भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर गोवंश हत्या बंदीच्या नावाने त्यांनी एक सिग्नलच दिला आणि गोरक्षक झुंडीने मग मुसलमान आणि दलितांच्या मागे लागले. एकाअर्थी सरकारने त्यांना गोरक्षेच्या नावाखाली माणसे मारायचे लायसन्सच दिल्यासारखा सगळा प्रकार. गोहत्याबंदीला धर्माचा, तसेच देशप्रेमाचा टिळा लागल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांमधील स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडी चौखूर उधळल्या असतानाच कायदा हातात घेऊन अनेकांना संशयाच्या नजरेने बघत त्यांच्यावर हल्ले करणाऱ्या झुंडींचा उदय होत आहे. त्यासाठी अनपेक्षितपणे व्हॉट्सअॅप व फेसबूकसारख्या समाजमाध्यमांचा अफवा पसरविण्यासाठी हातभार लागला आहे हे दुर्दैव! ही झुंडशाही सभ्य समाजाला किंबहुना भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाला अत्यंत घातकी आहे. त्यात अनेक निरपराधांचा बळी जात आहे. लोकशाही व कायदा अस्तित्वात असलेल्या देशात संविधानाला सार्वभौम मानून, त्या कायद्यानुसार सुव्यवस्था सांभाळण्यावर विश्वास नाही, असाच प्रकार त्यांच्या झुंडशाहीतून दिसून येतो. धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल अशा साक्री तालुक्यात राईनपाडा येथे रविवारी (१ जुलै २०१८) अशाच झुंडशाहीचे प्रत्यंतर आले. तेथे सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पाच जणांची त्या झुंडीने दगडांनी ठेचून हत्या केली. हे पाच जण म्हणजे मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय निर्माण केला गेला. या अफवेमुळे दीन महिन्यात महाराष्ट्रात १० जणांचा बळी गेला आहे. सोशल मीडियावर हा फिरत असलेल्या या अफवांमुळे १४ मारहाणीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. जगण्यासाठी कुठेही हक्काची जागा नसलेला, भटकल्याशिवाय पोट भरणारच नाही, अशा अगतिकतेत अडकलेला खूप मोठा समाज वर्षानुवर्षे जगण्यासाठी असाच अमानवीय मरण पत्करत आला आहे. त्याचे असे जगण्यासाठी मरणे थांबावे म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे चित्र तयार करण्यात येत असले तरी ते थांबलेले नाही. भटक्या समाजातील ४० टक्के व्यक्ती आजही अशी भटकंती करीत भिक्षा मागत जीवन जगताहेत, असे या क्षेत्रातल्या अभ्यासकांकडची आकडेवारी सांगते. हे सत्य असेल तर स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सर्वच राज्यकत्र्यांचे हे अपयश आहे. केवळ सरकारचेच नव्हे, माणूस म्हणून स्वत:ला संवेदनशील म्हणवून घेणाऱ्या, विवेकी म्हटल्या जाणाऱ्या सर्वच समाज घटकांचे हे अपयश आहे. धुळ्यात ही अमानुष घटना घडली, त्याच दिवशी मालेगावातही मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा उठली आणि परभणीहून आलेल्या दोघांना जमावाने भीषण मारहाण केली. मालेगावात जमाव इतका अनावर झाला होता, की पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा पोलिसांची व्हॅन उलटवून देण्यापर्यंत जमावाची मजल गेली. संतप्त पाच ते सहा हजाराच्या जमावाचा रोष पत्करत स्वत:च्या घराची नासधूस तसेच दगडांचा मारा सहन करत तब्बल दोन ते अडीच तास जमावाच्या तावडीतून दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षाच्या मुलाची व महिला पोलिसांना सुखरूप वाचविणारे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रशीद राशनवाले यांनी हिंदू-स्लिम भाईचाऱ्यासह मानवतेचा संदेश दाखवून दिला. देशभरात अशा प्रकारे जमावाने ठेचून मारण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात त्रिपुरा, आसाम, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांत घडत आहे. अशा पद्धतीने नागरिकांनी उठून कायदा हातात घेणे आणि पोलीस यंत्रणा, न्यायालयांनी आणि प्रशासनाने बघ्याची भूमिका घेणे हे देशातील सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत गंभीर आहे. कारण बहुसंख्यांक समाज मागास असलेल्या दलित, मुस्लिम महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे हे थेट कारस्थान वाटते. त्यासाठी पाकिस्तानातून दहशतवाद्यांनी यायची गरज नाही. देशातील आपलेच नागरिक समाजाच्या उतरंडीमध्ये सर्वांत खालच्या पातळीवर असलेल्या नागरिकांना मारून नष्ट करत आहेत. याची दखल घेण्याऐवजी सर्व शासन यंत्रणा आणि आपल्यासारखे नागरिकही शांतपणे त्याकडे बघतो. कधीतरी हळहळ व्यक्त करतो. ठेचून मारण्याच्या घटना आपल्यासाठी नित्याच्याच असल्याप्रमाणे आपण मागच्या पानावरून पुढे जातो. गोरक्षणाच्या नावाखाली देशाच्या काही भागांत घडलेले मारहाणीचे आणि प्रसंगी खुनाचे प्रकारही गंभीर असून, या सगळ्यालाच आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने काही पावले उचलण्याची गरज आहे; किंबहुना कोणत्याही सबबीखाली कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून जायला हवा. त्याच वेळी ‘व्हॉट्सअॅप’ असो की ‘फेसबुक’ की ‘ट्विटर’, यावरील माहितीची खातरजमा करून घेण्याबाबत लोकांचे प्रबोधन करायला हवे. जगातल्या प्रत्यक मांणसाचा जीव अनमोल आहे. सहजपणे कोणाचाही घेता येतो, यासाठी फार मोठ्या शोर्याची गरज नसते. पण गेलेला जीव परत आणण्याची ताकत असणारा व्यक्ती किंवा कुठलीही शक्ती जगात अस्तित्वात नाही, हे झुंडीने हल्ला करणाऱ्या भेकडांच्या कसे लक्षात येणार? त्यासाठी समाजसेवक अब्दुल रशीद राशनवाले यांच्याकडून बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनीही घ्यायला हवा.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)
Post a Comment