Halloween Costume ideas 2015

एसटी महाराष्ट्रातील प्रवाशांची की सरकारची की संपकरी कर्मचाऱ्यांची!

खाजगी वाहतुकीचे राज्यात दररोज 40 अपघाती मृत्यू !


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने व सरकारच्या नीष्काळजीपणाने संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून आले. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते.तब्बल 54 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात निरंकुश, बेकायदेशीर खाजगी वाहतूक खुलेआम सुरू आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात रस्ते अपघातामध्ये वाढ झाली असून दररोज 40 प्रवाशांना अपघातामध्ये आपला प्राण गमवावे लागले आहेत. यावरून असे दिसून येते की एसटी संपामुळे बेकायदेशीर खाजगी वाहतूकदारांना सरकारने खुली सुट दिली की काय असे वाटत आहे. 

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात 2663 अपघात झाले. या अपघातामध्ये 1180 प्रवाशांचा मृत्यू तर 2774 प्रवासी जखमी झाले. हा आकडा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. एसटी संपामुळे काळी-पिवळी जीप,मॅक्सीकॅब,वडाप, टेम्पो-ट्रॅव्हलर, खासगी बस यांनी बेधडक खुली प्रवासी वाहतूक सुरू केली आहे आणि यावर सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याने अपघातात मोठ्या वाढ होतांना दिसत आहे. कारण या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. यामुळे रस्ता सुरक्षा नियम पायदळी तुडवून अपघात वाढतांना दिसत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सरासरी पेक्षा अधिक अपघात आणि मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.खाजगी वाहनचालक संपाचा पुर्णपणे फायदा घेत आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतुन प्रवास, वेगाने वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबने,गाडी चालवताना मोबाईलचा वापर करने, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही रस्ते अपघाताची मुख्य कारणे आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात 81 मृत्यू, नाशिकमध्ये 72 मृत्यू, पुणे 65 मृत्यू, अहमदनगरमध्ये 52 मृत्यू,, नागपूर जिल्ह्यात 44 मृत्यू ,औरंगाबादमध्ये 41 मृत्यू तर मुंबई शहरात 31 मृत्यू ह्या वाढत्या अपघातांना एसटी कर्मचाऱ्यांचा संपच कारणीभूत असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुर्णपणे हाताळण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसुन येते आणि त्यांचाच संपूर्ण फायदा खासगी वाहतूक चालत घेत आहेत.परंतु खासगी वाहतूक सुरक्षित नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. एसटी जर सुरळीत सुरू रहाल्या असत्या तर यदाकदाचित एवढे अपघात टाळता आले असते. कारण महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवाशांचा एसटी वर एवढा दृढ विश्वास आहे की अपघात नाहीच्या बरोबरीनेच असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास सुरक्षित, सुलभ, समाधानी व आनंददायी वाटतो. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी व महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या बाबतीत संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते. 

परीवहन मंत्री अनिल परब ठोस पाऊल उचलत नसल्याने ते राज्यातील प्रवाशांच्या प्रती निष्क्रीय दिसतात. त्याचप्रमाणे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे सामंजस्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप्निलष्ट बनला आहे. आता शंका आहे की परब परिवहन मंत्री आहेत की आघाडी सरकारचे परिवार मंत्री आहेत.54 दिवसात करोडो प्रवाशांचे हाल झाले आणि होत आहेत. त्याच सोबत महाराष्ट्राचे करोडो रुपयांचे नुकसान सुध्दा झाले. तरीही संपकरी कर्मचारी अडुनच आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन नामांकित पक्षांची सरकार(महाविकास आघाडी)असुनसुद्धा संपावर तोडगा निघता-निघत नाही हे महाराष्ट्रातील प्रवाशांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. आता महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न आहे की खासगी वाहतूकदारांसोबत सरकारची साठगाठ तर झाली नसेल! कारण अजूनपर्यंत लालपरीची चाके रुळावर आलेली दिसत नाहीत. त्यामुळे सरकारला आग्रहाची विनंती आहे की खासगी वाहतूकीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटीचा संप ताबडतोब संपुष्टात आणावा. 

एसटीच्या संपामुळेच रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे कारण आहे. राज्यात सुरक्षित व सुलभ प्रवास सरकारकडुन मिळत नसल्याने महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक प्रवासी अत्यंत दु:खी व चिंतेत आहे याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवाशांचे जनजीवन विस्कळित झालेले आहे. त्यामुळे जनतेसमोर प्रश्न आहे की लालपरी कोणासाठी व कुणाची! कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत.ते सरकार व एसटी महामंडळाचा प्रश्न आहे. परंतु यात संपूर्णपणे भरडल्या जात आहे सर्वसामान्य नागरिक.महाराष्ट्रातील 12 कोटी 94 लाख लोकांनी कोणते पाप केले की गेल्या दिड महिन्यांपासून त्यांचा प्रवास एसटी महामंडळाने किंवा सरकारने बंद केला. एसटी महामंडळाचा कोणताही प्रश्न असो तो सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी जर महाराष्ट्राच्या 12 कोटी 94 लाख लोकांना धारेवर धरणार असेल तर ही सरकारकडून व एसटी महामंडळाकडून महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर हत्याच म्हणावी लागेल. कारण आता एसटीच्या संपामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या नाकातोंडात पाणी शिरले आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात एसटीचा संप म्हणजे नागरिकांच्या प्रती संपकऱ्यांची मनमानीच म्हणावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाजवी असाव्यात व त्या मान्य पण व्हाव्यात यात दुमत नाही व याला माझे समर्थन सुध्दा आहे. परंतु जर संपकरी एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा गळा दाबून आपल्या मागण्यांसाठी अडुन असेल तर हे बरोबर नाही. कारण एसटीच्या संपामुळे आटोचालक, फेरीवाले,चायवाले, छोटे-मोठे व्यवसायीक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पहीला कोरोना काळ गेला, नंतर दुसरी लाट आली, आता ओमिक्रानचा प्रवेश आणि आर्थिक संकट या संपूर्ण बाबींनी महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. आता एसटीच्या संपाने त्यात भर टाकुन सर्वसामान्यांचे वाटोळे करीत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गरीब, सर्वसामान्य,आबाल वृध्द, लहान मोठे,नाती-गोती टीकवीने व विद्यार्थी या सर्वांना एकसुत्रीत बांधून ठेवण्याचे काम लालपरीने नेहमीच केले आहे. एसटीच्या या दीर्घ काळीन संपाने महाराष्ट्रातील जनतेचा मनस्ताप जास्तच वाढल्याचे दिसून येते. 

आतापर्यत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात पाठीशी उभी होती.परंतु आता संपाने सरळ सर्वसामान्यांवर उलट प्रहार केल्यामुळे सर्वच स्तरातून संपाचा निषेध होतांना दिसत आहे.कारण एसटी बंद असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त आहे, रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, कामगार-कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहन चालक यांची चांदी असल्याचे दिसून येते.सध्याच्या परीस्थितीत ट्रॅव्हल्स वाल्यांनी महाराष्ट्रातील प्रवाशांकडून खुली लुट सुरू केल्याचे दिसून येते. ह्या सर्व घटना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.हे चालय तरी काय! एसटीचा प्रवास म्हणजे 10 किंवा 20 हजार लोकांपर्यंत मर्यादित नसुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 12 कोटी 94 लाख प्रवाशी नागरिकांचा प्रश्न आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सरकारच कारणीभूत असल्याचे दिसून येते.हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट व कायदा ह्या संपूर्ण बाजु सरकार जवळ आहे.मग सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एवढा कालावधी का लावावा? सरकार ठोस निर्णय का घेत नाही? सरकारला नागरिकांच्या व्यथा दिसत नाहीत काय? सरकारने राजकारणाला जास्त महत्त्व न देता एसटी ताबडतोब सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आताही काही बिघडले नाही.एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्या सरकार सोबत बोलनी करून किंवा कायद्याच्या चाकोरीतून करायला हव्यात. यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरू नये असे मला वाटते .मी सरकार कडून व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडुन हीच अपेक्षा करतो की जास्त वेळ न लावता लालपरीला पुर्ववत करावे.यातच सर्वाचे खरे हित आहे.

- रमेश कृष्णराव लांजेवार, नागपूर

 मो. 9325105779


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget