सध्या देशाचा अमृतकाळ महोत्सव साजरा केला जात आहे. कोणत्याही देशाच्या विकासात त्या देशाची शिक्षण व्यवस्था ही अतिशय मोलाची भूमिका पार पाडत असते. शिक्षण हा शब्द कानावर पडताच प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांसमोर एक आदर्श प्रतीमा उभी राहते. तीच प्रतिमा साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले आहे. प्रस्तापित काळात शिक्षणाची दशा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 साली हंटर आयोगासमोर सर्व मुला मुलींसाठी सक्तीच्या सार्वजनिक शिक्षणाची मागणी केली. तिला तब्बल सव्वाशे वर्षांचा काळ लोटला गेला. इतक्या वर्षांत देशातील शिक्षण व्यवस्था मोजक्या बदलाने आजही गोगलगायीच्या चालीने आपले काम करत आहे. देशामधील शिक्षणाची सर्वसामान्य परिस्थिती पाहता आपण देशातील विद्यार्थ्यांना जर विचारले की भविष्यात तुला काय बनायचं? तर 90% विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, एम.बी.ए., किंवा सरकारी नोकरी या चार ते पाच क्षेत्रांमध्येच आपले करिअर करण्यासाठी पसंती देतात व मेंढ्यांप्रमाने सर्वजण एकाच दिशेने धावतात.
देशातील युवा का इतका संकुचित झालाय? नवनवीन करिअर क्षेत्रांची निवड का केली जात नाही? यामध्ये नेमका दोष कुणाचा? दोष देताना सुरुवातीला आपल्या समोर येते शिक्षणव्यवस्था. त्यातील शिक्षकांची शिकविण्याची पद्धत, परीक्षेचा आराखडा आणि अभ्यासक्रम. परंतु या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना इंजिनिअर, डॉक्टरच्या चौकटीत बांधण्यासाठी पुरेशा आहेत का? तर नाही. दोष आहे संपूर्ण इकोसिस्टिमचा. कसे ते विस्ताराने पाहू!
2021 च्या एका अहवालानुसार भारतीयांचा सरासरी पाच तास वेळ हा मोबाईलवर जातो. त्यामध्ये असते काय? तर आपला मास मीडिया हा जाणूनबुजून फक्त चार गोष्टींभोवती फिरतो. त्या म्हणजे राजकारण, खेळ, चित्रपट आणि गुन्हेगारी मग देशातील जनताही याच क्षेत्राभोवती गुरफटून जाते. सोशल मीडिया सुद्धा लोकांना त्याच गोष्टी दाखवतो ज्या ते पाहत असतात. त्यामुळे नवीन काही लोकांच्या नजरेत पडतच नाही.
मागील दोन वर्षांमध्ये काही भारतीयांनी जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा डंका वाजवला आहे. उदा. गीतांजली श्री यांना रेतसमाधी या पुस्तकासाठी मानाचा बुकर पुरस्कार मिळाला. नीना गुप्ता यांना गणित क्षेत्रातील उच्च रामानुजन पुरस्कार मिळाला. शोनक सेन यांना कान्स महोत्सवात बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार दिला गेला. 2018 साली दानिश सिद्दिकी व अदनान आबिदी यांना फोटोग्राफीसाठी अतिशय मोलाचा पुलित्झर पुरस्कार दिला गेला. परंतु आपला मीडिया या गोष्टी आपल्याला दाखवत नाही. विनाकारण आणि बिन बुडाच्या बातम्यांनी संपूर्ण चॅनल्स आणि वृत्तपत्रे भरलेले असतात. अशा अभिमानास्पद बातम्यांना एका ओळीत सांगून किंवा वृत्तपत्रात एखाद्या कोपऱ्यात चार- पाच ओळीत मांडून मोकळे होतात. सोशल मीडिया सुद्धा जाहीरातीने आणि बेचव व्हिडिओंनी लोकांचा वेळ वाया घालवण्यात एक नंबरवर आहेत.
अशा व्यवस्थेने भारतामध्ये गणितज्ज्ञ, वैज्ञानिक, डिझायनर, भूवैज्ञानिक इत्यादी कसे निर्माण होणार? ज्या बातम्या लपवल्या जातात त्या जर दाखवल्या तर जनतेच्या करिअरच्या संकुचित मानसिकतेला फाटे तरी फुटतील. ही तर झाली संपूर्ण व्यवस्थेची बाजू. याबरोबर पालकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्यापेक्षा त्यांना शिक्षणक्षेत्रातील नवीन संधीची ओळख करून द्यायला हवी. सरकारने तर शिक्षणाचा बाजार मांडला व त्याला दुय्यम स्थानी नेऊन ठेवले आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या खराब निकालांमुळे शाळेची सुधारणा करण्याऐवजी शाळाच बंद पाडत आहे.
गेल्या 75 वर्षात थोड्याफार बदलाने भारतीय शिक्षण व्यवस्था तशीच आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणात गुंतवून टाकले जाते. नवीन कौशल्य, योजना, करिअरच्या संधी याबद्दल ओळखच करून दिली जात नाही. विद्यार्थ्यांची आवड आणि क्रिएटिव्हिटी यांना दुय्यम स्थान दिले जाते. ’घोकंपट्टी करा, चांगले गुण कमवा आणि सरकारी नोकरी मिळवा’ हे सूत्र विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर बिंबवले जाते.
देशातील राजकीय नेते, उद्योगपती व अभिनेते आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठवत आहेत. का? तर त्यांनी नवीन काही शिकावे. देशातील जनतेला, युवकांना याच डबक्यात कोंडून ठेवले जाते व जाणूनबुजून त्यांच्यासाठी हे डबकेच विश्व बनवले जाते. अशा या संपूर्ण शैक्षणिक स्थितीबद्दल आपण लेखाच्या माध्यमातून थोडक्यात आढावा घेऊ शकतो. पण नवीन कौशल्य, युक्ती, संधी यांचे प्रमाण वाढवून युवकांच्या मानसिकतेच्या रोपाला वटवृक्षात विस्तारू शकतो. महात्मा फुले यांनी केलेल्या सुरवातीला आधुनिकीकरणाची व जागतिकीकरणाची जोड देत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि शिक्षणाच्या या दशेला योग्य दिशा देऊ.
- प्रिया कानिंदे-सरतापे
औरंगाबाद
Post a Comment