आदरणीय अब्दुल्लाह इब्ने मस्ऊद (र) यांनी वर्णन केले आहे की अल्लाहचे पैगंबर (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी म्हटले आहे की,
जर कुणाला काही त्रास किंवा दु:ख असेल आणि त्याने ही प्रार्थना केली तर अल्लाह त्याचे दु:ख आणि त्रास दूर करेल.
अल्लाहुम्-म इन्नी अब्दु-क, इब्नु अब्दि-क, इब्नु अमति-क, नासियती बियदि-क, माजिन फी हुक्मु-क, अद्लुन फी कजाऊ-क, अस्-अलु-क बिकुल्लिस्मिन हु-व ल-क सम्मय-त बिहि नफ्स-क, अव अल्लम्तहु अहदन मिन् खल्कि-क, अव अन्जल्तहु फी किताबि-क, अविस्-तअ्सर्-त बिहि फी इल्मिल् गैबि इन्द-क, अन् तज्अलल् कुरआन रबीअ कल्बी, वनू-र सद्-री, वजिला-अ हुज्नी, वजहा-ब हम्मी. ( हदीस संग्रह - मुस्नद अहमद.)
अनुवाद :- हे अल्लाह! निश्चितच मी तुझा भक्त आहे, तुझ्या भक्ताचा पुत्र आहे, तुझ्या भक्तिणीचा पुत्र आहे, माझी ललाटरेषा तुझ्या हातात आहे, तुझे माझ्यावर संपूर्ण प्रभुत्व आहे, तुझी आज्ञा माझ्यावर लागू आहे, माझ्याबद्दल तुझा हुकुम न्याय्य आहे, मी तुझ्याकडे त्या प्रत्येक गुणात्मक नावाने प्रार्थना करतो जे नाव तू स्वतःशी संबंधित केले आहे, किंवा तुझ्या निर्मितीपैकी कुणाला तू शिकवले आहेस, किंवा तुझ्या ग्रंथात तू अवतरित केले आहेस, किंवा तुझ्याकडील परोक्ष ज्ञानात तू जतन केले आहेस, हे अल्लाह! कुरआनला माझे मन प्रफुल्लित करणारा बनव, अंतःकरणाला प्रकाशित करणारा बनव, माझे दुःख दूर करणारा, माझ्या चिंता मिटवणारा बनव.
मौलाना मोहिउद्दीन गाजी फलाही यांनी या प्रार्थनेसंबंधी स्पष्टीकरण करतांना लिहिले आहे की, येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी ’माझ्या समस्या दूर कर’ अशी मागणी करायला शिकवले नाही, तर ’कुरआनला समस्या दूर करण्याचे साधन बनव’ अशी प्रार्थना करण्याची शिकवण दिली आहे. अशा प्रकारे त्यांनी (स) हा महान संदेश दिला की माणसांनो! तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि तुमच्या दुःखांवर उपाय योजण्यासाठी पवित्र कुरआनमध्ये मार्गदर्शन आहे. पवित्र कुरआनच्या नियमांचे आणि शिकवणींचे पालन केल्यास तुमच्या जीवनात वसंत फुलून उठेल आणि दु:खाचे काळे ढग नाहीसे होतील.
वस्तुस्थिती ही आहे की पवित्र कुरआनमध्ये सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी अमूल्य नियम आहेत, अट ही आहे की माणसाने खऱ्या इच्छेने पवित्र कुरआनाकडे वळले पाहिजे. (मुअल्लिमे अखलाक (स) की शख्सियतसाज दुआयें. पृ 13/14)
लोक आपल्या समस्यांवर उपाय शोधताना अपात्र व असंबंधित लोकांशी चर्चा करतात. नालायक लोकांचे सल्ले घेतात किंवा समस्या सुटाव्यात म्हणून भोंदू बाबांच्या नादी लागतात. आजार असो वा आर्थिक प्रश्न, कौटुंबिक समस्या असो वा मानसिक त्रास, किंवा इतर कोणतेही दुःख असो, त्यासाठी ढोंगी बाबा आणि त्यांच्या एजंटांचा धंदा जोरात चालतो. ज्यांच्या दरबारातील ताम झाम पाहून साधारण माणूस फसतो आणि त्यांनी सुचवलेल्या हास्यास्पद उपायांवर निःसंकोचपणे पैसा उधळतो आणि शेवटी रिकाम्या हातांनी परत येतो. माणसं आपल्या सर्वज्ञानी निर्मात्या, परम दयाळू ईश्वराच्या कृपेपासून अनभिज्ञ आहेत. निश्चितच विश्वनिर्मात्या अल्लाहने माणसांच्या सर्व समस्यांचे निराकरण पवित्र कुरआनमध्ये अवतरित केले आहे आणि त्यानुसार आचरण असलेले आदरणीय पैगंबर (स) यांचे जीवनचरित्र सुरक्षित ठेवले आहे, ज्याला ’सुन्नत’ म्हणतात. सद्य काळात कुरआन व सुन्नत हेच सांसारिक दुःखांचे निवारण आणि मरणोत्तर जीवनात मुक्ती प्राप्त करण्याचे शुध्द व सुरक्षित साधन आहे, कारण त्यापुर्वी अवतरित झालेले ज्ञान सुरक्षित नाही. कुरआनमध्ये विश्वनिर्मात्या अल्लाहने अत्यंत प्रेमाने ’ हे माणसांनो! असे म्हणत संपूर्ण मानवजातीला संबोधित केले आहे. विश्व निर्मात्याने माणसांना कोणकोणते संदेश दिलेत? हे समजून घेण्याची जबाबदारी खुद्द माणसावर आहे, कारण मृत्युनंतर जन्मभर केलेल्या कर्मांचा जाब त्याला आपल्या निर्मात्यासमोर द्यायचा आहे. मृत्यूच्या वेळी माणसाला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो? मृत्यूपासून ते कयामतचा दिवस म्हणजे न्यायाचा दिवस येईपर्यंत माणसाचे काय होते? कयामतच्या दिवशी काय काय होईल? आणि त्यापुढे कधीच न संपणाऱ्या जीवनात अल्लाहच्या कृपा किंवा त्याने ठरवलेल्या शिक्षा कोणकोणत्या स्वरूपात मिळतील? हे प्रश्न माणसासाठी सर्वात मोठ्या चिंतेचे विषय आहेत.
........................... समाप्त
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment