आपल्या समाजात एक म्हण आहे, "मुले ही मातीचा गोळा असतात." कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला घडविण्याचा विचार करतो त्याप्रमाणे तो त्याला घडवितो. त्याचप्रमाणे मुलांना आपण लहानपणापासूनच सुसभ्य, सुसंस्कृत, मोठ्यांचा आदर करणारे लहानांवर प्रेम करणारे आणि प्राणीमात्रांवर प्रेम करणारे बनवायचे प्रयत्न केले तर ते तसे घडतात. कारण बालपणापासूनच दिलेले संस्कार मुलांच्या अंगी असतात आणि लहानपणापासूनच मूल आपल्या सभोवतालील घटकांना पाहूनच शिकत असते. या घटकांमध्ये दृश्य घटक म्हणजे आई, वडील, कुटुंब, नातेवाईक, शिक्षक, मित्र व समाज आहे. या घटकांचा प्रभाव त्या वाढणाऱ्या मुलांवर पडत असतो.
आपली मुले नेहमी खूश आणि आनंदी राहावीत असे प्रत्येक पालकास वाटत असते आणि त्यासाठी पालक नेहमी धडपडत असतात. मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून देतात. त्यांचे हट्ट व लाड पुरवतात पण खरंच मुले याची भुकेली असतात का? ते सुद्धा आपला आनंद या भौतिक सुखात शोधतात का? तर असं नाही. पालक म्हणून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्व गरजा व हट्ट पुरवितात आणि तुमची मुले खूश वा आनंदी आहेत तर तुम्ही चुकताय!.... मुलांना सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि माया मिळाली तरी सुद्धा ते खूश राहू शकतात. त्यांना फक्त पालकांच्या हक्काचा वेळ आणि लक्ष हवे.
काही पालक तर मुलांना एवढा अटेन्शन देतात की मुलं फार हट्टी होतात आणि त्यांना वाटते की आपण हट्ट केला किंवा रडून आरडाओरडा केला तर पालक आपले सर्व हट्ट पूर्ण करतात, तर इथे पालकांना समतोल साधावा लागेल. मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे व कोणते नाही यावर पालकांना लक्ष द्यावे लागेल. व्हिडिओ गेम, संगणक वापर आणि टीव्हीवर वेळमर्यादा ठेवावी लागेल. शारीरिक खेळ, पुरेशी झोप आणि कौटुंबिक संवादाच्या वेळेत कमी होत नाही याची खात्री करा. शाळेच्या जबाबदाऱ्या आणि दिनचर्या स्थापित करण्यात त्यांची मदत करा. इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद (सल्ल.) म्हणतात की, "वडील आपल्या मुलांना जे काही देतात त्यात सर्वात उच्च भेट म्हणजे त्याला दिलेले शिक्षण व संस्कार आहेत." (हदीस मिश्कात)
मी अगोदरच इथे नमूद केले आहे की मुलं ही कच्च्या मातीप्रमाणे असतात. त्यांना कसं घडवायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मुलं मोठी झाल्यावर चांगले नाव करावे, त्यांची प्रगती व्हावी असे प्रत्येक पालकांची इच्छा असते. चांगल्या संगोपनात काही अशा गोष्टी असतात ज्यांच्याकडे पालक दुर्लक्षित करतात आणि ते आहे मुलांचा आदर करणे. मुलांना तुच्छ लेखू नका. कोणासमोरही त्यांना रागवू नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जर त्यांच्या हातून काही नुकसान झाले तर माफ करण्याची वृत्ती ठेवा. त्यांना चार चौघांत अपमानित करू नका. त्यांना त्यांचे दोष वारंवार दाखवू नका. त्यांच्या उणिवा त्यांना दाखवाल तर ते चुकीच्या मार्गावर जातील. असे केल्याने त्यांच्यात नकारात्मक विचार निर्माण होतात. त्यांच्या इच्छांना मान द्या. मुलांना जे कार्य करण्याची आवड आहे ते त्यांना करू द्या. मुलांना टोचून किंवा उद्धटपणे बोलू नये. त्यांच्यावर देखील तसेच संस्कार होतात. त्यांच्याशी आदराने बोलावे.
आदर का महत्त्वाचा आहे याचे एक मुख्य कारण म्हणजे ते मुलांना सहानुभूती शिकविते. सहानुभूती ही एक शिकलेली वागणूक आहे. आदर शिकविल्याने मुलांच्या सहानुभूतीच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होतो. मुलांच्या समोर कधी खोटं बोलू नये व त्यांना खोटं बोलण्यास सांगू नये. जर आपण त्यांच्यासमोर खोटं बोललं तर त्यांच्या मनात ते घर करून जातं आणि मग ते पण खोटं बोलायला शिकतात.
यावरून एक किस्सा आठवला अब्दुल कादिर जिलानी (रह.) लहान होते. ते शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात होते. त्या वाटेवर दरोडेखोर खूप होते म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या शर्टच्या बाहीमध्ये पैसे शिवून ठेवले होते आणि आईचीच शिकवण होती की कधी खोटं बोलू नये. मग ते प्रवासाला गेले तर मार्गात दरोडेखोर भेटले. त्यांनी सर्वांची चौकशी केली आणि सर्व धन गोळा केले. यांच्याजवळ त्यांना काहीही मिळाले नाही. पण दरोडेखोरांनी त्यांना विचारले की, "तुझ्याजवळ पैसे आहे काय?" तर त्यांनी उत्तर दिले, "हो आहेत." आणि त्यांनी आपली बाही खोलून दाखविली, त्यात पैसे निघाले. दरोडेखोराने आश्चर्यचकीत होऊन विचारले, "तू का बरं पैसे दाखविले?" ते म्हणाले, "माझ्या आईने मला खोटं बोलण्यास मनाई केली आहे." मुलाच्या या वर्तनावरूनच नंतर दरोडेखोराने इस्लाम धर्म स्वीकारला. तर असे असतात बालकांवर केलेले संस्कार. अशा प्रकारे आपल्या मुलांना नेहमी याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या सोबत सदैव आहात. आपल्या पालकांचा सहवास मुलांसाठी सर्व काही असतो. त्यांच्या सहवासात मुलांना आनंद मिळतो. यामुळे मुले सुद्धा मोकळेपणाने पालकांशी संवाद साधतात. लहान मुलांचे मन खूप नाजूक असते आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना दुखवू शकतात. त्यामुळे एक पालक म्हणून त्यांना शक्य तितके प्रेम द्या आणि त्यांच्यावर माया करा.
तर मंडळी एक पालक म्हणून या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांना भौतिकच नाही तर मानसिक आनंद देखील द्या म्हणजे एक सुखी व्यक्ती म्हणून त्याचीही जडणघडण होईल.
-परविन खान
पुसद
Post a Comment