्धांजली द्यायची मनोमन, तरी शुद्धमनांमध्ये शंकेच वादळ घोंघावतय... माणूस म्हणून, नागरिक म्हणून असणारी सहनशीलता, प्रेम नष्ट करण्याचं अलिकडे अपडेट झालेलं हे मुनवादी सॉफ्टवेअर तितक्याच सॉफ्टली, रितसर एकेक फाईल ओपन करत, प्रोग्राम लॉन्च करत आहेत. मानवतेच्या बाजूने असणारे सगळे आपण केवळ ’व्हायरस’ ठरत आहोत, तात्पुरते!! ऍन्टीव्हायरस म्हणून की काय डॉ. रिचा जैन यांच्या बोकड निर्यातबंदीची पोस्ट, बातमी सहेतुक पेरली जाते आणि उतावीळ प्रतिक्रियांचा खचाखच ढीग पुन्हा एक अल्पसंख्य समाजाविरूद्ध तीव्रतेने पडत जातो. पुन्हा मांसाहार- शाकाहार यावर वैज्ञानिक चर्चा घडविल्या जातात. लिहिते- बोलते, बांधव- बहिणींची एकमेकांवर चिखलफेक होते. सर्वांगानी उकल होते... आणि छोट्या छोट्या जातसमुह, अल्पसंख्य जमातींच्या बंदिस्त वर्गीकरण सुरू होतं...
    ख्रिश्‍चनांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागाविषयी पद्धतशीरपणे विधान करून, त्यालाही तुफानी चर्चेला वेग आणला जातो. त्यावर झाडाझडती घडत राहते. एकूण कार्य अनेकविध जातीधर्मांच्या मुद्यावर प्रत्येक धर्मजातीला धर्मप्रीयतेकडे ओढून आणायचं. प्रत्येकाची धर्मवाटणीचा कंपू पक्का तयार करायचा, भावनिक अस्मिता, तात्पुरती कट्टरता, अंधभक्ती या गोष्टीत विशेषत: तरूणांनी गुरफटून घ्यायचं... मग विकास, ’2020 महासत्ता’ कलामांचे स्वप्न, किंवा कालाधन, अच्छे दिन यांची विस्मृती.
    गर्दीला चेहरा नसतो असे म्हणून नामानिराळे होण्यापेक्षा अलीकडे गर्दीला जात असते, धर्म असतो असे म्हणणे रास्त... पण गर्दी जेव्हा समतेची शिकवण देत वाळवंटात, चंद्रभागोतिरी जाणारी असेल, तिथे पुन्हा ’मनु’चं मोठा अशी घोकंपट्टी उधळली जात असेल तर...
    राईनपाड्याच्या भटक्या जातीतल्या, भाकरी शोधणाऱ्या जीवांची हत्या करणाऱ्या समुहाची भित्री-द्वेषी जात ही प्रस्थापित व्यवस्थेन निर्माण केलेली जात आहे तर...
    बलात्कारासारख्या घटनेतूनही धार्मिकतेचा कट्टर परिचय द्यावा असा प्रयत्न करणाऱ्यांची जात आहे तर...अशा जातीची नापिक मातीच व्हावी...
    यंदा पावसाळ्यात किमान यांचा येणारा 2019 साठीचा प्रोग्राम डेटा करप्ट करण्याची ताकत, मानवतेच्या बाजूने उभ्या असणाऱ्या सर्वांमध्ये येवो... भाकरीचा चंद्र प्रत्येकाला प्रेमाने लाभो...


- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
 9923030668

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget