अॅड. गाजीयोद्दीन रिसर्चतर्फे पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा
सोलापूर (शोधन सेवा)‘गुजरात फाईल्स’सारखे पुस्तक इतर देशात प्रकाशित झाले असते तर तेथील सरकार कोसळले असते. या पुस्तकातून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातेत केलेल्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश केलेला आहे. आता जबाबदारी तुमची आहे. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त, धाडसी आणि खोजी पत्रकार व लेखिका राणा अय्यूब यांनी उपस्थितांना केले. आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
सोलापूर येथील अॅड़ गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने राणा अय्यूब लिखित ‘गुजरात फाईल्स-अॅनाटॉमी ऑफ ए कव्हरअप’ या पुस्तकाच्या -(उर्वरित वृत्त पान 7 वर)
मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन शिवछत्रपती रंगभवन येथे 16 जुलै रोजी संध्याकाळी करण्यात आले. याप्रसंगी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, साम टीव्हीचे संपादक संजय आवटे, या पुस्तकाचे अनुवादक दीपक बोरगावे, सनय प्रकाशनचे शिवाजी शिंदे, डॉ. मिलिंद कसबे, शोधनचे माजी संपादक सय्यद इफ्तेखार अहेमद, अली इनामदार, शब्बीर अत्तार, स्तंभलेखक एम. आय. शेख, महेबूब काझी आदी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये की या कार्यक्रमाचा प्रारंभ संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून झाला. प्रा. युसूफ बेन्नूर यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
राणा अय्यूब पुढे म्हणाल्या, 2010 साली मी केलेल्या रिपोर्टिंगमुळे अमित शहा यांना अटक झाली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. माझे मित्र अॅड़ शाहीद आझमी खोट्या आरोपाखाली पकडलेल्या माणसांसाठी लढत होते. एकेदिवशी दिल्ली येथे गुजरातमध्ये पकडलेल्या निर्दोष तरुणाच्या खटल्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याचा खून झाला. तो दिवस मला हादरवून टाकणारा होता. मी गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. संघाच्या विचारांशी बांधिल असलेली एक अमेरिकन फिल्ममेकर मैथिली त्यागी बनून स्टिंग ऑपरेशन सुरु केले. अंगावर विविध ठिकाणी आठ कॅमेरे लावून अधिकारी, राजकीय नेते यांच्यासोबत संवाद साधला.
दिवसभर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ रात्री डाऊनलोड करून ठेवायचे. दोन महिने सतत मला पहाटे सहा वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. रात्री अचानक दरवाजावर खटखट होईल का, याची कायम भीती असायची. हे काम सुरु असताना एकेदिवशी मोदींकडून निरोप आला.
एक परदेशी फिल्ममेकर गुजरातमध्ये आली पण मला भेटली नाही, असे त्यांना वाटले. कारण परदेशी लोकांनी केलेले कौतुक मोदींना फार आवडते. मी त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या टेबलावर बराक ओबामा यांचे पुस्तक होते. ते मला दाखवत मोदी म्हणाले, मला एक दिवस यांच्यासारखे बनायचे आहे. मला मोदींचे कौतुक वाटते. पण त्याचवेळी आपल्या असण्याची लाजही वाटते. आपण संवेदनशील असतो तर हा माणूस देशाचा पंतप्रधान झाला नसता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
16 भाषेत भाषांतर, 4 लाख प्रतींची विक्री
स्टिंग ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला, पण तो प्रकाशित करण्यास माझ्या संस्थेने आणि इतर प्रकाशकांनीही नकार दिला. अखेर मी माझे दागिने गहाण ठेवून या पुस्तकाच्या 500 प्रती प्रकाशित केल्या. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्यानंतर आपल्याकडे त्याची चर्चा सुरू झाली आणि आज परिस्थिती वेगळी आहे. 4 लाख प्रतींची विक्री झाली आहे. आता मला अनेक लोक विचारतात की, आम्ही काय करावे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका. देशात घडत असलेल्या घटनांबद्दल तुम्ही किती वेळा व्यक्त झाला आहात, याचा विचार करा. तुम्ही असेच राहिला तर 2019 मध्ये तेच निवडून येतील. या पुस्तकाच्या रूपाने सत्य सर्वांच्या समोर येवूनसुद्धा लोक शांत आहेत. याचे आश्चर्य वाटते. माझी जी जबाबदारी होती ती मी पूर्ण केली. आता लोकशाहीच्या लढाईची जबाबदारी तुमची आहे. विवेकबुद्धी जागवा, एकत्र या, संघटित व्हा आणि लोकशाहीची लढाई लढा असेही आवाहनही राना अय्युब यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील म्हणाले, 2002 मध्ये गुजरात दंगलीचे पत्रकार राणा अय्युब यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री व सध्याचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना तुरूंगात जावे लागले. आता या स्टिंग ऑपरेशनचे पुराव्यासहित पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुरूंगात जावे लागेल; परंतु यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. मोदी आणि शहांनी गुजरातमध्ये गोंधळ घातला. 2002 च्या गुजरात दंगलीने लोकशाहीच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने प्रामाणिकपणे काम करण्याची सध्या गरज आहे. याबाबत मात्र शंका वाटते, अशी चिंताही कोळसे पाटील यांनी व्यक्त केली.
संविधानाला वाचविण्याची गरज..
सध्या देशात 24 तास खोटे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि न्यायव्यवस्था सर्व त्यांच्या हातात आहेत. जन्मलो म्हणजे एक दिवस मरण ठरले आहे. त्यासाठी घाबरू नका. संविधानाला वाचवण्याची आज गरज आहे. सध्या समाजात विष पेरले जात आहे. याला विरोध करायचा असेल तर एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे, असेही कोळसे-पाटील म्हणाले.
यावेळी साम टीव्हीचे संपादक संजय आवटे म्हणाले, राणा अय्युब यांचे कार्य ऐतिहासिक आहे. इतिहासात अशा प्रकारची पत्रकारिता कोणी केली नाही. सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जात आहे. राणा यांनी लढा दिला. आता तुम्ही काय करणार हे महत्त्वाचे आहे. राणा यांना युनोने सर्वोत्कृष्ट शोधपत्रकारितेचा पुरस्कार दिला. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. राना अय्युब या महाराष्ट्रातल्या आहेत. सगळ्या जगात त्यांचे स्वागत होत आहे, कार्यक्रम होत आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांचा पुस्तक प्रकाशनाचा एवढा मोठा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे आवटे म्हणाले. आवटे यांनी 1925 ते 2014 पर्यंतच्या मनुवाद्यांच्या इतिहासाचा पाढा वाचला. त्यांच्या वाटचालीचा इतिहास आपल्या भाषणातून त्यांनी समोर आणला. शेतकरी, मजूर, व्यापारी, सामान्य नागरिक सगळ्यांचे हाल करून सोडले आहेत. मात्र सरकार मजेत चालले आहे. घटनेला वाचवायचे असेल तर सत्तांतर आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभही दबावाखाली वावरत आहे. त्यामुळे राना अय्युब यांनी गुजरात फाईल्सद्वारे मोदी आणि शहांच्या कार्यकाळातील कृष्णकृत्यांचा रहस्यभेद जीवावर उदार होवून तुम्हा- आम्हाला सत्य माहिती दिल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलीम अजीम यांनी केले. सूत्रसंचलन ’सविनय अस्वस्थ’ या सध्या गाजत असलेल्या कविता संग्रहाचे लेखक कवि साहिल शेख यांनी केले. आभार राम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाजोयोद्दीन सेंटरचे अध्यक्ष समीउल्लाह शेख, अॅड. मेहबूब कोथिंबिरे, सरफराज शेख,राम गायकवाड, बशीर शेख, फारुख तांबोळी, समीर इनामदार, हमीद शेख, दानिश कुरेशी, वायज सय्यद, आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment