Halloween Costume ideas 2015

निकले किसी के गम में ....

निकले किसी के गम में, वो आंसू तलाश कर,
एहसास का एक नन्हा सा जुगनू तलाश कर
जिससे महक उठे, तेरी दुनिया व आखिरत
किरदार के रविश में वो खुशबू तलाश कर

 
अशा ओळी वाचताना सरळ स्वत:ला चपराक मारून घ्यावी असे वाटते़  याचा काय अर्थ लावावा, आपल्या सापेक्ष लागलेला अर्थ आपल्या स्वत:लाच उलट तपासायला भाग पाडतो़ आपलाच आपल्याशी संवाद सुरू होतो़ जागतिकीकरणाच्या प्रचंड वेगवान जगता संवादाची साधने वाढली तरी संवाद-सुसंवाद कितीसा होतो? संवाद हरवलाच आणि संवेदनाही! या वेगवान तडाख्यात मेंदू-बुद्धीचा चेंदामेंदा करणाऱ्या भांडवली हुशार खेळाचे आपण सर्वसामान्य बळी पडलो़ वेदना सर्वत्र असल्या तरी संवेदना मात्र बधीर करण्याचा उजवाडाव सफल झाला़  भावूक आणि भावनाशील यातल्या अंतराची गोष्टच कळेनाशी झाली़ वर्तमान भवतालात काहीही कितीही अमानवी, क्रुर, भयाण घडो तरी डोळ्यांत टिपूस थेंब पाझरणे दुर्मिळ झाले़ अगदी परवाच्या पिडीत बालीकेची बातमी वाचताना - ऐकताना तंदूरी चिकनच्या टेस्टवर आपली कल्चरल मिजासी मारणारे मित्र मग नकोसे वाटतात़
    गल्लीतली एखादी व्यक्ती मयत झाली की दु:खाचा पाझर गल्ली मोहल्यातल्या प्रत्येक घराला फुटायचा़ रेडीओ, ट़िव्ही़ बंद, चूल ही बंद असायची़ आता असे चित्र दिसते का ग्रामीण भागातून? उत्तर नाही़ शेजारच्या सुख:दुखात सहभाग आणि गोतावळ्यातला उमाळा आटलायच़  आजकाल मेलेली व्यक्ती कोणत्या जातीची, पंथाची, गटाची, धर्माची याच्या चर्चेने दु:ख बाजूला सरत!
    पाळणाघर ते वृद्धाश्रम हा प्रवास याच कोलाहलातला! आर्थिक कारणांनी स्वकेंद्री बनलेली माणूसघाणी संकुचित मानसिकता, जात, धर्म अस्मितांचे घट्ट होत जाणारे उदात्तीकरण, मानवता संपली की काय? हा भेसूर प्रश्‍नच समोर सैतानासारखा उभा़ पण हा सैतान निर्माण करण्याच कार्य इथल्या जातीवादी, द्वेषमुलक संघ- संघटनांनी अगदी भूतकाळापासून केलय़़ त्याचं आज वर्तमानात हे भयावह क्रौर्य दिसतंय!
     सरंजामी व्यवस्थेला बळकटीच देईल अशा प्रतिमा, प्रतिके, मुद्दे, इतिहास धर्मसंस्था, शिक्षण, उद्योग-सांस्कृतिकता यांना सातत्याने चालना देत़ दलित मुस्लिम यांना अधिकाधिक भ्रामक जगात घुमवित राहण्याचे षडयंत्र भारी रचले गेले, रचले जात आहेत़ द्वेषांचे मनोरे आणि धर्मभावनिकतेचा अवास्तव गाजावाजा करत सत्तेच्या पोळीवर ताव मारण्याचा जिनिअस भंपकपणा आजही सुरूच आहे़ सर्वसामान्यांच्या संवेदनशीलतेलाच नष्ट करून, नसलेल्या वेदनांवर व्यक्त होण्यास इथली व्यवस्था भाग पाडते आहे़ धार्मिक धु्रवीकरणाचे भावनिक मुद्दे, त्यावर कशाही प्रकारे संवेदना व्यक्त करणारे सर्व़़ मूळ मुद्दा रोजी रोटी आणि शांततेचा, तो मात्र दुर्लक्षित! ‘विकास’, ‘प्रगती’च्या फेकू गप्पांत विशेष वर्गसमूह, धर्मसमुह सातत्याने पददलीत, उपरा ठरवण्याचे सर्वतोपरी यंत्रणा कार्यरत आहेत़
     बांधावरच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर डोळ्यात वेदनांनी पाणी येत न येत तोच पाणी फाऊंडेशनच्या सत्कार्याचा सुसाट सुकाळ येतो़ आज परिश्रमपूर्वक आनंद पेरणारा ‘आमिरखान’ कालापावेतो द्वेषपात्र देशद्रोही होता़ भिंती, छावण्या उभ्या करायच्या, पाडायच्या, पुन्हा घट्ट करायच्या, त्यावर सामान्य नागरिकांशी सायकॉलजीकली खेळायचं वा!!
    आण्णांपासून... अटकेत असणाऱ्या बाबाबुवांची खोगीरभरती गेल्या पाच सात वर्षात वर आणि राजकीय अध्यात्म, अध्यात्मीक राजकारणांचं रूप घेत़़ बहुरूपींनी इथल्या नागरिकांच्या भक्ती श्रद्धेची टवाळीच केली़ श्रद्धेची चेष्टा करत संवेदना संपवलीय. गॅस सब्सिडीपासून खोट्या इतिहासापर्यंतचे धादांत बेफिकीर दाखले, कोट्यावधी खर्च करणाऱ्या फकिराने दिले आणि पुन्हा भक्तगण भाऊक झाले़ ही नाटकी खोटी संवेदनशीलता! विचारवंताच्या हत्या, सत्यावर होणारे भ्याड हल्ले, दंगलीच्या निमित्ताने होणारे प्राथमिक आणि नंतर असे मनांचे विभाजन, हे असह्य आणि प्रचंड दुरावा करणारे ठरत गेले़
    शैक्षणिक बदलांच्या धाडसी निर्णयांपासून, छद्मी इतिहासाच्या मांडणीपर्यंत, तसेच सांस्कृतिक हस्तक्षेप करताना अघोषित आणीबाणीची चर्चा व्हावी असाही व्यवस्थेचाच पूरक मार्ग!  ‘काला’या सिनेमावर होणारी सकारात्मक-नकारात्मक चर्चा ते ‘संजू’तून कलात्मक पद्धतीने देशभक्तीची मांडणी़ रजनीकांतच्या ऐवजी आमिरने केला असता सिनेमा किंवा ‘संजू’ ऐवजी ‘माय नेम इज खान’ चा शाहरूख असता त्यात तर? केवळं भारतीय म्हणून ताठ मानेने जगता यावं वाईट-असत्याशी झगडा करताना, व्यवस्था परिवर्तनासाठी संघर्ष करताना प्रामाणिकपणे उभ्या ठाकणाऱ्या मूठभर लोकांच्या मध्येही महापुरूषांची वाटणी घालूऩ़ नवी मुल्ये निर्माण करण्याच्या गोबेल्सखेळात सत्तापिपासू तज्ञ आहेत़ 
    त्यामुळेच प्रियंका, निर्भया, दिव्या, आसिफा, संस्कृती मंदसौर मधील इथल्या अमानवी घटनांवर देखील आज मानवी संवेदनाच्या पातळीवर कुणीच बोलत नाहीत़ कॅन्डल मोर्चाला कितीही सकारात्मक घेतलं तरी ही रांग अशीच चालू राहीली की काय अशी भितीही दृढ वाटते़ शासक व भांडवलदार वर्गधर्म समुहाने सामान्यांच्या वेदनांवर भरभरून बोलायचं, म्हणून आमच्या नसलेल्या वेदनांचे सोहळे साजरे करायचे आणि मुख्य दु:खाला बगल द्यायची हा आधुनिक वसाहतीचा सुंदर मार्ग हे निर्माण करताहेत़
     निवडणुकांचे मौसम परतू लागलेत़ आता स्थलांतरित पक्षी सहिष्णूतेचे गाणे गातील, गोड काड्यांनी सुंदर घरट्याचं नवं स्वप्न दाखवतील़ पक्ष्याचे थवेच्या थवे आपला गट, आपली आघाडी तयार करतील ‘हम बुलबुले हैं इसके ये गुलीस्ताँ हमारा’ (आपल्याला) बरे वाटेल़़    आपली विचारपूस जिव्हाळ्याचे झाली की आपण भावनिक होऊन रडू... मन-मत वळेल़...  पण... आंसू जपून ठेवा, घाई नको! डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा कफिल अहमदला देवू़. 1 जुलै ला शहीद हमीदला आठवू़ आपल्याच किरदारमध्ये खरी खुशबू तलाश करू़ !- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget