Halloween Costume ideas 2015

आपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पारनेरकर

लातूर (शोधन सेवा) - सध्याचे शिक्षण हे एकांगी आणि भौतीकतेकडे झुकलेले आहे. या शिक्षण पध्दतीतून मानवी जीवनाचा नेमका उद्देश काय आहे, हे शिकवले जात नाही. त्यामुळे आजच्या शिक्षण पध्दतीतून माणूस न घडता जॉबधारक तयार होत आहेत. भारतीय संस्कृती टिकुन राहण्यासाठी आपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षण व माणुस घडवणार्‍या महाविद्यालयांची गरज आहे. माणसाला माणूस बनायचे असेल तर त्याने कुरआनचे अभ्यासपूर्ण अध्ययन करावे असे आवानही, वारकरी सांप्रदाय व इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांनी येथे व्यक्त केले.
       लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय आणि जमात-ए-इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ईद मिलन’ कार्यक्रम शनिवार, 23 जून रोजी घेण्यात आला. यावेळी ’मानवी मुल्य, सामाजिक एकोपा व धर्म’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. सय्यद रफीक पारनेरकर बोलत होते. मंचावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सरिता मंत्री, जमाअतचे शहराध्यक्ष अबरार मोहसीन, सय्यद यास्मीन उपस्थित होते. कार्यक्रमी सुरूवात कुरआन पठणाने मुफ्ती इनामुल हक यांनी केली. तर मराठी अनुवाद सलीम शेख यांनी सांगितला.
       पुढे बोलताना डॉ. सय्यद रफिक म्हणाले, मानवी जीवनाचा उद्देश धन-संपत्ती कमावण्यापेक्षाही मोठा आहे. माणूस जन्माला येवून आपण किती सत्कर्म केले यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. मुलत: सर्वांचा ईश्‍वर एक असून अखील मानव जातीमध्ये बंधु-भावाचे नाते आहे. जात, धर्म जरी वेगळा असला तरी प्रत्येक माणसातील रक्त हे एक आहे. त्यामुळेच जात-धर्माची सिमा ओलांडून रक्त हे त्याचे काम करीत असते. जात-धर्मावर आरोग्यशास्त्र ठरत नसून सर्व मानव जातीचे आरोग्यशास्त्र एकच आहे.
    आज समाजात चंगळवाद मोठया प्रमाणात वाढलेला आहे. प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. लोक पैसा आणि धनसंपत्ती सर्वस्व मानत आहेत. मात्र ज्याच्या जीवनाचा उद्देश चंगळवाद असेल तर सर्व अर्थहिन आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांकडून मोठया प्रमाणात रुग्णांची लुट सुरु आहे. रुग्णास अडचणीत पकडून डॉक्टर अनावश्यक उपचार व शस्त्रक्रिया करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे खरे सेवेचे क्षेत्र मानले जाते. रुग्ण सेवेतून आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची ही खरी संधी असते. याचा विसर वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना पडलेला आहे.
    जग हे अथांग पसरलेले असून त्याचा समतोल राखण्याचे काम ईश्‍वर करीत असतो. जन्माला येवून सर्वांना परत जायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन चांगल्या कार्यासाठी खर्ची केले पाहिजे. सेवा करणारा व लुटणारा यांचा अंतिम परिणाम सारखा येत नाही, ही कुरआनची शिकवण आहे. आदर्श जीवन कसे असावे हे रोजा व कुराण मधुन शिकण्यास मिळते, असेही डॉ. पारनेरकर म्हणाले.
    यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. सरिता मंत्री म्हणाल्या, ईश्‍वराने स्त्री-पुरुष या दोन जाती निर्माण केल्या आहेत. पुढे कालओघात मानवी समाजावर अनेक आवरणे चढत गेली आणि माणसांची जात-धर्मात विभागणी झाली. मात्र आपण सर्व मुळता एकच आहोत. जात, धर्म व वंशाच्या नावाखाली वाद घडवले जात आहेत. यामुळे सामाजिक प्रदुषण वाढलेले आहे. याचा परिनाम मनावर होत असल्याने व्देष भावना वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
    प्रास्ताविक अबरार मोहसीन यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. बी. डी. आडगावकर यांनी केले तर आभार मुहम्मद युनूस पटेल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय व माईर्स एमआयटी, लातूर शिक्षण संकुलातील विविध महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget