ऐपतदार मंडळी लग्न वा अन्य मोठ्या समारंभाच्या वेळी हिरे आणि हिऱ्यांनी मढविलेले अलंकार मोठ्या हौसेने घालीत असतात. अलीकडच्या दशकात हिऱ्यांचे व्यवहार व आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. जगातील दहा हिऱ्यांपैकी आठ हिऱ्यांना पैलू पाडण्याचे कौशल्यपूर्ण काम भारतात होत आहे. १९६३ मध्ये पाच कोटी रुपयांची निर्यात करणारा भारतातील हिरा बाजार यावर्षी सत्तर हजार कोटी रुपयांची पैलूदार हिऱ्यांची निर्यात करू शकला आहे.व्यापारी तूट भरून काढण्यासाठी देशाच्या प्रयत्नात हिरा बाजाराची कामगिरी मोलाची ठरत आहे.विश्वास आणि संबंध यांच्या जोरावर हिऱ्यांचा अब्जावधी रकमेचा बाजार निर्विघ्न चाललेला आहे. हे देशासाठी भूषणावह आहे.काही बदमाषांनीही हिरा बाजार पोखरायला सुरूवात केलेली आहे. उदा. अदाजे पन्नास हजार रुपये कॅरेटचा फिक्कट गेरू रंगाचा हिरा रासायनिक प्रक्रिया करून पांढरा शुभ्र केला जातो व खोट्या दाखल्यांचा वापर करून थेट अडीच लाख रुपयांनी विकला जातो.अशा प्रकारची फसवणूक हिरा बाजारात नव्याने घुसलेली आहे. वास्तविक नामांकित व विश्वासू लॅबमधून दाखले मिळण्याची वैध व्यवस्था असते. परंतु स्वत:च्या बनावट लॅबमधून दाखले घेऊन ते बेमालूमपणे कमी प्रतीच्या हिऱ्यांना जोडतात. परागंदा झालेला ठकसेन नीरव मोदीयाने आपल्या मालकीच्या गीतांजली कंपनीमार्फतच असे खोटे व्यवहार केल्याचा आरोप आहे. हिऱ्यांच्या प्रयोगशाळेत अनेक चाचण्या करून उच्च किंमतीच्या हिऱ्यांसाठी प्रतवारीचे दाखले दिले जातात. परंतु ज्यांना खोटेच कर्म करावयाचे आहेत ते हिरे विक्रेते प्रतवारीचे बनावट दाखले हुबेहुब बनवून लबाडी करतात आणि अनेकपटीने पैसे कमवतात. हिरा बाजारातील ही घुसखोरी लबाडी खऱ्या हिरा पारख्यांनीच उजेडात आणावी आणि विकत घेणाऱ्यांनीही अधिक चोखंदळ व खात्रीशीर मार्गाचाअवलंब करून खरेदी करावी.
Post a Comment