Halloween Costume ideas 2015

समस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल

जमाअत-ए- इस्लामी हिंदची पार्श्‍वभूमी

कुव्वते फिक्रो अमल पहले फना होती है,
तब किसी कौम के शौकत का जवाल आता है

सहाव्या शतकामध्ये अरबस्थानातील मक्का शहर म्हणजे एक मोठी बाजारपेठ होती. तेथे एक काबागृह होते. ज्यात 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक कबिल्याची एक देवता होती. रोज एक कबिल्याचे लोक काबागृहात येवून आपल्या कुलदैवतीची पूजा करत. त्यांच्याकडून बकऱ्यापासून ते ऊंटापर्यंतचे रोज बळी दिल्या जायचे. मक्काच्या लोकांची जनावरे विकली जायची. मोफत मांस खायला मिळायचे. या कबिल्याचे लोक जेंव्हा मक्केत यायचे तेंव्हा भरपूर खरेदी करायचे. या उलाढालीतून मक्काची अर्थव्यवस्था वर्षागणिक सुदृढ व्हायची. सर्व काही सुरळीत चालू असतांना अचानक एका दिवशी त्यांच्यातील बनी हाशम कबिल्यातील एका तरूणाने गार-ए-हिरामधून बाहेर येऊन सबाची टेकडी गाठली व घोषणा केली की, ’ईश्‍वर एक आहे त्याचे नाव अल्लाह आहे. मी त्याचा प्रेषित (संदेश देणारा) आहे. मला जिब्राईल अलै. नावाच्या एका देवदूताने हा संदेश दिला आहे की यापुढे जगात मी दिलेला संदेश हाच अंतिम संदेश मानला जाईल व कयामत पर्यंत याच संदेशाप्रमाणे लोकांना जगावे लागेल. जे माझे म्हणणे मान्य करतील ते आपल्या या जीवनातही यशस्वी होतील व मृत्यू नंतरच्या जीवनातही यशस्वी होतील.’
    झाले! या घोषणेनंतर मक्कामध्ये एक सामाजिक भुकंप झाला. काही लोकांनी हजरत मुहम्मद सल्ल. वर तात्काळ विश्‍वास ठेवला मात्र बहुसंख्यांकांनी त्यांच्या ’एक ईश्‍वर’च्या संदेशाचा विरोध केला. हळू-हळू प्रेषित सल्ल. यांच्यावर नवीन-नवीन आयतींचा नुजूल (अवतरण) सुरू झाला व एक-एक गोष्ट हराम (निषिद्ध) होत गेली. दारू निषिद्ध झाली, व्याज निषिद्ध झाले, काय करावे व काय करू नये?, काय खावे, काय खाऊ नये? पासून तर काय चांगले काय वाईट, इथपर्यंतची एक आचार संहिताच प्रेषितांंनी लोकांसमोर मांडली. महिलांचे मोकळे (विनापरदा) फिरणे निषिद्ध झाले. थोडक्यात मानवी जीवनाला कलंकित करणाऱ्या सर्व गोष्टी निषिद्ध होत गेल्या. त्यांच्या या संदेशाची गोडी सदप्रवृत्तीच्या लोकांना लागू लागली व त्यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
    सुरूवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मक्काच्या प्रस्थापितांना फार काळ दुर्लक्ष करणे परवडले नाही. जस-जशी प्रेषित सल्ल. यांच्याकडे लोकांची रीघ वाढू लागली तस-तशी मक्काची अर्थव्यवस्था ढासळू लागली. ऐकेश्‍ववादी व अनेकेश्‍वरवादी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. म्हणून सर्व कबिल्यांची एक संयुक्त  बैठक झाली व त्यात असे ठरले की प्रत्येक कबिल्याचा प्रतिनिधी असलेल्या सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ अबु तालीब (प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलते) यांचेकडे जाईल व त्यांच्या समक्ष आपले म्हणणे सादर करील. जेणेकरून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना त्यांच्या मिशनपासून रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विश्‍वास होता की जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे प्रेषित सल्ल. यांचे लालन-पालन त्यांचे चुलते अबु तालिब यांनीच केले होते. प्रेषित सल्ल. त्यांचे म्हणणे कधीच टळणार नाहीत.
    ठरल्याप्रमाणे मक्कातील सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ संयुक्तरित्या अबु तालीब यांच्या भेटीला गेले व त्यांच्यासमोर कथन केले की, ”तुमचा पुतण्या मुहम्मद सल्ल. यांनी हे काय चालवले आहे? ते ईश्‍वर एक असल्याचे सांगत आहेत. स्वतःला प्रेषित म्हणून घेत आहेत. त्यांच्या कच्छपी लागून मक्कातील अनेक लोक धर्मभ्रष्ट होत आहेत. त्यांच्या या संदेशामुळे घरा-घरात भांडणे लागलेली आहेत. अनेक लोक आपल्या कुलदैवतांचा इन्कार करत आहेत. त्यामुळे मक्कामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटत आहे. असेच सुरू राहिले तर आपली अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. तुम्हाला माहित आहे की, आपल्या कमाईचे प्रमुख स्त्रोत काबागृह आहे. आपल्या पुतण्याने त्याचाच विरोध सुरू केला आहे. हे असेच सुरू राहणे आपल्याला परवडणारे नाही. तुम्ही त्यांना आवरा नसता आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
    अबु तालीब एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. पण सर्व काबिल्यांचे मिळून एक संयुक्त प्रतिनिधीमंडळ आल्याने त्यांचाही नाईलाज झाला. त्यांना काही बोलता आले नाही. त्यांनी सरळ प्रेषित सल्ल. यांना बोलावून घेतले व प्रतिनिधी मंडळाची थेट भेट घालून दिली. प्रतिनिधी मंडळाने त्यांच्या समोर तीन मुद्दे ठेवले.
1. तुम्हाला आम्ही आपला सरदार माणण्यास तयार आहोत. 2. तुम्हाला जर पैसा हवा असेल तर आम्ही सर्वजण तुम्हाला एवढे धन देवू की तुम्ही अरबमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल. 3. तुम्हाला कुठली स्त्री हवी असेल तर आमच्या कबिल्यातील कोणत्याही स्त्रीयांशी लग्न करू शकाल. आम्ही त्यांना तुमच्या स्वाधीन करू पण तुम्ही ईश्‍वर एक आहे आणि तुम्ही त्याचे प्रेषित आहात असे म्हणणे सोडून द्या. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ” माझ्या एका हातात चंद्र आणि दुसऱ्या हातात सूर्य जरी दिला तरी मी माझ्या मिशनपासून ढळणार नाही. कारण मी जो संदेश देतोय तो माझ्या मनाप्रमाणे देत नाही तर अल्लाहच्या आदेशानुसारच देत आहे व यातच मानवतेचे कल्याण आहे.”
    हे विवेचन यासाठी मी वाचकांसमोर मांडलेले आहे की इस्लामी व्यवस्था ही कंपाऊंडेबल (तडजोडी योग्य) नाही. हे वाचकांच्या लक्षात यावे. ही व्यवस्था व्यक्तीगत व सामुहिक जीवनात अंगिकारल्याशिवाय मानवी कल्याण शक्य नाही. इस्लामच्या या मूळ शिकवणीचा भारतीय मुस्लिमांना विसर पडलेला आहे. शुद्ध इस्लामी व्यवस्थेचे जे महत्व जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांच्या लक्षात 20 व्या शतकाच्या सुरूवातीला आले होते ते आजही बहुतेक मुस्लिमांच्या लक्षात आलेले नाही. म्हणून कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या इबादतींनाच भारतीय मुस्लिम इस्लाम समजतो. निःसंशय ह्या पाचही बाबी इस्लामी व्यवस्थेच्या मुलभूत बाबी आहेत. पण इस्लाम इथेच संपत नाही तर या बाबीचा अंगिकार करून एक आदर्श समाजाची रचना करावी, समाजात चालू असलेल्या कुरीती संपवाव्यात, त्यांच्या जागी सुरीतींची प्रतिष्ठापणा करावी, वाईट गोष्टींचे उच्चाटण करावे व चांगल्या गोष्टी रूजवाव्यात, जेणेकरून एक नीतिमान समाज निर्माण होईल. हा इस्लामचा मूळ उद्देश आहे. यालाच कुरआनने ’अम्रबिल माअरूफ व नही अनिल मुनकर’ म्हटलेले आहे.
    हे काम कठीण आहे म्हणून साधारणपणे मुस्लिम समाज वर नमूद पाच तुलनेने सोप्या गोष्टींचेच पालन करतो. यामुळे इस्लाम ही फक्त त्यांची धारणा बनलेली आहे, श्रद्धा नव्हे. श्रद्धा असती तर त्यांनी कुरआन समजून घेऊन त्यानुसार आचरण केले असते. लग्न साध्या पद्धतीने केले असते, व्याज सोडून दिले असते, अश्‍लीलतेपासून दूर राहिले असते, दारूचा त्याग केला असता. इस्लामचा संदेश आपल्या देशबांधवांपासून लपवून ठेवला नसता. आपल्या वाणी, लेखीन आणि आचरणातून इस्लामचे कल्याणकारी रूप देशबांधवांसमोर मांडले असते. जमाअते इस्लामीच्या स्थापनेमागे इस्लामची स्थापना (अकामते दीन) हाच उद्देश होता. भारतीय मुस्लिम हे करण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून बहुसंख्य बांधवामध्ये मुस्लिमांबद्दल ठीक तसाच तिरस्कार निर्माण झालेला आहे जसा सातव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. ) आणि त्यांच्या सोबत्यां (सहाबा रजि.) बद्दल सुरूवातीच्या काळात निर्माण झाला होता. जोपर्यंत मुस्लिम म्हणून आपण अल्लाहचा संदेश देशबांधवांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहचविणार नाही व त्याचे लाभ त्यांना ’याची देही याची डोळा’ दाखवून देणार नाही, त्यांचा तिरस्कार सहन करूनही त्यांच्यावर प्रेम करणार नाही, त्यांच्या हितासाठी यथाशक्ती निरंतर प्रयत्न करणार नाही, त्यांच्या हिंसक तिरस्काराचे उत्तर अहिंसक प्रेमाने देणार नाही तोपर्यंत ते आपल्याला एक प्रतिस्पर्धी धार्मिक गटच नव्हे तर शत्रू स्थानी समजतील व मुस्लिमांचे अधिकाधिक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.
    आज 21 व्या शतकातही आपल्या समोर परिस्थिती तशीच आहे जशी सातव्या शतकात प्रेषित (सल्ल.) व त्यांच्या सहाबा (रजि.) समोर होती. ज्याप्रमाणे त्या काळातही बहुसंख्यांक लोकांकडून अल्पसंख्यांक मुस्लिमांची मॉबलिंचिंग केली जात होती तशीच आजही केली जात आहे.
    अशा परिस्थितीही सब्र (संयम) ठेऊन, बहुसंख्यांकाडून होणारे अत्याचार सहन करूनही, प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या विषयी करूणा बाळगून त्यांना सत्यमार्ग दाखविला होता. अनेक सहाबा रजि. यांची शहादत पचवून, पावलो-पावली होणारा तिरस्कार सहन करूनही आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांनी जसे मक्काच्या बिगर मुस्लिमांवर प्रेम केले होते, तसेच प्रेम आपल्याला आपल्या देशातील बहुसंख्य बांधवावर करावे लागेल. त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या प्रती करूणेचा भाव मनात ठेवावा लागेल. त्यांच्याशी सामाजिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. त्यांच्या सुख-दुःखात फक्त सामिल होऊनच चालणार नाही तर त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी झटावे लागेल. फक्त मुस्लिम समाजाच्या कल्याणाची नव्हे तर समस्त भारतीय समाजाच्या कल्याणाची चिंता करावी लागेल. या खऱ्या इस्लामी अख्लाकचा परिचय मुस्लिम्मेतरांना करून द्यावा या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामीच स्थापना करण्यात आली. एवढा व्यापक विचार साधारणपणे कुठल्याच मुस्लिम संस्थे, संघटनेकडून व्यक्त केला जात नाही. केला गेला तरी अमलात आणला जात नाही. हाच फरक इतर मुस्लिम संघटना आणि जमाअते इस्लामी हिंदमध्ये आहे.
    जमाअते इस्लामी हिंद आपल्या स्थापनेपासूनच बहुसंख्य बांधवांशी आपले संंबंध टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जमाअतचे विचार प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मूळ शिकवणीवर आधारित आहेत. ज्यात कृष्णवर्णीय आदिवासी ह.बिलाल रजि. यांनाही तेवढेच महत्व आहे जेवढे कुलीन हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना आहे. ह्याच समतेच्या विचारसरणीला देशबांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी जमाअते इस्लामी आपल्या स्थापनेपासून प्रयत्नशील आहे. जमाअतची रचना व कार्य या संबंधी माहिती इन्शाअल्लाह पुढील अंकी समजून घेऊ. (क्रमशः)

 
- एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget