व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी चांगल्या गोष्टींची आवड असणे आवश्यक आहे आणि वाईट गोष्टी कितीही क्षुल्लक दिसत असल्या तरीही त्यांना गृहित धरू नये. यासंबंधीची एक प्रार्थना इब्ने माजह् या हदीस संग्रहात नमूद आहे. त्यातील प्रत्येक शब्द विचारात घेण्याची गरज आहे.
अल्लाहुम्-म इन्नी अस्-अलु-क मिनल्-खैरि कुल्लिहि आजिलिहि वआ’जिलिहि, मा अलिम्तु मिन्हु वमा लम् अ’अलम् , व अऊजु बि-क मिनश्शर्रि कुल्लिहि आजिलिहि वआ’जिलिहि, मा अलिम्तु मिन्हु वमा लम् अ’अलम् , अल्लाहुम्-म इन्नी अस्-अलु-क मिन खैरि मा स-अल-क अब्दु-क व नबिय्यु-क, व अऊजु बि-क मिन शर्रि मा आ-ज बिहि अब्दु-क वनबिय्यु-क, अल्लाहुम-म इन्नी अस्-अलु-कल्-जन्न-त वमा कर्-र-ब इलय-हा मिन् कौलिन अव अमलिन, वअऊजु बि-क मिनन्-नारि वमा कर्-र-ब इलय-हा मिन् कौलिन अव अमलिन, वअस्-अलु-क अन् तज्-अ-ल कुल्-ल कजाइन कजय्तहु ली खैरन.
(हदीस संग्रह इब्ने माजह् - 3846 )
अनुवाद :-
हे अल्लाह! या जगात आणि मरणोत्तर जीवनात ज्या काही भलाई आहेत, त्यांची मी मागणी करतो, ज्या मला माहित आहेत आणि ज्या मला माहित नाहीत त्या सर्व भलाईंची मी तुझ्याकडे याचना करतो. हे अल्लाह! सर्व वाईट गोष्टींपासून मी तुझा आश्रय घेतो, या जगातही आणि मरणोत्तर जीवनातही, ज्या वाईट गोष्टींबद्दल मला माहित आहे त्यांपासूनही आणि ज्या मला माहित नाहीत त्यांपासूनही मी तुझ्याकडे आश्रय घेतो. हे अल्लाह, तुझे दास आणि पैगंबर ( त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी तुझ्याकडे ज्या ज्या भलाई मागितल्या आहेत त्या सर्व भलाई मी तुझ्याकडे मागतो आणि तुझे दास आणि पैगंबर यांनी ज्या ज्या वाईट गोष्टींपासून आश्रय घेतला त्यांपासून मी तुझ्याकडे आश्रय मागतो. हे अल्लाह, मी तुझ्याकडे जन्नतची मागणी करतो आणि ते वचन व कृती मागतो जी स्वर्गाजवळ नेते आणि मी नरकापासून आणि त्याच्या जवळ नेणाऱ्या कृती व वचनापासून तुझा आश्रय मागतो आणि ही याचना करतो की माझ्याबद्दल तुझा जो काही आदेश, निर्णय असेल तो माझ्यासाठी चांगला व भलाईचा ठरव.
या प्रार्थनेसंबंधी स्पष्टीकरण करतांना मौलाना मोहियुद्दीन गाजी फलाही यांनी लिहिले आहे की, काय आहे ही प्रार्थना? भलाईच्या खजिन्याची मागणी आहे. माणूस आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या भलाई व चांगल्या गोष्टींचा शोध घेऊ लागला आणि त्याने आपल्या जवळ कोणत्याही वाईट गोष्टीला फटकूच दिले नाही तर त्याचे व्यक्तिमत्व ताऱ्यांनी सजलेल्या आकाशापेक्षाही अधिक सुंदर व आकर्षक होईल.
या प्रार्थनेमध्ये भलाई व चांगुलपणाची मागणी किती मार्गांनी केली गेली आहे ते विचारात घ्या. तसे पाहिल्यास एवढे म्हणणे पुरेसे होते की, हे अल्लाह! मी तुझ्याकडे प्रत्येक भलाई मागतो, पण तेवढ्यापुरते न मागता वर्तमान व भविष्यकाळातील, ज्ञात व अज्ञात आणि अल्लाहच्या पैगंबरांनी (स) मागितलेल्या प्रत्येक भलाई, कल्याण व चांगुलपणाची मागणी यामध्ये आहे. ही प्रार्थना आदरणीय माई आयशा (र) यांच्या मार्फत मानवतेला शिकवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती जी माणसाला जन्नत म्हणजे स्वर्गाच्या जवळ नेते आणि नशिबाच्या प्रत्येक निर्णयात भलाई व चांगुलपणाची मागणी यात आहे.
या प्रार्थनेतुन ही महत्वाची शिकवण मिळते की जर स्वर्ग हवा असेल तर माणसाने स्वर्गाच्या जवळ नेणाऱ्या प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक शब्दाचा शोध घेतला पाहिजे आणि नरकापासून मुक्ती हवी असेल तर नरकाच्या जवळ नेणाऱ्या प्रत्येक कृतीपासून आणि प्रत्येक शब्दापासून दूर राहिले पाहिजे. या प्रार्थनेवरून हे दिसून येते की, जगताना माणूस आपल्या बोलण्यामुळे आणि कृतीमुळे स्वर्ग किंवा नरकाच्या जवळच असतो. त्यामुळे खोट्या आशेवर जगण्यापेक्षा आपल्या बोलण्यावर आणि कृतीवर आपले सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे.
या प्रार्थनेद्वारे खऱ्या इच्छा-आकांक्षा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा जन्म झाल्यास माणसाचे व्यक्तिमत्व उत्तम बनेल आणि त्याला मरणोत्तर जीवनात यशाची सुवार्ता या जगातच मिळेल, ही वस्तुस्थिती आहे.
(मुअल्लिमे अखलाक स की शख्सियतसाज दुआयें. पृ. 19-20)
........................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment