उर्दू ही भाषा भारतीय आहे. निदान स्वातंत्र्यपूर्वकाळात तरी त्याला आजच्यासारखी एकारलेली धार्मिक ओळख मिळालेली नव्हती. भारतातील सर्व घटकांनी या भाषेला आपले मानले होते, असेही म्हणता येणार नाही. कारण स्वातंत्र्यपूर्वकाळात उर्दूमध्ये झालेल्या साहित्यनिर्मितीत ७० टक्के वाटा हा मुस्लिम साहित्यिकांचा आहे. मुस्लिम साहित्यिकांची संख्या एकास तीन इतकी अधिक असतानाही मुस्लिमेतर साहित्यिकांना या भाषेत साहित्यनिर्मिती करताना कसल्याच उपरेपणाची जाणीव झाल्याच्या नोंदी आढळत नाहीत. (निदान स्वातंत्र्यपूर्वकाळात तरी तशा नोंदी नाहीत.) त्याची कारणे शोधू पाहता, काही महत्वाच्या मुद्यांना अधोरेखित करता येईल.
गोपीचंद नारंग यांनी उर्दूतील मुस्लिम साहित्यिकांच्या साहित्य आणि सांस्कृतिक वर्तनावर महत्वाचे भाष्य केले आहे. इम्तियाज हुसैन हे उर्दूतील भाषा अभ्यासक आहेत. त्यांनीही याविषयी विस्ताराने लिखाण केले आहे. या दोघांच्या मते उर्दूतील मुस्लीम साहित्यीकांचे वर्तन हे भाषिक बहुसंख्यांकासारखे राहिले नाही. त्यांच्या साहित्यातून मुस्लिमेतरांवर विखारी टिका झालीच नाही, असे म्हणता येणार नाही. पण त्याचे प्रमाण दखल घेण्याइतके लक्षवेधी कधीच नव्हते. याउलट हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या, गंगा-जमनी विचारांच्या आणि संमिश्र राष्ट्रवादाच्या कविता उर्दूत अक्षरशः हजारोंच्या संख्येने लिहिल्या गेल्या आहेत. उर्दूतला इतिहासविचार हा इस्लामप्रणित इतिहासलेखनावर आधारीत होता. तेथे मुस्लिमांच्या श्रध्देचा मुद्दा केंद्रस्थानी होता, हे मान्य करावे लागेल. पण त्यातूनही इतरांवर हिनत्व लादण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत. मुन्शी जकाउल्लाह, सर सय्यद या इतिहासकारांनी इतिहास लेखाविषयी मांडलेली भूमिका यासंदर्भात अभ्यासता येईल.
त्याकाळात भारतातील मुस्लिमांकडे पाहण्याची राजकीय बहुसंख्यांकाची दृष्टी सहिष्णू होती. उर्दूतला राष्ट्रीयत्वाचा विचारदेखील त्यासाठी कारणीभूत असेल. 'सारे जहांसे अच्छा' हे एकच गीत आज आपल्याला आठवते. पण भारताच्या गौरवाचे कसिदे लिहीणाऱ्या उर्दू कवींची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील उर्दू पत्रकारितादेखील यासाठी कारणीभूत असावी. आजची उर्दू पत्रकारिता मुस्लिमांसाठीचा पत्रकारीतेतला दबावगट म्हणून कार्य करत असली तरी त्यावेळी मात्र आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. ऊर्दू पत्रकारिता त्याकाळी भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षात आघाडीवर होती. प्रशासकीय व्यवहारातील उर्दूचा वापरही तेंव्हा मोठा होता. अनेक संस्थानातील उर्दूचा वापरही यासाठी कारणीभूत असेल.
उर्दूतल्या कथा, कांदबऱ्यांमध्येही हिंदू पात्रांचे चित्रण मुस्लिमांच्या समान पातळीवर झाले आहे. किंबहूना धार्मिक बंधुत्वाचा विचार या कांदबऱ्यांमध्ये इतर भाषेतील कादंबऱ्यांपेक्षा आधिक आहे. उर्दूतला भाषांतरित साहित्याचा इतिहासही यासाठी कारणीभूत आहे. कुरआनचे मुस्लिमेतरांनी किती भाषांमध्ये भाषांतर केले याची माहिती शोधू पाहता खूप निराशाजनक माहिती हाती लागते. याउलट उर्दूत भाषांतरीत झालेल्या रामायण, वेद, महाभारत आणि अन्य धार्मिक ग्रंथांचा इतिहास खूप जुना आहे. उर्दूमध्ये रामायणाचे भाषांतर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये झाले आहे. रामायण आणि महाभारतावरील कथांची संख्याही जास्त आहे. उर्दूतील प्रमुख मुस्लिम कवींच्या साहित्याचे प्रातिनिधिक उदाहरण तपासायचे झाल्यास इकबाल यांचेच उदाहरण घेता येऊ शकेल. इकबाल यांनी प्रभू रामचंद्राचा उल्लेख 'इमाम ए हिंद' असा केला आहे.
अहल ए नजर समझते हैं इसको इमाम ए हिंद
इस देश में हुए हैं हजारों मलक सरिश्त
मशहूर जिनके दम से है दुनिया में नाम ए हिंद
ये हिंन्दियों की फिक्र ए फलक रस का है असर
रिफअत में आसमां से भी उँचा बाम ए हिंद
लबरेज है शराब ए हकिकत से जाम ए हिंद
सब फलसफी हैं खित्ता ए मगरीब के राम ए हिंद
इकबाल रामचंद्रांना इमाम ए हिंद म्हणून थांबत नाहीत. ते गौतम बुध्दांच्या इतिहासातील महत्वाचे संदर्भही अधोरेखित करतात. गौतम बुध्दांना भारताचा महान सुपुत्र म्हणून संबोधतात. बुध्दावरील शेरमध्ये त्यांनी शम ए गौतम अशी संकल्पना वापरली आहे. आणि गौतम बुध्दांची देशाने कदर केली नाही, अशी खंतही ते व्यक्त करतात.
कौमने पैगाम ए गौतम की जरा परवा न की
कद्र पहचानी न अपने गौहर ए यक दाना की
आह बद किस्मत रहे आवाज ए हक से बे खबर
गाफिल अपने फल की शीरीनी से होता है शजर
आश्कार उसने किया जो जिंदगी का राज था
हिंद को लेकिन खयाली फलसफे पे नाज था
इकबाल यांनी राष्ट्राची संकल्पना विस्ताराने मांडली आहे. त्यांनी राम, बुध्दाप्रमाणे नानकांविषयीदेखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. गौतम बुध्दांचा संदेशच गुरु नानकांनी पुढे चालवला, असे त्यांचे मत आहे. इकबाल नानकांवरील शेरमध्ये म्हणतात,
बुत-कदा फिर बा'द-ए-मुद्दत के मगर रौशन हुआ
नूर-ए-इब्राहीम से आज़र का घर रौशन हुआ
फिर उठी आख़िर सदा तौहीद की पंजाब से
हिन्द को इक मर्द-ए-कामिल ने जगाया ख़्वाब से
वेगवेगळ्या कवितांमध्ये इकबाल यांच्या राष्ट्रविचाराची प्रचिती येते. पण 'सारे जहां से अच्छा' हे गीत इकबाल यांनी राष्ट्राच्या गौरवासाठीच लिहिले होते. त्यातील एक संकल्पना त्यांनी विचारपूर्वक वापरली आहे. गंगा नदीपासून हिमालयापर्यंतची भौगोलिक धार्मिक वैशिष्ट्ये पंजाबपासून मराठी समाजापर्यंतची प्रादेशिक वैशिष्ट्ये इकबाल यांनी अधोरेखित केली आहेत. इकबाल यांनी सामाजिक एकतेच्या त्यांच्या संकल्पनेला अधोरेखित करताना, आपआपल्या धर्मावर कायम राहून आपण कशापध्दतीने राष्ट्रीय समन्वय साधू शकतो हे विस्ताराने लिहीले आहे. त्यांच्या जावेदनामा या काव्यनाटीकेत त्यांनी जी पात्रे वापरली आहेत, ती अतिशय महत्वाची आहेत. इकबाल या देशाचा इतिहास जावेदनामात मांडतात. भतृहरी, राम, कृष्ण, चार्वाक अशा अनेकांचा उल्लेख त्या काव्यनाट्यात येतो. डिवाईन कॉमेडीच्या धरतीवर लिहिलेली ही नाटीका फारसी आणि उर्दू साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. त्याशिवाय असरार ए खुदी या मसनवीतदेखील इकबाल यांनी आपल्या भारताच्या संकल्पनेची विस्ताराने चर्चा केली आहे.
ते म्हणतात, “इकबाल यांच्या भारताच्या संकल्पनेविषयी इफ्तेखार मोहम्मद लाहोरी लिहितात, इकबाल हा राष्ट्रीयत्वाच्या विचारांचा व्यक्ती होता. त्यांनी भारताच्या संकल्पनेला विस्ताराने मांडताना ती समग्र कशी होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे. ते कुठेही एकांगी होत नाहीत. अथवा आपल्या सांस्कृतीक प्रेरणा किंवा निष्ठा भारतावर लादत नाहीत. इकबाल एका त्रयस्थ आणि हितसंबंधविरहीत व्यक्तीप्रमाणे भारताची संकल्पना कथन करतात.”
इकबाल इंग्लंडमध्ये असताना घडलेली एक घटना महत्वाची आहे. त्या घटनेतून इकबाल यांचे राष्ट्रप्रेम, ऱाष्ट्रीयत्वाची त्यांची संकल्पना प्रकर्षाने समोर येते. इकबाल यांनी स्वतः या घटनेची माहिती लिहून ठेवली आहे. इकबाल सुट्ट्यांच्या काळात काही दिवसांसाठी इंग्रज मित्रांसोबत त्याच्या गावी गेले. मित्राचे घर स्कॉटलंडच्या एका भागात होते. तेथे एका ख्रिश्चन पादऱ्याचे भारतावरुन परतल्यानंतरचे अनुभव कथन आयोजित करण्यात आले होते. आपले अनुभव मांडताना त्या ख्रिश्चन पादऱ्याने भारत हा तीस कोटी लोकांचा देश आहे. पण तेथील लोकांना माणूस म्हणता येणार नाही. कारण ते पशुसमान जीवन जगतात. हे ऐकल्यानंतर इकबाल यांनी त्वेषाने त्या पादऱ्याचा समाचार घेतला.
“मी भारतीय आहे. भारताच्या मातीत माझा जन्म झाला आहे. तुम्ही माझे वर्तन पहा. जगण्याची रीत पहा. मी तुम्हा लोकांच्या भाषेत त्याच सफाईने बोलत आहे. ज्या सफाईने मिशनरी साहेब बोलले. आणि खोटेरडापणाचा नमुना त्यांनी पेश केला. मी भारतात राहून शिक्षण घेतले आहे. पुढच्या शिक्षणासाठी केम्ब्रीजला आलो आहे. तुम्ही माझे व्यक्तिमत्व पाहून अंदाज लावू शकता की मिशनरी साहेबांनी भारतीय लोकांविषयी जे काही म्हटले ते कितपत दुरुस्त आहे. आम्ही राजकीय पातळीवर इंग्रजांचे गुलाम झालो असलो तरी आमची संस्कृती आहे. आमची निराळी सभ्यता आहे. आमची राष्ट्रीय परंपरा आहे. जी पश्चिमी राष्ट्राच्या परंपरांपेक्षा कमी नाही.” यानंतर इकबाल यांनी मिशनरींचा उल्लेख करत भारताचा इतिहासदेखील कथन केला. त्यात त्यांनी हिंदू धर्मापासून गौतम बुध्दांपर्यंत अनेक थोर पुरुषांचा उल्लेख केला. इकबाल यांची ही राष्ट्रीय दृष्टी उर्दूला ऱाष्ट्रीयत्वाचा दृष्टीकोन प्रदान करणारी ठरली. कारण इकबाल हे भारतीय उर्दू साहित्यावर सार्वकालिक प्रभाव असलेले महाकवी आहेत.
- सरफराज अहमद
इतिहास संशोधक, सोलापूर
भ्रमणध्वनी : ९५०३४२९०७६
Post a Comment