माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''इमाम (नमाजचे नेतृत्व करणारा) जबाबदार आहे आणि मुअज़्ज़िन (मस्जिदीतून नमाजसाठी लोकांना पुकारणारा) विश्वस्त. हे अल्लाह! इमामत करणाऱ्यांना सदाचारी बनव आणि हे अल्लाह! अजान देणाऱ्यांना क्षमा कर.'' (हदीस : अबू दाऊद)
'इमाम जबाबदार असणे' म्हणजे तो लोकांच्या नमाजसाठी जबाबदार आहे. जर तो सदाचारी व चारित्र्यवान नसेल तर सर्वांची नमाज खराब करील, म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) दुआ करतात, ''हे अल्लाह! इमामांना सदाचारी बनव.'' 'मुअज़्ज़िन विश्वस्त असणे' म्हणजे लोकांनी आपल्या नमाजची बाब त्याच्या स्वाधीन केली आहे. निश्चित वेळेवर अजान देणे त्याचे कर्तव्य आहे, जेणेकरून अजान ऐकून लोकांनी तयारी करावी आणि समाधानाने सामुदायिक नमाजमध्ये सामील व्हावे. जर निश्चित वेळेवर अजान देण्यात आली नाही तर अनेक लोक सामुदायिक नमाजपासून वंचित राहतील अथवा एक-दोन रकअत लाभणार नाहीत. ही हदीस एकीकडे इमामांचे आणि मुअज़्ज़िनांचे या गोष्टीकडे लक्ष्य वेधते की त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, तर दुसरीकडे लोकसमुदायाला सांगितले जात आहे की सदाचारी व अल्लाहची अधिक भय बाळगणाऱ्या व्यक्तीची इमामतसाठी निवड करावी आणि आपल्या जबाबदारीची जाणीव असणाऱ्या माणसाची अजान देण्यासाठी निवड करावी.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जेव्हा तुमच्यापैकी कोणी 'इमामत' (नमाजचे नेतृत्व) करील तेव्हा (परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि नमाजींचा विचार करून) नमाज आटोपती घ्यावी कारण तुमच्या मागे दुर्बलही असतील, आजारी आणि वृद्ध लोकदेखील. परंतु जेव्हा तुमच्यापैकी एखादा एकट्याने आपली नमाज अदा करीत असेल तर तो नमाजकरिता हवा तेवढा अवधी अधिक देऊ शकतो. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू मसऊद अन्सारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ''अमुक इमाम फज्रची नमाज दीर्घकाळ पढवितो त्यामुळे सकाळच्या सामुदायिक नमाजमध्ये मी उशिरा पोहचतो.'' (अबू मसऊद म्हणतात,) मी यापूर्वी एखाद्या प्रवचनात अथवा भाषणात पैगंबर मुहम्मद (स.) यांना एवढा राग आलेला पाहिला नाही जेवढा त्या दिवशीच्या भाषणात पाहिला. पैगंबर म्हणाले, ''हे लोकहो! तुमच्यापैकी काही नमाजचे नेतृत्व करणारे अल्लाहच्या भक्तांना अल्लाहची उपासना करण्यापासून भटकवितात. (खबरदार!) तुमच्यापैकी जो कोणी नमाजचे नेतृत्व करतील त्यांनी नमाज संक्षिप्त करावी, कारण त्यांच्या मागे वृद्धही असतील, मुलेही असतील आणि कामधंद्यासाठी निघणारे गरजवंतदेखील.'' (हदीस : मुत्तफ़क़ अलैह)
'नमाज संक्षिप्त करावी' म्हणजे उलटसुलट, घाईघाईत नमाज अदा करणे अथवा पढविणे आणि चार रकअत नमाज दीड मिनिटांत पूर्ण करणे ही इस्लामची नमाज नाही. निश्चितच नमाजींचा आणि काळ व स्थितीचा अवश्य मर्यादित आदर केला गेला पाहिजे. संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment