नवी दिल्ली
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठातर्फे राष्ट्रपती भवनात ’लॉर्ड ऑफ ऑल वन’ या विषयावर 25 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 10 प्रतिनिधींनी विविध धर्मप्रवाहांविषयी भाष्य केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समारोपीय भाषण केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आपल्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक श्रद्धा आणि प्रथा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत दिलासा, आशा आणि सामर्थ्य प्रदान करतात. प्रार्थना आणि ध्यान मानवांना आंतरिक शांती आणि भावनिक स्थिरता अनुभवण्यास मदत करते. पण शांती, प्रेम, पवित्रता आणि सत्य ही मूलभूत आध्यात्मिक मूल्येच आपले जीवन अर्थपूर्ण बनवतात. या मूल्यांशिवाय धार्मिक प्रथांचा आपल्याला फायदा होऊ शकत नाही. समाजात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सहिष्णुता, एकमेकांचा आदर आणि सलोख्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, प्रत्येक मानवी आत्म्याला आपुलकी आणि आदर मिळायला हवा. स्वत:ला ओळखणे, मूळ आध्यात्मिक गुणांनुसार जीवन जगणे आणि ईश्वराशी आध्यात्मिक संबंध ठेवणे हे जातीय सलोखा आणि भावनिक एकात्मतेचे नैसर्गिक साधन आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, प्रेम आणि करुणेशिवाय माणुसकी जगू शकत नाही. विविध धर्माचे लोक जेव्हा सामंजस्याने एकत्र राहतात, तेव्हा समाजाची आणि देशाची सामाजिक बांधणी मजबूत होते. ही शक्ती देशाची एकता अधिक बळकट करते आणि प्रगतीपथावर घेऊन जाते. 2047 पर्यंत भारताला विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय असल्याने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. इस्लाम धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे जमात-ए-इस्लामीचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनीअर यांनी या वेळी भाषण केले. जमात-ए-इस्लामी हिंदचे सचिव रहमतुन्निसाचे सहाय्यक सचिव वारिस हुसेन आणि डॉ. इक्बाल सिद्दीकी यांच्यासह भारतातील आणि भारताबाहेरील प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला निमंत्रित करण्यात आले असले तरी नंतर निमंत्रण रद्द झाल्याने ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी म्हणून कोणीही परिषदेला उपस्थित राहिले नाही. आर्चबिशप अनिल कौटो यांच्यासह चार जणांना सुरुवातीला दिल्ली धर्मप्रांतातून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपले निमंत्रण रद्द झाल्याचे जाहीर केले. हा विषय वादग्रस्त ठरल्याने त्यांना पुन्हा निमंत्रित करण्यात आले पण ख्रिस्ती प्रतिनिधींनी नकार दिला. यापूर्वी अनिल कौटो यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन देशातील ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात निवेदन सादर केले होते.
Post a Comment